भारताला विदेश भूमीवर इतिहास रचण्याची संधी

0
104

नवी दिल्ली, ८ ऑगस्ट 
आपल्या ८५ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात आतापर्यंत केवळ एकवेळा विदेशी भूमीवर एखाद्या मालिकेत तीन कसोटी सामने जिंकणार्‍या भारतीय संघाला आता श्रीलंकेविरुद्ध विद्यमान कसोटी मालिकेत केवळ सुमारे ५० वर्षांनंतर या उपलब्धीची पुनरावृत्ती करण्याचीच नव्हे, तर विदेशात पहिल्यांदा सलग तीन कसोटी सामने जिंकण्याचीसुद्धा सुवर्णसंधी आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने श्रीलंकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने सहज जिंकले. आता जर पल्लेकेल येथे १२ ऑगस्टपासून प्रारंभ होणार्‍या तिसर्‍या व अंतिम कसोटी सामन्यातसुद्धा आपले विजयी अभियान कायम राखले तर भारतीय संघाने विदेशी भूमीवर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप करण्याची ही पहिलीच वेळ असेल.
यापूर्वी भारताने केवळ एकदाच विदेशी भूमीवर एखाद्या मालिकेत तीन कसोटी सामने जिंकले आहे. मन्सूर अली खॉं पतौडीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने फेब्रुवारी-मार्च १९६८ मध्ये न्यूझीलंडला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने हरविले होते. यादरम्यान भारताने ड्यूनेडिन येथील पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर ख्राईस्टचर्च येथे दुसरा कसोटी सामना गमावला होता. त्यानंतर वेलिंग्टन व ऑकलंड कसोटी सामने जिंकले होते. विद्यमान मालिकेपूर्वी भारताला १९८६ मध्ये इंग्लंडमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका जिंकण्याची संधी होती, परंतु कपिलदेवच्या संघाने पहिले दोन कसोटी सामने जिंकल्यानंतर तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राखला होता. पाकिस्तानविरुद्ध २००४ मध्ये पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर भारताने दुसरा सामना गमावला, परंतु तिसरा कसोटी सामना जिंकून मालिका खिशात घातली होती. भारताने विदेशात क्लीन स्वीप केवळ बांगलादेश व झिम्बाब्वेविरुद्ध केले आहे, परंतु मालिका एक किंवा दोन कसोटी सामन्यांचीच होती. (वृत्तसंस्था)