दोन आमदारांची चूक पटेलांच्या पथ्यावर

0
107

नवी दिल्ली, ९ ऑगस्ट 
गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी मंगळवारी झालेली निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक राहिली. या आधी देशात राज्यसभेच्या अनेक निवडणुका झाल्या, पण या निवडणुकीत जेवढा हायव्होल्टेज ड्रामा झाला, तेवढा या आधी कोणत्याही निवडणुकीत झाला नाही. या निवडणुकीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी आणि कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल विजयी झाले. कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी अतिउत्साहात केलेली चूक अहमद पटेल यांच्या पथ्यावर पडली आणि पाचव्यांदा राज्यसभेत जाण्यात ते यशस्वी ठरले.
या निवडणुकीत अमित शाह आणि स्मृती इराणी यांचा विजय निश्‍चित होता, प्रश्‍न फक्त अहमद पटेल यांच्या विजयाबाबत होता. या निवडणुकीत अहमद पटेल विजयी झाले असले तरी भाजपाने केलेल्या व्यूहरचनेमुळे त्यांच्याच नाही तर कॉंग्रेस पक्षाच्या तोंडचेही पाणी पळाले होते. त्यामुळेच यावेळची निवडणूक माझ्यासाठी अतिशय कठीण होती, असे अहमद पटेल यांना म्हणावे लागले. अहमद पटेल विजयी झाले असले तरी कॉंग्रेस पक्षाला अनेक मुद्यांचा गंभीरपणे विचार करावा लागणार आहे.
राज्यात यावर्षीच्या अखेर होणार्‍या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवत भाजपाने अहमद पटेल यांना पराभूत करण्याचा चंग बांधला होता. राज्यसभा निवडणुकीत अहमद पटेल यांचा पराभव झाला असता तर त्याचा परिणाम कॉंग्रेसच्या मनोधैर्यावर झाला असता. राज्यात कॉंग्रेसचे संख्याबळ ५७ होते. सहा आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे कॉंग्रेसजवळ ४४ आमदार उरले. हे ४४ आमदार फुटू नये, यासाठी कॉंग्रेसने त्यांना बंगळुरु येथे नेले. मात्र त्यानंतरही या ४४ आमदारांना आपल्यासोबत ठेवण्यात कॉंग्रेसला यश आले नाही.
या ४४ पैकी भोलाभाई गोहील आणि राघव पटेल या दोन आमदारांनी कॉंग्रेसच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे कॉंग्रेसने आपली संपूर्ण ताकद या दोन आमदारांची मते अवैध घोषित करण्यावर लावली. या आमदारांची मते अवैध घोषित झाली नसती तर अहमद पटेल यांचा पराभव निश्‍चित होता. भाजपालाही याची जाणीव होती. त्यामुळे या दोन आमदारांची मते अवैध ठरू नये, यासाठी भाजपानेही आपली पूर्ण ताकद पणाला लावली. त्यामुळे गुजरातमधील निवडणुकीसाठी दिल्लीतील निवडणूक आयोगाचे कार्यालय भाजपा आणि कॉंग्रेस यांच्यासाठी आखाडा झाला. तीन तासात कॉंग्रेस आणि भाजपाच्या प्रतिनिधी मंडळाने प्रत्येकी ३ वेळा निवडणूक आयोगाची भेट घेतली, हा एक विक्रम होता.
कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी अतिउत्साहात केलेली चूक अहमद पटेल यांच्या पथ्यावर पडली. मतदान करतांना त्यांनी आपल्या मतपत्रिका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, स्मृती इराणी आणि बलवंतसिंह राजपूत यांना दाखवल्या. जे नियमाला धरून नव्हते. कॉंग्रेसने याचा फायदा करून घेण्यासाठी आकांडतांडव केले आणि या आमदारांची मते मोजणीतून बाद ठरवण्यात त्यांना यश आले . राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आधी ४५ चा कोटा ठरवण्यात आला होता. हा कोटा ठरवण्याची एक पद्धत असते. जेवढे आमदार मतदानास पात्र असतील त्याला जेवढ्या जागेसाठी मतदान आहे, त्यात एक मिळवून भागाकार केला जातो. जेवढे उत्तर येईल त्यात एक मिळून कोटा ठरवला जातो. सुरुवातीला १७६ ला ३ अधिक १ असे ४ ने भागल्यामुळे ४४ आले त्यात एक मिळवून ४५ चा कोटा ठरला. मात्र कॉंग्रेसच्या दोन आमदारांची मते खारिज झाल्यामुळे १७४ ला ४ भागल्यामुळे ४३.५ आले. राऊंडफिगर म्हणून ४३ अधिक १ असे पकडून ४४ चा कोटा निश्‍चित करण्यात आला. अहमद पटेल यांना नेमकी एवढीच म्हणजे ४४ मते पडल्यामुळे ते विजयी झाले. याचाच अर्थ कॉंग्रेसच्या दोन आमदारांची मते बाद झाली नसती तर अहमद पटेल यांचा विजय कठीण होता. त्यामुळेच या दोन आमदारांची मते रद्द करावी अशी मागणी कॉंग्रेस करत होती, तर या आमदारांची मते बाद करू नये, असा भाजपाचा आग्रह होता.
अहमद पटेल यांची लाज खर्‍या अर्थाने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि जदयुने राखली. राष्ट्रवादीच्या जयंत पटेल आणि जदयुच्या छोटू वसावा यांनी अहमद पटेल यांना मतदान केल्यामुळे ते विजयी झाले. गंमत म्हणजे यातही राष्ट्रवादी कॉंग्रेसने नेहमीप्रमाणे घोळ घातला. राष्ट्रवादीने आधल्या दिवसापर्यंत तळ्‌यात-मळ्यात अशी भूमिका घेतली आणि शेवटच्या क्षणी व्हीप जारी केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन आमदारांपैकी एकाने भाजपाला तर दुसर्‍याने कॉंग्रेसला मतदान केले. जदयुची स्थितीही तशीच होती. बिहारमधील नव्या समीकरणानुसार जदयु भाजपाला पाठिंबा देईल असे वाटत होते, त्यामुळे आम्ही भाजपाच्या बाजूने मतदान केले असे जदयुचे नेते के. सी. त्यागी सांगत होते, तर प्रत्यक्ष मतदान करणारे छोटूभाई वसावा मात्र आपण कॉंग्रेसला मतदान केल्याचे सांगत होते.

