आनंद महिंद्र यांना मिळाले ७.६७ कोटी वेतन

0
61

मुंबई, ८ ऑगस्ट 
महिंद्र अँड महिंद्रचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांना सरलेल्या २०१६-१७ वर्षात तब्बल ७.६७ कोटी रुपये वेतन मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १६.३८ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, आनंद महिंद्र यांचे वेतन कर्मचार्‍यांच्या सरासरी वेतनाच्या १०८.२७ पट अधिक आहे.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या पवन गोयंका यांना वार्षिक ७.३९ कोटी रुपयांचे वेतन मिळाले आहे. त्यांच्या वेतनात ई-सॉप्सच्या मूल्याचा समावेश करण्यात आलेला नाही. गोयंका यांच्या वेतनात गेल्या वर्षीच्या तुलनेत १५.८६ टक्क्यांची वाढ झाली आहे. शिवाय त्यांचे वेतन कर्मचार्‍यांच्या सरासरी वेतनाच्या १०४.४३ पट अधिक आहे.
वाहन क्षेत्रातील प्रमुख भारतीय कंपनी असलेल्या महिंद्र अँड महिंद्रने सरलेल्या जून तिमाहीत ७६८ कोटी रुपयांचा करोत्तर नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत नफ्यात २० टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीने गेल्यावर्षी याच तिमाहीत ९५५ कोटींचा निव्वळ नफा नोंदवला होता.
एम अँड एमचे व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका म्हणाले की, देशभरात १ जुलैपासून वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) लागू करण्यात आला असल्याने कंपनीच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत घसरण झाली आहे. त्यामुळे त्याचा नफ्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाने बीएस-३ वाहनांवर घातलेल्या बंदीमुळे कंपनीला १७१ कोटी रुपयांचा फटका बसला होता.(वृत्तसंस्था)