आधार-पॅन कार्ड जोडणीला ३१ ऑगस्टपर्यंत मुदत

0
77

नवी दिल्ली, ८ ऑगस्ट 
आधार आणि पॅन कार्ड जोडणी करण्यासाठी केंद्र  सरकारने आता ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. नागरिकांची पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणीची प्रक्रिया सरकारने दिलेल्या वेळेतच पूर्ण करावी. अन्यथा पॅन कार्ड रद्द केले जाणार आहे, असे केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारने आधार आणि पॅन कार्ड जोडणे १ जुलैपासून बंधनकारक केले होते. मात्र आता ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकडे आधार कार्ड आहे त्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरताना ते पॅन कार्डासोबत जोडणे बंधनकारक आहे असेही सांगण्यात आले होते.
केंद्रीय अर्थमंत्रलयाने ट्विटरवरून आधार-पॅन लिंक करण्यासाठी महिनाभरासाठी मुदतवाढ जाहीर केली आहे.केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१७-१८ च्या वित्त विधेयाकामध्ये कर प्रस्तावात दुरुस्त्याद्वारे सुधारणा करून आधार अनिवार्य केले आणि यामुळे एकापेक्षा अधिक पॅन कार्डचा वापर करून कर चुकवणार्‍यांवर चाप बसणार आहे. प्राप्तिकर कायद्यातील तरतुदीनुसार येत्या ३१ ऑगस्टपर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र भरताना आधार आणि पॅन एकमेकांशी संलग्न असणे बंधनकारक आहे. असे न करणार्‍या नागरिकांचे पॅन कार्ड रद्द होईल. प्राप्तिकर संकलन वाढवत करचुकवेगिरी करणार्‍या लोकांना लगाम घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारने म्हटले आहे.
सध्या देशात २५ कोटी लोकांकडे पॅन कार्ड आहे. तर १११ कोटी लोकांना आधार कार्ड देण्यात आलेले आहे. मात्र देशात फक्त २.०७ कोटी करदात्यांनीच त्यांचा आधार क्रमांक पॅन कार्डसोबत जोडलेला आहे. (वृत्तसंस्था)