विस्तारवादी अहंकारी चीन!

0
61

कटाक्ष
ड्रॅगनचे फूत्कार सुरूच आहेत. भारताला वारंवार धमक्या देऊन घाबरवण्याचे चिनी सरकारचे प्रयत्न आता अधिकच वेगवान झाले आहेत. काल पुन्हा चीनने भारताला धमकावले आहे. भूतानच्या डोकलाम पठारावरून भारताने सैन्य मागे घेतले नाही आणि रस्ता बनवण्याच्या कामात अडथळे आणले तर युद्ध करू आणि हा भारताला शेवटचा इशारा आहे, अशी दर्पोक्ती चीनने केली आहे. चीनला स्वत:च्या क्षमतेवर जरा जास्तच भरवसा असल्याचे प्रतीत होत आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वत:च्या क्षमतेबाबत चुकीची माहिती देत आहेत, असे म्हणत चीनने पहिल्यांदाच या सगळ्या वादात मोदींचे नाव घेतले आहेे. यावरूनही चीनचा अतिआत्मविश्‍वास दिसून येत आहे. चीनचे सरकारी वर्तमानपत्र ग्लोबल टाइम्सने भारताला इशारा देणारे वृत्त प्रकाशित केले आहे. या वर्तमानपत्राचे संपादक हू जिजिन यांनी १९६२ च्या युद्धाचीही आठवण भारताला करून दिली आहे. जो मूर्खपणा १९६२ साली पंडित नेहरू यांनी केला होता, तसा मूर्खपणा आज भारत करीत आहे, याकडे जिजिन यांनी लक्ष वेधत भारताला एकप्रकारे धमकावण्याचाच प्रयत्न केला आहे.
मुळात वाद चीनने निर्माण केला आहे. भूतानच्या डोकलाम पठारावर रस्ता बनवण्याच्या चीनच्या प्रयत्नांमध्ये भारताने बाधा आणून भूतानच्या बाबतीत कर्तव्यपूर्तीच केली आहे. चीन छोट्याछोट्या देशांना धमकावून साम्राज्यविस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. आशियात स्वत:चे निर्विवाद वर्चस्व निर्माण करण्याची चीनची महत्त्वाकांक्षा आहे आणि आपल्या मार्गात भारताचाच मोठा अडसर असल्याची जाणीव चीनला झाली आहे. १९६२ साली चीनने भारताला जरूर हरविले असेल. पण, आता परिस्थिती बदलली आहे. भारताची सैन्यशक्ती वाढली आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणा पंतप्रधान मोदी यांना चुकीची माहिती देत असल्याबाबत चीनने चिंता करण्याची आवश्यकता नाही. पंतप्रधान मोदी यांना भारताची क्षमता माहिती आहे आणि स्वत:च्या क्षमतेबाबतही ते जागरूक आहेत. त्यामुळे भारत स्वत:ला संकटात टाकत असल्याच्या भ्रमात चीनने राहू नये. डोकलामच्या मुद्यावरून चिनी मीडिया जेवढी तिथल्या सरकारला भडकावत आहे, तेवढेच चीनचे परराष्ट्र मंत्रालयही भडकावत आहे. त्यामुळे तणाव अधिकच वाढला आहे. डोकलाम हा आपल्या देशाचा भाग आहे आणि डोकलाममधून चीनने रस्ता बनवू नये यासाठी भारताने मदत करावी, अशी भूतान सरकारची इच्छा आहे. त्यानुसारच भारताने आपले सैन्य तिथे तैनात केले आहे. पण, चीनला हे मान्य नाही. चीनला हा भारताचा हस्तक्षेप वाटतो आहे. कारण, चीनचा असा दावा आहे की, डोकलाम हा चीनचाच भाग आहे. भारतानेही भूतानला मदत करण्याची तत्परता एवढ्यासाठीच दाखविली, कारण चीनने एकदा का डोकलाममध्ये रस्ता बनविला तर पूर्वोत्तर भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार आहे. हा धोका पत्करण्याची भारत सरकारची तयारी नाही. असे असताना भारताची सुरक्षाविषयक चिंता समजून न घेता चीन वारंवार भारताला धमकावून उपखंडात तणाव निर्माण करीत आहे.
कधी चीनकडून भारताला १९६२ च्या युद्धाची आठवण करून दिली जाते, तर कधी आमच्यापुढे भारत काहीच नाही, असा अहंभाव प्रकट केला जातो. भारताला तुच्छ लेखण्याची चिनी परंपरा अजूनही कायम असल्याचेच दिसत आहे. खरेतर डोकलाम हा भूतानचा अविभाज्य भाग आहे. मात्र, चीनकडून त्यावर दावा सांगितला जात आहे आणि जगाची दिशाभूलही केली जात आहे. डोकलामबाबत चीनचे जसे प्रयत्न सुरू आहेत, तसेच ते अरुणाचल प्रदेशबाबतही सुरू असतात. डोकलामबाबत भूतानसोबत काही वाद आहे, हेच आधी चीनने नाकारले होते. आता मात्र वाद असल्याचे अप्रत्यक्षपणे कबूल करीत आहे. चीन खोटारडा आहे. चिनी राज्यकर्ते अहंकारी बनले आहेत. चिनी मीडिया अहंकारी बनली आहे. चीनचे विदेश मंत्रालयही अहंकारी असल्याचेच प्रतीत होत आहे. हा अहंकार मोडून काढण्याची गरज आहे. भारताने अमेरिकेसोबत युद्धाभ्यास सुरू केल्याने तर चीनचा तिळपापड झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतल्यापासूनच चीन संतापला आहे. पण, चीनने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती ही की, भारताची ताकद १९६२ च्या तुलनेत दसपट वाढली आहे. भारताने अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करून सैन्यशक्ती वाढविली आहे. युद्ध झालेच तर चीनला त्याची प्रचीती जरूर येईल. चीनने प्रतीक्षा करावी. भारताची सैन्यशक्ती जरी चीनएवढी नसली तरी नैसर्गिक स्थिती जी आहे, ती भारतासाठी अनुकूल आहे. त्याचा फायदा भारताला निश्‍चित मिळेल.
