मुघलांचा इतिहास काढण्याचा निर्णय योग्य!

0
19

वाचकपत्रे
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या सातवी आणि नववीच्या पुस्तकांतून मुघलांचा इतिहास काढून टाकण्याचा शासनाचा निर्णय अतिशय योग्य आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकार व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे अभिनंदन! कॉंग्रेस किंवा डाव्यांच्या राज्यातील पुस्तकांमध्ये आमच्या शूरवीर योद्ध्यांचा इतिहास न सांगता, आमच्या कोट्यवधी हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या, राममंदिर पाडणार्‍या, हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करणार्‍या, जुलमाने हिंदू राज्ये ताब्यात घेणार्‍या मुघलांचा इतिहास सांगितला जात असे. ही अतिशय चीड आणणारी बाब होती. अनेक मान्यवरांनी व पालकांनी याकडे शासनाचे लक्ष वेधले आणि एक दबाव निर्माण केला. शासनाने आता पहिलीपासून तर बारावीपर्यंतच्या पुस्तकांत कोणते धडे आहेत, हे बारकाईने तपासावे व त्यात योग्य बदल घडवून आणावेत, ही विनंती.
विनोद देशपांडे
नागपूर
सार्वजनिक गणेशोत्सव
लोकमान्य टिळकांनी इंग्रजांच्या राजवटीत हिंदू समुदायाला एकत्र आणून एका सूत्रात बांधण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. जनतेत विचारजागृती व्हावी, देशभक्तीची भावना निर्माण व्हावी व जनतेच्या मनात इंग्रजांविरुद्ध जनमत जागृत व्हावे, हा या सार्वजनिक गणेशोत्सवामागील उद्देश होता. त्या काळात अनेक धार्मिक कार्यक्रम, प्रवचने, परिसंवाद होत असत. अनेक वर्षे हा क्रम चालला. पण, कालांतराने त्याला वेगळेच वळण लागले व गणेशोत्सव म्हणजे मनोरंजनाचे एक साधन, नाचगाणे, चित्रपटांची गाणी कर्कश आवाजात लाऊडस्पीकरवरून ऐकू येऊ लागली. अनेक ठिकाणी हा एक इव्हेण्ट झाला. कोटीच्या कोटी रुपये खर्च होऊ लागले. खंडणीखोरांच्या टोळ्या निर्माण झाल्या. टिळकांच्या उद्देशाला काळिमा फासला गेला. समाजधुरिणांनी याकडे लक्ष देऊन यात सुधारण घडवून आणावी व समाजप्रबोधनासाठी प्रोत्साहन मिळावे, अशी आशा आहे.
गिरीश दलाल
युक्तानंदनगर, खामगाव

बुक्कल नवाब झाले उदार!
उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाचे आमदार बुक्कल नवाब यांनी सपाचा राजीनामा देऊन ते भाजपात आले. त्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्याची स्तुती केली. शिवाय दहा लाख रुपये रामललाच्या चरणी अर्पण करण्याची आणि राममंदिर झाल्यावर रामललाला सोन्याचा मुकुट चढविण्याची घोषणा केली आहे. उत्तरप्रदेशातील एक मुस्लिम आमदार आणि तोसुद्धा मुलायमच्या पक्षातील, राममंदिरासाठी जर अशी उदात्त भावना व्यक्त करीत असेल, तर वार्‍याचा झोत कोणत्या दिशेने वाहात आहे, हे स्पष्ट दिसते. ताज्या बातमीनुसार, शिया बोर्डाने राममंदिराच्या मुद्यावर आपला दावा सोडला आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या बाबरी मशीद-राममंदिर वादातील एक वादी यांनीही आपला दावा मागे घेतला होता आणि सामंजस्याने यातून तोडगा काढावा, अशी सूचना केली होती. याचा अर्थ, राममंदिराचा मार्ग लवकरच मोकळा होण्याचीच ही चिन्हे आहेत.
सुधाकर अजंटीवाले
वर्धा

त्रिपुरात तृणमूलचे सहा आमदार भाजपात!
अहो आश्‍चर्यम्! त्रिपुरासारख्या राज्यात भाजपाला आपली ताकद वाढविण्यासाठी अगदी जिवाचे रान करावे लागत असतानाच, तृणमूलच्या सहा आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून नवाच इतिहास घडविला आहे. या सहा आमदारांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संपुआच्या उमेदवार मीरा कुमार यांना मतदान न करता, रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान केल्यापासून तृणमूल कॉंग्रेसमध्ये अतिशय असंतोष धुमसत होता. राष्ट्रपती निवडणुकीत व्हिप लागू नसल्याने या आमदारांना तृणमूलने पक्षातून काढले होते, पण आमदारकी कायम होती. त्यामुळे त्यांनी आता भाजपात प्रवेश केला आहे. एका कॉंग्रेस आमदारानेही भाजपात येण्याची इच्छा प्रकट केली आहे. मोदी आणि अमित शाह यांच्या घोडदौडीपुढे विरोधक हतबल झाल्यासारखे दिसत आहेत.
अशोक जाधव
नागपूर

आयकर भरणार्‍यांच्या संख्येत २५ टक्के वाढ!
नोटबंदीचा परिणाम म्हणून यंदा आयकर भरणार्‍यांच्या संख्येत २५ टक्के वाढ झाल्याचे आश्‍चर्यकारक आकडे समोर आले आहेत. नोटबंदीचे फायदे दीर्घकाळ लाभ देणारे ठरतील, असे मोदी म्हणाले होते. त्याची प्रचीती आता येत आहे. अनेक ठिकाणी अजूनही कोट्यवधींच्या जुन्या नोटा सापडत आहेत. याचा अर्थ, काळा पैसा हळूहळू बाहेर येत आहे. याचा अर्थ, नोटबंदीचा निर्णय हा अतिशय योग्य होता.
विवेक देशपांडे
नागपूर