ओमर मॅक्लियॉडला ११० मी. हर्डल्सचे सुवर्ण

0
75

विश्‍व ऍथ्लेटिक्स स्पर्धा
लंडन, ८ ऑगस्ट 
ऑलिम्पिक विजेता जमैकाचा उमर मॅक्लियॉडने आपल्या देशवासियांच्या चेहर्‍यावर हास्य उमटवित विश्‍व ऍथ्लेटिक्स स्पर्धेत ११० मीटर अडथळ्याच्या शर्यतीचे सुवर्णपदक पटकावले. जमैकाच्या युसेन बपोल्ट व एलिन थॉम्पसनचा शंभर मीटर दौड शर्यतीत पराभव झाल्यानंतर ओमर मॅक्लियॉडने कोणतीही चूक न करता सुवर्णपदक जिंकून बोल्ट व थॉम्पसनच्या पराभवाने मिळालेली निराशा दूर केली. २३ वर्षीय ऍथ्लीट मॅक्लियॉडने १३.०४ सेकंदात शर्यत पूर्ण केली. त्याने हे सुवर्णपदक उसेन बोल्टला समर्पित केले. विश्‍व स्पर्धेत मी जमैकाचा ध्वज उंचावू इच्छित होतो व मी ते केले. बोल्ट अजूनही महान आहे व माझा हा विजय त्याला समर्पित आहे, असे मॅक्लियॉड म्हणाला.
गतविजेता रशियाचा सर्जरी शुबेनकोव्हला (१३.१४ सेकंद) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. हंगेरीच्या ब्लाजस बेजीने १३.२८ सेकंदासह कांस्यपदक मिळाले. विश्‍वविक्रमवीर अमेरिकेचा एरिस मेरिट (१३.३१ सेकंद) पाचव्या क्रमांकावर आला.
निर्मलाने केले निराश
विश्‍व ऍथ्लेटिक्स स्पर्धेत भारताचे निराशाजनक प्रदर्शन सुरूच आहे. महिलांच्या ४००मीटर दौडच्या उपांत्य फेरीत  निर्मला शेरॉन तळाच्या फळीतच राहिली. २२ वर्षीय निर्मलाने ५३.०७ सेकंद अशी वेळ नोंदविली. ही तिच्या ५१.२८ सेकंदाच्या या मोसमातील सर्वोत्तम कामगिरीपेक्षा खराब राहिली. एकूण २४ स्पर्धकांमध्ये निर्मलाने २२ वे स्थान मिळविले.
वेदनेची तमा न बाळगता स्पर्धा पूर्ण केली 
विश्‍व ऍथ्लेटिक्स स्पर्धेत महिलांच्या हेप्टथलॉनमध्ये भारतीय ऍथ्लिट स्वप्ना बर्मन २६ व्या स्थानावर होती. वास्तविक कंबरेमध्ये वारंवार वेदना होऊ लागल्याने मी स्पर्धेतून माघार घेण्याच्या मनःस्थितीत होती, परंतु या वेदनेची तमा न बाळगता मी स्पर्धा पूर्ण केली, असे स्वप्ना म्हणाली.
माझ्या कंबरेमध्ये फारच वेदना होत होत्या. अशा वेदना सर्वप्रथम २०१४च्या इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान झाल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी पहिली स्पर्धा अर्थात १०० मी. अडथळ्याच्या शर्यतीदरम्यान पुन्हा वेदना होऊ लागल्या मात्र त्याकडे दुर्लक्ष करून उर्वरित स्पर्धा पूर्ण केली, असे ती म्हणाली. (वृत्तसंस्था)