ती… व्यक्त-अव्यक्त…

0
24

भावविश्‍व
अनंत-अनादी काळापासून स्त्री हा विषय कुतूहलाचा अन् तेवढाच चर्चेचा राहिलेला आहे. कालचक्रासह तिच्या प्रतिमा, कार्ये, स्थान व जगण्याच्या संकल्पना बदलल्या असल्या, तरी प्रत्येक काळात, प्रतिमेत तिचे रूप, रंग, स्थान, महत्त्व आणि कार्ये तसेच सामाजिक चौकट यात कायम भिन्नता दिसून येेते. ‘इतिहास खुदको दोहराता हैं,’ असे म्हणताना इतिहासातील त्याच प्रतिमा, प्रसंग व घटना हुबेहूब जशाच्या तशा समोर येत नाहीत. याला कारणही तसेच सबळ आहे. प्रत्येक घटकाची दुसर्‍या घटकाकडे बघण्याची नजर, वृत्ती, खोली आणि संदर्भ जसे असतील तसा तो घटक त्याला दिसेल, उमजेल आणि आत्मसात होईल. स्त्री हादेखील समाजाचा एक अतिमहत्त्वाचा घटकच आहे. त्यामुळे ज्याने ज्या नजरेतून तिच्याकडे पाहिले त्याला ती तशी दिसली. काहींना ती जननी, मर्दानी, ललना, देवी, रणचंडिका, प्रेयसी, भार्या; तर काहींना केवळ भोगवस्तू किंवा दासी वाटली! या वाटण्यावर व तिच्या वर्णनांवर तत्कालीन समाजव्यवस्था व नियमांचा फार मोठा प्रभाव दिसून येतो. उदाहरणच द्यायचे झाल्यास- वैदिक काळातील स्त्री ज्ञानपारंगत, कलेत निपुण व वाकचातुर्य बाळगणारी दिसून येते; तर उत्तरवैदिक काळात ती थोडी पुरुषवर्गाच्या अधीन, परावलंबी, बंधनात असलेली बघायला मिळते.
फार दूर कशाला, जन्मदात्या आईला मुलीचे अंतरंग कळू शकत नाही, की जोडीदाराला पत्नीच्या मनातील सर्वच भाव ओळखता येत नाहीत. याला कारणही तसेच सबळ आहे. स्त्री-मग ती कोणत्याही काळातील, व्यवस्थेतील, समाजातील, गरीब, श्रीमंत, उच्च पदस्थ किंवा अतिसामान्य यांपैकी कोणत्याही गटातील असो- ती पूर्णपणे कुठेच, कधीच व्यक्त झाली नाही. होत नाही. तिच्या मनाचे अनेक कंगोरे तथाकथित जनसमुदायापासून अलिप्त असतात. तिच्या व्यक्त-अव्यक्ताच्या पलीकडे तिचे स्वत:चे एक विश्‍व असते, मनातील चोरकप्पे असतात. तिचे स्थान, तिचे अनुभव, तिच्याशी घडलेल्या बर्‍यावाईट अनुभवांच्या खुणा, आनंदाचे क्षण, तिचे स्वत:विषयी व इतरांविषयी मत, अंतरातील ध्येय आणि बरेच काही लपलेले असते आणि कदाचित म्हणूनच प्रत्येक स्त्री वेगळी, तिची कहाणी वेगळी, तिचे अस्तित्व वेगळे, असे म्हणावेसे वाटते. तिच्याविषयी लेखणीतून आपोआप शब्द प्रसवतात-
‘स्त्रीजन्माची कहाणी एक गूढ गूढ वलय, कधी उभा पहाड तर कधी सुरेल लय, तिच्या एकेका रूपाचे लाख लाख कवडसे, तिला जाणता-जाणता सरले युगांचे वय…
अनेक गोष्टी तिच्या अंतरात गडप असतात. पण, जेव्हा तिच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होतो, तिच्या सभोवतीचे वातावरण तिच्या अंगावर- जिवावर बेतणारे असते तेव्हा ती चवताळलेल्या नागिणीप्रमाणे दंश करायला तयार असते. अन्यायास प्रतिकार करण्याचा विडा उचलते, समाजाविरुद्ध एल्गार पुकारते. आपल्या पाडसाच्या बचावासाठी प्राणावर उदार होते, तेव्हा तिचे आजवर अव्यक्त असलेले रूप पुढ्यात येते. कधी जगदंबा, कधी झाशीची राणी, काली, तर कधी रणांगिनी, तर कधी फुलनदेवीसारख्या रूपात! यांपैकी कोणतेही रूप असले, तरी ते मनाला चटका लावणारे, समाजभान जपायला लावणारे, तिची क्षमता दाखविणारे! तिच्या अव्यक्त रूपाचे पुढ्यात येणारे प्रत्येक कंगोरेे वेगळे, अनपेक्षित कुतूहल निर्माण करणारे आणि परिसीमा ओलांडणारे, नतमस्तक व्हायला भाग पाडणारे…!