डोकलामच्या मुद्यावर चीनने घेतलेली भूमिका पाहता, भारत सरकारने चिंतित होणे स्वाभाविक आहे. डोकलामच्या मुद्यावरून चीनने जे धमकीसत्र सुरू केले आहे, त्यावरून कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी गेल्या आठवड्यात राज्यसभेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी विरोधकांच्या आरोपांना मुद्देसूद उत्तरे दिली अन् त्यांची तोंडे गप्प केली. खरेतर हा काळ परीक्षेचा आहे. देशाच्या ऐक्याला अन् अखंडतेला चीनकडून धोका निर्माण झाला असताना सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून एक होण्याची गरज आहे. सरकारला कोंडीत पकडून विरोधी पक्षांनी काय साधले? उलट, सुषमा स्वराज यांनी सरकारची बाजू अतिशय दमदारपणे मांडत विरोधकांच्या आरोपातली हवा काढून टाकली! सुषमा स्वराज यांनी तथ्यांच्या आधारे कॉंग्रेसला आरसा दाखविल्याने कॉंग्रेसची बोलती बंद झाली. भारताच्या परराष्ट्र धोरणावर विरोधी पक्ष सातत्याने टीका करीत आहेत.
परंतु, पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी जवळपास ६५ देशांचा दौरा केला आणि जगाला भारताची ताकद दाखवून दिली. परराष्ट्र व्यवहार खात्याचा कोणताही अनुभव नसताना मोदी यांनी जी चुणूक दाखविली, त्याची जागतिक समुदायाने प्रशंसाच केली, ही बाब विरोधी पक्षांनी लक्षात घेतली पाहिजे. कोणताही अनुभव नसताना पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला नवा आयाम दिला आहे. संपूर्ण जगात भारताची प्रतिष्ठा वाढविण्याचे काम मोदींनी केले आहे. मोदींनी नुसताच मान वाढविला नाही, तर भारत एक महाशक्ती आहे, हे दाखवून देण्याचाही प्रयत्न केला आहे. आता जगही भारताकडे एक शक्तिशाली देश म्हणून पाहात आहे, ही बाब दुर्लक्षून चालायची नाही. पण, मोदींची ही कामगिरी कॉंग्रेसच्या पचनी पडलेली दिसत नाही. मध्यंतरी कॉंग्रेसच्या युवराजांनी- राहुल गांधी यांनी- डोकलामची माहिती घेण्याचा बहाणा करत चिनी राजदूताची भेट घेण्याचा जो पोरकटपणा केला, त्यावरून सुषमा स्वराज यांनी राहुल गांधी यांना आडव्या हाताने घेतले नसते तरच नवल!
चीनने भारतीय सीमांना लागून असलेल्या त्याच्या भागात जी कामे रस्त्यांची कामे केलीत, पूल बांधलेत, युद्धसामग्री आणून ठेवली, तेव्हा देशात कॉंग्रेसच्या नेतृत्वातले संपुआचे सरकार सत्तेत होते, याची जाणीव जेव्हा सुषमा स्वराज यांनी करून दिली, तेव्हा कॉंग्रेसवाल्यांची तोंडं बंद झालीत. शत्रू राष्ट्राकडून संकट उभे केले गेले असताना विरोधी पक्षांनी सरकारची कोंडी करण्याऐवजी सरकारला मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे. पण, प्रत्येकच मुद्यावर राजकारण करण्याची घाणेरडी सवय जडलेल्या विरोधकांना आता जनताच अधिक कठोर धडा शिकवेल, यात शंका नाही. निवडणुकांमागून निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा सातत्याने पराभव होत असताना, त्यातून धडा न घेता कॉंग्रेस राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरही राजकारणच करणार असेल, तर त्या पक्षाचे अस्तित्व धोक्यात आलेच म्हणून समजा!
चीन एक शक्तिशाली देश आहे, चीनची ताकदही वाढली आहे, हे मान्य करावे लागेल. ‘वन बेल्ट वन रोड’ या चीनच्या महत्त्वाकांक्षी योजनेला भारताने विरोध केला, तेव्हापासून चीन भारताचा राग करीत आहे. तेव्हापासून चीनची आक्रमकताही वाढली आहे. चीनची ही वाढलेली आक्रमकता भारतापुढे एक मोठे आव्हान आहे, हे अमान्य करूनही चालायचे नाही. चीनची आडमुठी, विस्तारवादी आणि अहंकारी वृत्ती लक्षात घेता, भारताने सावध राहून पवित्रा घेतला तर चीन भारताचे काहीच बिघडवू शकणार नाही, याबाबत आम्ही आश्‍वस्त राहिले पाहिजे…!
– गजानन निमदेव