दहीहंडी : एक साहसी क्रीडोत्सव…

0
19

प्रबोधन
भारत देश उत्सवप्रिय देश आहे. या उत्सवातून अनेक विधायक व रचनात्मक कार्याची जोपासना होऊन समाजात व देशातसुद्धा समानता, सहकार्यता, सामंजस्यता, एकता, राष्ट्रीयतासारखे सद्गुण जोपासले जातात व यातूनच स्थैर्यभाव जोपासले जातात.
गोकुळाष्टमीला बड्या शहरात गोविंदाचा दहीहंडीचा साहसी कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. या दहीहंडीच्या कार्यक्रमातून एकत्र जमणार्‍या व मनोरे रचून तसेच सहकार्य व सद्भावाने शृंखला रचून सामाजिक ऐक्य व सामाजिक सहकार्याचे सुरेख दर्शन या निमित्ताने घडते. सामाजिक व राष्ट्रीय एकता आज काळाची गरज आहे. शुद्ध भाव व शुद्ध गरज या दहीहंडीच्या कार्यक्रमातून निश्‍चितपणे रचली जाते. एकत्र जमणार्‍या या सर्व गोविंदांचा शुद्ध भाव, शुद्ध विचार व शुद्ध मनांचा त्रिवेणी संगम या दहीहंडीच्या कार्यक्रमातून दिसून येतो, एवढे मात्र निश्‍चित! दहीहंडी बघणार्‍या प्रेक्षकांच्या चेहर्‍यावरील आनंद व त्यांचेही शुद्ध भाव प्रकर्षाने दिसून येतात.
महाराष्ट्र शासनाने दहीहंडी कार्यक्रमाचा समावेश साहसी खेळाच्या यादीमध्ये करण्याचा घेतलेला निर्णय या खेळाचे महत्त्व विशद करणारा आहे. या खेळातून दिसून येणार्‍या विधायक व रचनात्मक तसेच साहसी गुणात्मकतेला पाहूनच शासनाचा हा निर्णय आहे, एवढे निश्‍चितपणे सांगता येईल.
भगवान श्रीकृष्णांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून ही गोविंदामंडळी समाजात विधायक व रचनात्मक कामाचा पाया रचून, न्याय्यकार्यासाठी आपले कला, कौशल्य व साहस दर्शवून समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. क्वचितप्रसंगी दुर्दैवाने अप्रिय घटना घडतात, मात्र गोविंदा मंडळांनी खबरदारी घेतल्यास या घटना टाळता येऊन दहीहंडी कार्यक्रमाचा आनंद सर्वांनाच लुटता येईल. दहीहंडी कार्यक्रमातून खालील बाबी प्रकर्षाने दिसून येतात, ज्या काळाची गरज असणार्‍या आहेत.
दहीहंडी कार्यक्रमातून सामाजिक ऐक्याचे सर्वांगसुंदर दर्शन घडते. विविध विचार, विविध व्यक्तिमत्त्व, विविध क्षेत्र व विविध स्तरातील मंडळी जेव्हा एकत्र येऊन विधायक कार्य करतात. म्हणून दहीहंडीला सामाजिक ऐक्य संबोधतात.
सामाजिक संघटितपणा दहीहंडीतून सादर होतो : दहीहंडी म्हणजे सामाजिक संघटितपणा होय. या उत्सवात गोविंदातर सामाजिक संघटन एकत्र येऊन दर्शवितात, त्याचबरोबर समाजाच्या सर्व थरातील प्रेक्षक, दहीहंडीचा उत्सव बघण्यासाठी एकत्र येतात व शांत, संयमाने दहीहंडीचा आनंद लुटतात.
