२०१९ मध्ये विरोधकच मोदींना सत्तेवर आणतील!

0
53

– तिसरी आघाडी निव्वळ दंतकथा
– ओमर अब्दुल्ला यांची सणसणीत चपराक
श्रीनगर, ८ ऑगस्ट
गेल्या तीन वर्षांपासून विजयरथावर स्वार असलेल्या भाजपाला पर्याय म्हणून तिसरी आघाडी स्थापन करण्याचे विरोधकांचे प्रयत्न केवळ दंतकथा आणि काल्पनिक असून, हेच विरोधक २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना अर्थात भाजपाला सत्तेवर आणतील, अशा बोचर्‍या शब्दात जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी विरोधकांना हाणले.
२०१९ मध्ये विरोधक स्वत:साठीच एकत्र येतील आणि भाजपला पुन्हा पाच वर्षे सत्तेची संधी उपलब्ध करून देतील. कारण, विरोधी आघाडीचे जे चित्र दाखविण्यात येत आहे, तेच निव्वळ काल्पनिक आहे. प्रत्यक्षात अशी कुठलीही आघाडी अद्याप अस्तित्वात तर सोडा, चर्चेतही आली नाही, असा टोला ओमर अब्दुल्ल यांनी लगावला.
गुजरातमध्ये राज्यसभेसाठी मतदान सुरू आहे. कॉंगे्रसचे उमेदवार अहमद पटेल यांना पराभूत करण्यासाठी केवळ भाजपाच नव्हे, तर स्वत:ला विरोधी आघाडीतील घटक म्हणणार्‍या पक्षांनीही पटेल यांच्या पराभवासाठी कंबर कसली आहे, असा संदर्भ देत अब्दुल्ला यांनी विरोधकांवर आसूड ओढले.
जयराम रमेश यांनी जे मत मांडले, त्याकडे कॉंग्रेस नेत्यांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे. सर्वात जुना पक्ष जागा होईल आणि जयराम जे सांगत आहेत, त्यावर विचार करेल, अशी आशा आहे. जयराम रमेश यांच्या मतांकडे दुर्लक्ष झाल्यास कॉंगे्रसकडे दुरदृष्टीचा अभाव असल्याचेच म्हणावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)