विश्‍व ऍथ्लेटिक्समध्ये खेळाडूंना अन्नातून विषबाधा

0
72

लंडन, ८ ऑगस्ट 
विश्‍व ऍथ्लेटिक्स स्पर्धेत अनेक खेळाडूंना अन्नातून विषबाधा झाली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. विषबाधेमुळे अनेक खेळाडूंची प्रकृती बिघडली व त्यामुळे त्यांना नाईलाजाने स्पर्धेतूनच बाहेर व्हावे लागले. बोत्सवानाच्या इसाक मकवालाने जेवण केल्यानंतर त्याच्या पोटात त्रास होऊ लागले. त्यामुळे त्याला  नाईलाजाने २०० मीटरच्या हिटमधून बाहेर व्हावे लागले. आयर्लंडच्या ४०० मी. अडथळ्याचा धावपटू थॉमस बारलासुद्धा उपांत्य फेरीच्या शर्यतीतून माघार घ्यावी लागली.
अनेक संघांनी त्यांच्या अधिकृत हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर पोटीच्या समस्या निर्माण झाल्याची तक्रार केली असे सोमवारी रात्री उशीरा लंडन विश्‍व ऍथ्लेटिक्स स्पर्धेच्या आयोजकांनी मान्य केले. अनेक खेळाडूंच्या पोटात वायुचा त्रास होऊ लागला, तर काहींचे पोट बिघडले. आजारी पडलेल्या सर्व खेळाडूंवर एलओसी व मेडिकल स्टाफद्वारे उपचार करण्यात येत आहे. याशिवाय परिस्थितीवर नियंत्रण राखण्यासाठी आम्ही इंग्लंड सार्वजनिक आरोग्य संस्थेचीसुद्धा मदत घेत आहे, असे आयोजकांनी सांगितले. ज्या-ज्या ठिकाणी खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था केली आहे, त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत डॉक्टर्स व सहकारी स्टाफला निर्देश दिले आहे.
स्पर्धेतून बाहेर झालेल्या बोत्सवानाच्या इसाक मकवालाने आपल्या फेसबुक पेजवर सांगितले की, माझ्यासोबत हॉटेलमध्ये राहत असलेले अन्य खेळाडूसुद्धा आजारी पडले आहे. आयएएएफच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मला अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यामुळे अनेक खेळाडूसुद्धा आमच्या हॉटेलमध्ये आजारी पडले. मला हिटमधून बाहेर व्हावे लागले, परंतु आता मला शर्यतीत उतरण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा करीत आहो.
४०० मीटर्स दौड शर्यतीत मकवाला विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारापैकी एक होता, परंतु वैद्यकीय सल्ल्यानुसार त्याला हिटमधून बाहेर राहावे लागले. जर मी फिट झालो, तर मला शर्यतीत भाग घेण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा करीत आहे. मला रात्री पोटातील वायुचा त्रास झाला. त्यामुळे अस्वस्थ वाटत होते. मी पूर्ण वर्षभर विश्‍व स्पर्धेवर आपले लक्ष केंद्रित केले होते. परंतु विषबाधेमुळे मला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागल्याने दुःख होत आहे, अशा भावना ४०० मी. हर्डल्स धावपटू थॉमस बारने व्यक्त केल्या. (वृत्तसंस्था)