गोविंदांच्या अंगच्या कला, कौशल्य, संयम व सहकार्याचे दर्शन : गोविंदाच्या मनोर्‍यातून त्यांच्या अंगी असलेल्या कलेचे, कौशल्याचे व त्यांच्या धीरोदात्तपणाचे तसेच त्यांच्या एक दुसर्‍याला संयमाचे साक्षात दर्शन या दहीहंडी उत्सवातून घडते. गोविंदाची सहनशक्ती, त्यांची एकी, त्यांचा संयम व त्यांच्या माध्यमातून होणारे स्थिरत्वाचे दर्शन, या बाबी आजच्या युवकांनी अंगी बाळगल्या, तर ते आपल्या सुंदर जीवनाचे उत्कृष्ट शिल्पकार घडू शकतात, याचा बोध होतो.
दहीहंडीचे मनोरे व मिनार सामाजिक ऐक्याचे प्रतीक : गोविंदा रचणारे मनोरे व त्यावरील मिनार म्हणजे सामाजिक ऐक्य व सामाजिक सहकार्य, सामाजिक सद्भावाचे आदर्श उदाहरण होय. एकदुसर्‍याच्या साहाय्याने, सहकार्याने व समजूतदारपणाने हातापायांची सुस्थिती सांभाळणे, मनाची एकाग्रता प्राप्त करणे व प्रचंड आत्मविश्‍वासाने स्थिरत्व प्राप्त करून मनोरे व मिनार रचण्यास सहकार्य करणे, हे ऐक्य समाजातील सर्व नागरिकांनी पाहून सामाजिक शांतता प्राप्त करावी, असा संदेश देणारे आहे.
प्रचंड आत्मविश्‍वास बळावणारा उत्सव : मनोरे रचण्यापासून ते दहीहंडी फोडेपर्यंत संयमाने उभे राहणे, एकदुसर्‍यांना धीर, धैर्य देत स्वत:चा आत्मविश्‍वास शेवटपर्यंत टिकवून धरणे, हे प्रचंड आत्मविश्‍वास टिकविण्याचे लक्षण होय. दहीहंडी उत्सवातून ते प्रत्येकाला प्राप्त होते. युवकांना ध्येय गाठण्यासाठी अशा आत्मविश्‍वासाची गरज असते, ते अशा उत्सवातून प्राप्त होत असते.
एकमेकांना सहारा, एकमेकांना मदत करून अनेक चांगली कामे अशा उपक्रमातून प्रेरणा घेऊन करता येतात. गोविंदा एकमेकांच्या सहकार्य व मदतीतून अशक्यप्राय असणारे मनोरे रचून अंतिम उद्दिष्ट- उंचावरील हंडी फोडण्याचे साध्य करतात व आनंदाचा उत्सव पूर्णत्वास नेतात. दहीहांडीपर्यंत पोचल्यानंतर त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो.
दहीहंडी हा उत्सव साहस, धाडस व धीरोदात्तपणाचा आहे. या उत्सवातून प्रत्येक जण आपापली जबाबदारी साहस व धाडसाने पूर्ण करतो. प्रचंड आत्मविश्‍वास, प्रचंड उत्साह व प्रचंड धाडस यांचा संगम होताच ध्येय परिपूर्ण होते. अशा या उत्सवाला शासनाने साहसी क्रीडाप्रकार म्हणण्याचा घेतलेला निर्णय समर्थनीय आहे.
मात्र, या साहसी क्रीडात्सवात खबरदारी व स्वत:ची जपवणूक ही तितकीच महत्त्वाची आहे. यासाठी गोविंदा मंडळांनी मानवी मनोरे रचताना शिरस्त्राण, सेफ्टी हार्नेस, मॅटस् इत्यादी सुरक्षाविषयक उपाययोजना कराव्यात. रुग्णवाहिकाही ठेवावी तसेच सहभागी गोविंदांचा विमा उतरवावा व प्रेक्षकांनीही शांतता राखून दहीहंडी उत्सवाचा आनंद घ्यावा. १२ वर्षांखालील मुलांना सहभागी करून घेण्याचा हट्‌ट धरू नये. युवकांनी उत्सवास साजेशी भूमिका पार पाडून, या साहसी क्रीडात्सवातून साहसी गुणांची, सहकार्य, सद्भाव, संयम, सामंजस्याची जोपासना करावी.
धोंडीरामसिंह ध. राजपूत
९४२१३१२२४४