‘एक मराठा, लाख मराठा’ मोर्चाचा समारोप

0
34

मुंबई, ९ ऑगस्ट 
‘एक मराठा, लाख मराठा’ घोषणा देत राज्यभरातून आलेल्या मराठा बांधवांनी आज बुधवारी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारला. ओबीसींप्रमाणेच मराठा विद्यार्थ्यांना सवलती देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. सरकारच्या या आश्‍वासनानंतर मराठा मोर्चाचा समारोप करण्यात आला.
क्रांतीदिनाचे औचित्य साधून राजधानी मुंबईत आज सकाळी ११ वाजता भायखळ्याच्या वीर जिजामाता उद्यानापासून सुरू झालेला मोर्चा दोन तासात शिस्तबद्धपणे आझाद मैदानात दाखल झाला. आझाद मैदानात पोहोचल्यानंतर या मोर्चातल्या तरुणींनी आपल्या मनातला आक्रोश उपस्थित जनसागरासमोर मांडला, तर मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. यात कोपर्डीतल्या नराधमांना फाशी द्यावी, मराठा समाजाला आरक्षण द्या आणि ऍट्रॉसिटी कायद्यामध्ये आवश्यक बदल करण्यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.
आशिष शेलार यांना मज्जाव
भाजप आमदार आशिष शेलार यांनी आझाद मैदानात येण्यास मराठा कार्यकर्त्यांकडून मज्जाव करण्यात आला. मराठा मोर्चेकर्‍यांनी घोषणाबाजी करून आशिष शेलार यांना धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आपल्याला धक्काबुक्की झाली नसल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे पोस्टर फाडले
भायखळ्यातील जिजामाता उद्यानाजवळ शिवसेनेने लावलेले मराठा क्रांती मोर्चाचे पोस्टर फाडण्यात आले. मोर्चात राजकारण नको म्हणून केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर ठेवत इतर पोस्टर फाडून टाकण्यात आली. राजकारण न करण्यावर मोर्चेकरी ठाम आहेत. मोर्चात यायचे असेल तर मराठा म्हणून या, नेता किंवा राजकारणी म्हणून नको, अशा सूचना मोर्चेकरी देत आहेत.
संभाजीराजेंची हजेरी
मुंबई मराठा मोर्चात कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनीही हजेरी लावली. संभाजी राजे आझाद मैदानात जाऊन सर्वसामान्य मोर्चेकर्‍यांसोबत बसले. मी छत्रपती म्हणून नाही, मी खासदार म्हणून नाही, मी एक सामान्य मराठा समाजाचा घटक म्हणून या मोर्चात सहभागी झालो आहे, असे संभाजीराजे म्हणाले. मोर्चापूर्वी त्यांनी म्हटले होते की, मोर्चे कसे असावे, हे मराठा मोर्चाने जगाला दाखवले आहे. ज्याप्रमाणे राज्यभरात ५७ मोर्चे झाले, त्याप्रमाणे मुंबईतील हा ५८ वा मोर्चे असेल. हा मोर्चाही शांततेत काढावा, आपला संदेश जगाला द्यावा, जगाला हेवा वाटेल असा हा शेवटचा मोर्चा काढावा, कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन संभाजीराजेंनी शेवटच्या मोर्चाच्या निमित्ताने केले होते.
टोलनाक्यांवर वसुली बंद
मुंबईतील मराठा मोर्चाच्या पृष्ठभूमीवर, मुंबईकडे येणार्‍या सर्व टोलनाक्यांवरील वसुली कालपासून बंद होती. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारने ही खबरदारी घेतली. टोलवसुली बंद ठेवण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी टाळता आली.
ऍम्बुलन्सने सहज वाट काढली
मराठा क्रांती मोर्चांच्या शिस्तप्रियतेचे दर्शन आज मुंबईच्या रस्त्यावरही दिसले. जे जे उड्डाणपुलावरून आझाद मैदानात मोर्चा दाखल झाल्यानंतर, मोर्चातल्या स्वयंसेवकांनी मागे झालेला कचरा गोळा करून परिसराची स्वच्छता केली. दुसरीकडे जे जे उड्डाणपुलावरच एक ऍम्ब्युलन्स जात असताना तिला कोणताही अडथळा होणार नाही, याची काळजी मराठा मोर्चेकर्‍यांनी घेतली. इतकेच नाही, तर मोर्चाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत मराठा आंदोलकांनी रस्त्याची एक लेन पूर्णपणे रिकामी ठेवली होती. गेल्या ५७ मोर्चांमध्ये दाखवलेली शिस्त आजच्या मुंबईच्या मोर्चातही ठळकपणे दिसली.