भारतीय चमूने पटकावली मालिका!

0
17

नेत्रदीपक यश
श्रीलंकेतील गॉल येथील पल्लेकले स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने लंकेचा चौथ्या दिवशीच धुव्वा उडवत मालिकेत आघाडी घेतली. गेल्या दोन महिन्यात विराट-कुंबळे वाद, विंडीज दौर्‍यातील संमिश्र यश, द्रविड, झहीर खानच्या निवडीवरून मानापमान नाट्यावर मात करत टीम इंडियाने लंकेवर मिळवलेला हा विजय नक्कीच स्पृहणीय आहे. मागच्या लंका दौर्‍यातील याच मैदानावर झालेल्या पराभवाच्या कटु स्मृती यानिमित्ताने पुसल्या गेल्या. रवी शास्त्री यांनी प्रशिक्षकाचा पदभार सांभाळताच टीम इंडियाने त्यांना ही विजयी सलामी देत लंका दौर्‍याचा शुभारंभ केला.
अपेक्षेप्रमाणे कर्णधार विराटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. लंकेकडे नाव घेण्यासारखे किंवा दरारा असणारे कोणतेही गोलंदाज नसल्याने टीम इंडियाला घाबरण्याचे काहीच कारण नव्हते. सलामीलाच शिखर धवनने गब्बर शतक ठोकून आपले इरादे जाहीर केले. चेतेश्‍वर पुजाराच्या बॅटपूजेत कुठलाही खंड पडला नाही. मात्र, अभिनव मुकुंद आणि कर्णधार विराटला परिस्थितीचा अचूक फायदा उठवता आला नाही. धवन, पुजारा यांच्या शतकासोबत रहाणेने मध्यफळीत आश्‍वासक फलंदाजी करत आपला डाव फुगवला. वाहत्या गंगेत हात धुवत हार्दिक पांड्या आणि मोहम्मद सामीने बॅटचा दांडपट्‌टा फिरवत भारताला सहाशेचा पल्ला गाठून दिला.
लंकेकरिता सहाशे धावांचा पाठलाग म्हणजे माउंट एव्हरेस्ट सर करण्यासारखे होते! याकरिता महेला जयवर्धने किंवा कुमार संगकारासारख्या कसलेल्या, मुरब्बी फलंदाजाची गरज होती. परंतु, अँजेलो मॅथ्युजवगळता नवोदित आणि अननुभवी फलंदाजांच्या साथीने हे अशक्यप्राय होते. सहाशेचा आकडा गाठताच आपल्या गोलंदाजांत सात हत्तींचे बळ आले होते. मोहम्मद सामी, उमेश यादवच्या तुफानी मार्‍याने लंकन बॅटस्‌मन हैराण झाले; तर अश्‍विन, जडेजाच्या फिरकीने त्यांच्या गळ्याभोवती फास घट्‌ट आवळला होता. गोलंदाजीत उरलीसुरली कसर हार्दिक पांड्याने पूर्ण करताच लंकेचा पहिला डाव तीनशेच्या आत गुंडाळला गेला.
पहिल्या डावात तीनशेच्या वर आघाडी मिळूनही विराटने लंकेला फॉलोऑन न देता भारताचा दुसरा डाव सुरू केला. पहिल्या डावातील दोन्ही शतकवीर दुसर्‍या डावात फारसे प्रभावी ठरले नाही, परंतु सलामीवीर मुकुंदने अभिनव फलंदाजी करत डावाला आकार दिला, तर विराटने आपले दमदार सतरावे कसोटी शतक झळकवताना भारताला तब्बल साडेपाचशेची आघाडी मिळवून दिली.
कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात जिंकण्यासाठी साडेपाचशे धावांचे आव्हान कोणत्याही मैदानावर किंवा कोणत्याही संघाविरुद्ध नक्कीच अवघड असते. यामुळेच नवख्या लंका संघाला ही कसोटी जिंकणे म्हणजे दिल्ली (सॉरी, कोलंबो) बहोत दूरच होती. परंतु, लंका सहजासहजी हार मानायला तयार नव्हती. श्रीलंकेचे फलंदाजीतील रत्न करुणारत्नेने भारतीय गोलंदाजांचा साहसी मुकाबला करत ९७ धावा फडकवल्या, तर त्याला मोलाची साथ देत निरोशन डिकवेलने वेल बॅटिंग करत ६७ धावा केल्या. याव्यतिरिक्त बाकीचे फलंदाज आयाराम गयाराम करत खेळपट्टीवर हजेरी लावत गेले. गुणरत्ने आणि कर्णधार रंगना हेराथ जायबंदी असल्याने फलंदाजी करू शकले नाही. लंकेच्या दुसर्‍या डावातही भारतीय गोलंदाजांनी दबदबा राखत लंकेला जखडून ठेवले. अश्‍विनने आपले प्रदर्शन उंचावत दुसर्‍या डावात तीन बळी घेतले.
खरेतर या कसोटी सामन्यात रंगना हेराथची लंका टीम कधीच रंगात दिसली नाही. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण असो की खेळाची रणनीती… तिन्ही क्षेत्रात रंगना हेराथच्या टीमने निराश करताच लंकेला चौथ्याच दिवशी ‘हे राम’ म्हणत पराभवाची चव चाखावी लागली. शिखर धवन, चेतेश्‍वर पुजाराची शतके, अभिनव मुकुंद, अजिंक्य रहाणेची आश्‍वासक फलंदाजी, हार्दिक पांड्या आणि विराटची तडाखेबंद फलंदाजी; तर गोलंदाजीत सामी, उमेश यादवची तुफानी बॉलिंग, त्यांना जडेजा, अश्‍विनच्या फिरकीची लाभलेली बहुमूल्य साथ ही या कसोटी विजयाची ठळक वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. अर्थातच शिखर धवनने सलामीलाच ठोकलेले शतक त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गेले. लंका दौर्‍यातील पहिल्यावहिल्या विजयासाठी टीम इंडियाचे तमाम क्रिकेट रसिकांतर्फे हार्दिक अभिनंदन!
– डॉ. अनिल पावशेकर
९८२२९३९२८७