लाईफ पार्टनर निवडण्यासाठी सारस चौपाल

0
42

राहुल जोशी
गोंदिया, ९ ऑगस्ट 
संमेलन म्हटले की, साहित्य संमेलन आठवते तसेच विविध समाजांमधील वधू-वर परिचय मेळावा डोळ्यांपुढे येतो. परंतु पशु-पक्ष्यांमध्ये अशा प्रकारच्या संमेलनाची संकल्पना केवळ परिकथाच वाटेल. मात्र हे वास्तव आहे. प्रेमाचे प्रतीक समजल्या जाणार्‍या सारस पक्ष्यांचे संमेलन नुकतेच गोंदिया-बालाघाट जिल्ह्याच्या सीमेवर भरले होते. अत्यंत दुर्मिळ व मनमोहक अशा प्रसंगाचा लाभ अनेक पर्यटकांनीही घेतला. जोडीदार शोधण्यासाठी पक्ष्यांच्या संमेलनाची अनोखी परंपरा या निमित्ताने जगापुढे आली आहे.
सारस पक्ष्याला प्रेमाचे प्रतीक समजले जाते. कारण हा पक्षी कायम जोडीदारासोबतच वावरत असतो. राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यात अधिवास असलेल्या या पक्ष्यांबाबत अनेक कुतुहलाचे विषय चर्चेत येत असतात. विशेषतः या पक्ष्याचा जोडीदारासोबतचा सहवास.
अशा या जोडीदाराची निवड करण्यासाठी पक्ष्यांकडून संमेलनाचे आयोजन अकल्पनीयच वाटत असले तरी हे वास्तव आहे. काही दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्यातील सीमावर्ती भागात सारस पक्ष्यांचा वेगळ्या संमेलनाची अनुभूती अनेक पक्षिप्रेमींनी अनुभवली व जोडीदार निवडीच्या पक्षी परंपरेचे दुर्मिळ दर्शन यानिमित्ताने घडले.
गोंदिया व बालाघाट जिल्ह्यातील सारस पक्षी एकत्रित येतात व वेगवेगळे आवाज तसेच नृत्य करून आपल्या जोडीदाला आकर्षित करतात. सारसांचे मिलन हा दुर्मिळ योग असला तरी त्याहून अधिक दुर्मिळ हे संमेलनसुद्धा आहे. पक्षीतज्ज्ञांनुसार या आधी १९७० मध्ये जिल्ह्यातील नवेगावबांध या क्षेत्रात असे संमेलन भरल्याचे पुरावे आहेत व त्यानंतर २०१३ व १४ ला अशाप्रकरचे संमेलन भरले होते. मात्र तीन वर्षानंतर यंदा असा दुर्मिळ योग पक्षी मित्रांना अनुभवायला मिळाला.
यंदा हे संमेलन गोंदिया जिल्ह्यातील दोन ठिकाणी झाले. एकात १३, तर दुसर्‍यात १२ सारस पक्ष्यांचा समावेश होता. यानिमित्ताने सारस पक्षी आपला जोडीदार निवडतो व याच जोडीदाराबरोबर आपले अख्खे आयुष्य घालवितो, या माहितीचा इतरांना उलगडा झाला. काही कारणास्तव एखाद्या जोडीदारापैकी एकाचा मृत्यू झाल्यास दुसरा आत्महत्या करून आपल्या अतूट प्रेमाची जणू साक्षच देत असतो, ही वस्तुस्थिती देखील जगजाहीर झाली. काही वर्षापूर्वी हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर होता. मात्र जिल्ह्यात या पक्ष्याच्या संवर्धनासाठी कार्य करणार्‍या संस्थांमुळेच आज त्यांची संख्या वाढत आहे.

आदिवासींच्या गोटूल परंपरेशी साम्य
सारस संमेलनातून जोडीदार निवडण्याची ही परंपरा काहीशी आदिवासी समाजातील गोटूल परंपरेशी मिळती जुळती आहे. आजघडीला जिल्ह्यात सारस संमेलन भरणे हा अतिशय शुभ संकेत असून, यामुळे दुर्मिळ होत चाललेल्या या पक्ष्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. हे संमेलन साधारणतः जुलै, ऑगस्ट महिन्यात भरत असून, एक आठवडा ते पंधरा दिवस चालते असे पक्षी तज्ज्ञ सांगतात. या दुर्मिळ परंपरेची प्रचिती घ्यायची असेल तर एकदातरी ‘सारस नगरी’ संबोधण्यात येणार्‍या गोंदिया जिल्ह्याला भेट द्यावी लागेल.