अमित शाह, स्मृती इराणी यांचा विजय
गांधीनगर, ९ ऑगस्ट 
कॉंग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी गुजरात राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवत आपली जागा कायम राखली. अन्य दोन जागांवर अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी विजय मिळवला. अहमद पटेल यांना ४४ मते मिळालीत.
गुजरातमधील राज्यसभेतील तीन जागांसाठी मंगळवारी निवडणूक पार पडली. यात अमित शाह, स्मृती इराणी यांची उमेदवारी होती. तिसर्‍या जागेसाठी भाजपाने कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांच्याविरोधात बलवंतसिंह राजपूत यांना रिंगणात उतरवले. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. अमित शाह, स्मृती इराणींचा विजय शक्य असला तरी अहमद पटेल यांच्या विजयाबाबत धाकधूक होती. कॉंग्रेस आमदारांच्या राजीनामा सत्रामुळे पटेल यांचा पराभव होतो की काय अशी शक्यता होती. मात्र निवडणुकीत पटेल यांनी भाजपला धक्का देत विजय मिळवला. पटेल यांना ४४ मते पडली असून राजपूत यांना फक्त ३८ मतेच मिळाली.
अहमद पटेल हे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार असून कॉंग्रेसमधील एक वजनदार नेतृत्व मानले जाते. भाजपाने पटेल यांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले होते. त्यात भाजपाला विजयाच्या सीमेपर्यंत पोहोचलेही होते. मात्र, कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी मतदानानंतर भाजपाध्यक्ष अमित शाह यांना मतपत्रिका दाखवल्याने या निवडणुकीला नाट्यमय वळण मिळाले. शाह यांना मतपत्रिका दाखवणार्‍या आमदारांची दोन मते निवडणूक आयोगाने बाद ठरवली. भाजपाने कॉंग्रेसच्या बाजूने लागलेल्या या निर्णयाला आवाहन दिल्याने मतमोजणी आणखी लांबणीवर पडली. अखेर सव्वा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर अहमद पटेल यांचा विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले.
सत्यमेव जयते
गुजरातमधील राज्यसभेच्या निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करणार्‍यांचा पराभव झाला, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांनी भाजपावर टीका केली. ‘सत्यमेव जयते’ असेही पटेल आपल्या प्रतिक्रियेत म्हणाले. भाजपाकडून येणारा दबाव आणि प्रतिकूल परिस्थितीतही आपण मला मत दिले, असे सांगत पटेल यांनी गुजरातमधील कॉंग्रेस आमदारांचे आभार मानले. सूडाचे राजकारण करणार्‍या भाजपाचे पितळ उघडे पडले. राजकीय दहशतवाद पसरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता आगामी विधानसभा निवडणुकीत गुजरातमधील जनताच त्यांना धडा शिकवेल, असे पटेल यांनी म्हटले आहे.