ओबीसींप्रमाणेच मराठा विद्यार्थ्यांना सवलती!

0
71

– मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही
– मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्याची घोषणा
मुंबई, ९ ऑगस्ट 
इतर मागासवर्गीय समाजातील (ओबीसी) विद्यार्थ्यांना जितक्या सवलती मिळतात, तितक्याच सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
६०५ अभ्यासक्रमांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार आहे. मराठा मोर्चाबाबत विधानसभेत झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन दिले. या निवेदनाद्वारे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही दिली. मागासवर्गीय आयोगाकडे आपण याचा पाठपुरावा करणार आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी विहित कालावधीची मर्यादा देणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजातील विविध अडचणी सोडविण्यासाठी मंत्रिमंडळाची एक उपसमिती गठित कण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ही समिती दर तीन महिन्यात एकदा समाजातील संघटनेशी चर्चा करेल. मराठा समाजाच्या निघालेल्या राज्यव्यापी मोर्चाच्या बाजूने संपूर्ण विधानमंडळ असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.
छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना ओबीसींप्रमाणे आता मराठा समाजासाठीही आणली जाईल. तसेच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ६ लाख रुपयांच्या ईबीसी मर्यादेसाठी ६० टक्के गुणांची अट ५० टक्क्यांवर आणली. ६०५ अभ्यासक्रमांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सवलत मिळेल. यापूर्वी फक्त ३५ अभ्यासक्रमांसाठीच मराठा समाजाला सवलत होती. तसेच आण्णासाहेब पाटील महामंडळांकडून तीन लाख शेतकर्‍यांच्या मुलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. तर १० लाख रुपये पर्यंतच्या बँक कर्जावरील व्याजावर सवलत देण्यात येईल. बार्टीच्या धर्तीवर मराठा समाजातील मुलांच्या विकासासाठी सारथी ही संस्था गठित करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करणार असून यासाठी पाच कोटी दिले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ज्या १८ जातींना प्रमाणपत्र देण्यास अडचणी येत आहे ती अडचण लवकरच सोडविण्यात येणार असून, रक्ताच्या नात्यात एक पडताळणी प्रमाणपत्र असले ते ग्राह्य धरण्यासही लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा खटला अंतिम टप्प्यात असून लवकरच युक्तिवाद सुरू होईल. या प्रकरणात एका साक्षीदाराचा जबाब शिल्लक आहे. याबाबत सरकारकडून कोणताही उशीर होत नाही, अशी माहिती फडणवीस यांनी विधानसभेत दिली. मराठा मोर्चासंदर्भात आज विधानसभेत चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केले. दरम्यान, भाजप आमदारांनी तिकडे विधान भवनाच्या पायर्‍यांवर घोषणाबाजी करत, मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी केली.
शरद पवारांचे ट्विट
मराठा समाजाने मुंबईत काढलेल्या मराठा क्रांती मूकमोर्चावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या सर्वसमावेशक प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहत नव्या पिढीच्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी योग्य पाउले टाकली जातील, अशी अपेक्षा त्यांनी ट्विटरवर व्यक्त केली. तत्पूर्वी त्यांनी आज मुंबईमध्ये मराठा मोर्चा हा अत्यंत शांततेने होत आहे आणि आपली भूमिका मोर्चेकरी शासनाकडे मांडतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
मान्य केलेल्या मागण्या
– ओबीसींप्रमाणे मराठा समाजासाठी छत्रपती शाहू महाराज योजना
– अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून तीन लाख मराठा तरुणांचे कौशल्य प्रशिक्षण
– दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज
– प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधणार
– मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ६ लाखांच्या ईबीसी मर्यादेसाठी ६० टक्के गुणांची अट ५० टक्क्यांवर
– ६०५ अभ्यासक्रमांमध्ये मराठा आणि मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना सवलत
– मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती नेमून दर तीन महिन्याला समन्वय व आढावा
– बार्टीच्या धर्तीवर मराठा मुलांच्या विकासासाठी सारथी संस्था (तभा वृत्तसेवा)