पृथ्वीतलावरील स्त्रीनिर्मितीपासूनच या घटकाचे सामर्थ्य, गुण, कला, विविधता, पात्रता आणि सुप्तभाव यांचे निश्‍चितपणे मोजमाप आजपर्यंत करता आले नाही. एखादी स्त्री खळाळणार्‍या नदीप्रमाणे अल्लड, फुलांप्रमाणे निरागस आणि पाखरांप्रमाणे स्वच्छंदरूपात बागडताना दिसते, तेव्हा तिचे हेच रूप प्रमाण मानले जाते. एखादी गंभीर, अबोल, निश्‍चल, पर्वताप्रमाणे कठोर, प्रसंगांना धैर्याने सामोरे जाणारी असते; तर एखादी प्रसंगावधान राखून आपल्या वर्तनात बदल करणारी असते. त्यावरून त्या त्या स्त्रियांचा स्वभावधर्म ठरविला जातो. अनेकदा ती व्यक्त होते, पण व्यक्त होण्याचे स्वरूप व पातळ्या वेगवेगळ्या असतात, असू शकतात. अनेकदा ती कोसळणार्‍या सरीनंतर रित्या झालेल्या ढगांप्रमाणे व्यक्त होते, तर कधी स्तब्ध, नितळ, पारदर्शक, उन्हाप्रमाणे स्पष्ट… आरसपानी व्यक्तित्वाची धनी असल्यागत वागते. विविध वेळी, विविध पातळ्यांवर तिचे व्यक्त होणे अथवा न होणे, हे पूर्णत: तिच्यावर अवलंबून असते. तिने कुठे? कसे? केव्हा? कुणासमोर व्यक्त व्हावे, हे तिच्यावरील संस्कार, शिक्षण, सभोवतालचे वातावरण तसेच तिच्या अंतर्मनाचा कौल, आलेले अनुभव यावर अवलंबून असते.
