मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात वेगळे आरक्षण मिळावे

0
70

खा. नाना पटोले यांची मागणी
नवी दिल्ली, ८ ऑगस्ट
मराठा समाजाला इतर मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गात वेगळे आरक्षण देण्यासाठी शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी गोंदिया व भंडारा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज मंगळवारी एका निवेदनाद्वारे केली आहे.
उद्या, बुधवार ९ ऑगस्ट रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या पृष्ठभूमीवर पटोले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रात मराठा समाज हा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर आहे आणि म्हणूनच या समाजाला ओबीसी प्रवर्गात वेगळे आरक्षण देण्याची मागणी आहे.
मराठा समाजात बहुतांश लोक गरीब आहेत, या समाजाचे मागासपण दूर व्हावे म्हणून समाजाला इतर मागास वर्ग प्रवर्गात वेगळे आरक्षण देण्यासाठी शासनाने दखल घेण्याची आवश्यकता असल्याची मागणी पटोले यांनी या निवेदनात केली.
आज भव्य मोर्चा
मराठा समाजाकरिता नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळविण्याच्या मागणीसाठी मुंबईत उद्या बुधवारी आयोजित मोर्चात लाखो लोक सहभागी होतील. मराठा समाजाचा हा ५८ वा आणि सर्वात मोठा मोर्चा ठरेल, अशी माहिती आयोजकांनी पत्रपरिषदेत दिली.
औरंगाबाद येथून गेल्या वर्षी पहिला मोर्चा काढल्यानंतर या वर्षभराच्या काळात मराठा समाजाने राज्याच्या विविध भागात ५७ मूक मोर्चा काढले आहेत.
उद्या बुधवारी सकाळी ११ वाजता मुंबई महापालिकेच्या जिजामाता उद्यानातून मोर्चाला सुरुवात होईल आणि दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर समारोप करण्यात येईल, असे आयोजकांनी सांगितले.
पाकमधूनही पाठिंबा
इस्लामाबाद, ८ ऑगस्ट 
मराठा क्रांती मोर्चाला पाकिस्तानातून पाठिंबा मिळाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. बलुचिस्तानातील मराठा समाजाच्या मराठा कौमी इत्तेहाद या संघटनेच्या ‘मराठा ट्राईब’ या फेसबूक पेजवर मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.  ‘भारतात मराठा समाजावर होणार्‍या अन्यायाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला मराठा कौमी इत्तेहादच्या प्रमुखाचा पाठिंबा आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण दिले गेले पाहिजे. हा त्यांचा हक्क असून त्यांच्यावरील अन्याय सहन केला जाणार नाही. त्यांचा प्रत्येक आंदोलनाला आमचा पाठिंबा असेल. पानीपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर मराठ्यांना अफगाणिस्तानमध्ये नेणे शक्य झाले नाही, त्यामुळे त्यांना बलुचिस्तानात ठेवण्यात आले. तिथे त्यांचे धर्मांतर झाले. पण त्यांनी त्यांच्या नावात मराठा नाव अजूनही जोडलेले आहे. मराठा असण्याचा त्यांना अभिमान आहे.
सुमारे २५० वर्षांपूर्वी प्रसिद्ध पानिपतचे तिसरे युद्ध झाले होते, या युद्धातील २२ हजार मराठी युद्धकैदी गुलाम म्हणून अहमदशहा अब्दालीने आपल्याबरोबर अफगाणिस्तानात नेले.  त्यावेळच्या मराठा युद्धकैद्यांचे वंशज धर्माने मुस्लिम झालेले आहेत. (तभा वृत्तसेवा)