स्त्रीविश्‍व, तिचे प्रश्‍न, भेडसावणार्‍या समस्या या देश, प्रदेश, समाज व कुटुंबनिहाय वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे, त्यानुसार तिच्या व्यक्त व अव्यक्त होण्याच्या पातळ्या भिन्नभिन्न असल्याचे अनेक दाखले सापडतात. विकसित देशात ती चटकन प्रतिक्रिया देणारी, अन्यायाला वाचा फोडणारी, अत्याचाराला व दुय्यमतेला विरोध करणारी, तत्परता दाखविणारी आहे; तर विकसनशील देशात ती दबलेली, बुजलेली, सामाजिक बंधनात बांधलेली, भयाच्या सावटाखाली वावरणारी किंवा प्रतिक्रिया देण्यात थोडा विलंब करणारी दिसून येते. कारण, तिच्या व्यक्त होण्याचे परिणाम तिच्यासह संपूर्ण कुटुंबाला प्रभावित करणारे असतात. काहींचे परिणाम सकारात्मक, तर काहींचे नकारात्मक पडसाद उमटवणारे ठरतात. अनेकदा पोटातील ओठांपर्यंत येते, पण आवंढा गिळून ते पुन्हा पोटात ढकलले जाते. अन्यायाची जाणीव होते, पण प्रतिकाराच्या परिणामांचे भय वाटते म्हणून ती गप्प बसते. अनेक इच्छा, आकांक्षा तिला खुणावत असतात, पण आत्मविश्‍वासाने पाऊल पुढे टाकण्यास तिचे मन धजावत नाही. समाजाविरुद्ध, अन्यायपूर्ण घटनांविरुद्ध बंड पुकारण्याची इच्छा प्रबळ असते, पण प्रवाहाविरुद्ध पोहण्याची हिंमत तिला करता येत नाही. खूप काही बोलायचे असते, पण शब्द जुळवता येत नाहीत. रोजचे जीवन जगताना तिला अनेकदा अनेक बाबतीत सहजपणे व्यक्त होता येत नाही. कधी जाणीवपूर्वक, तर कधी सवडीने, ज्याचे भयावह परिणाम अनेक स्वरूपात पुढे येत आहेत. आज स्त्रीमनाला नैराश्याने झपाटले आहे. यातून घटस्फोट, हत्या, आत्महत्या यांसारखे गंभीर परिणाम समोर येत आहेत. त्यातून एक वेगळाच नकारात्मक सामाजिक प्रश्‍न समोर आला आहे. ती प्रत्येक ठिकाणी व्यक्त होत असेल, तर तिचे कर्तृत्व, वक्तृत्व, प्रगती तसेच कौशल्य समोर येते. त्यामुळे ती समाजात वरचढ ठरते. आपल्या हक्कांसाठी लढणारी, गगनभरार्‍या घेणारी, बरोबरीचे स्थान मागणारी, आपल्या विचारांना वाट करून देणारा स्त्रीघटक समाजाला खटकणारा ठरतो. पर्यायाने त्याला सर्वोपरी विरोध केला जातो. अपहरण, अवहेलना, अपमान, छळ, अत्याचार तिच्या वाट्याला येते.
थोडक्यात, तिचे व्यक्त-अव्यक्त होण्याचे सगळे परिणाम तिलाच भोगायचे असतात. तिच्या वाट्याला येणार्‍या प्रत्येक क्षणावर त्याचे पडसाद उमटतात. त्यामुळे व्यक्त-अव्यक्ताच्या पलीकडे जाऊन तिला विचार करावा लागतो. नव्हे, करावा लागेल. स्वत:च्या परिघाची परिसीमा वाढवायची असेल, तर तिला ठामपणे व्यक्त व्हावेच लागेल. सभोवतालचे प्रतिध्वनी ऐकून प्रसंगी अव्यक्त होऊन दोन पावले मागेही सरावे लागेल. प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया देत व्यक्त होऊन संकटे वाढवून घेण्यापेक्षा, परिस्थितीचा अदमास घेत अव्यक्त राहून लगेच व्यक्त न होता प्रसंगावधान राखून लांब उडी घेणे केव्हाही शहाणपणाचे ठरेल. यातूनही स्त्री व्यक्तिमत्त्वाचा एक नवा पैलू, आशावादी प्रकाशकिरण नव्या जगासमोर येईल व त्या प्रकाशात तिची बंधने, परिसीमा आणि दुय्यमत्वाची झूल आपोआप गळून पडेल आणि नव्या स्त्रीयुगाची सुरुवात होईल. आपल्या अस्तित्वासाठी व अधिकारासाठी व्यक्त व्हायचे की नाही, हे केवळ तिच्याच हाती आहे. एवढे मात्र खरे.. स्त्रियांनी व्यक्त आणि अव्यक्ताच्या पलीकडे जाऊन विचार करणे तेवढे गरजेचे आहे!
प्रा. डॉ. वर्षा गंगणे
९४२२१३४८०७