भारतीय लष्कर ताकदवानच 

0
52

– अरुण जेटली यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली,९ ऑगस्ट 
भारताचे लष्कर ताकदवान असल्याने गेल्या काही दशकात अनेक आव्हाने स्वीकारली आहेत. हे जवान देशाच्या संरक्षणासाठी कोणत्याही आव्हानाचा सामना करू शकते. १९६२ च्या युद्धातून आम्हाला चांगला अनुभव मिळाला आहे, असे ठाम वक्तव्य संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी केले.
ते १९४२ च्या महात्मा गांधींच्या भारत छोडो आंदोलनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते. जेटली म्हणाले की, आम्ही आजही शेजारी देशांच्या आव्हानाचा सामना करत आहोत. १९६२ च्या तुलनेत १९६५ आणि १९७१च्या युद्धामुळे भारतीय लष्कर मजबूत झाले आहे. १९६२ मध्ये भारताला चीनकडून लादण्यात आलेल्या युद्धाचा सामना करावा लागला होता. त्या युद्धात भारताचे मोठे नुकसान झाले असले तरी १९६५ आणि १९७१ मध्ये झालेल्या पाकिस्तानसोबतच्या युद्धात भारताने विजय मिळवला होता.
स्वातंत्र्याच्या नंतर लगेचच आपण काही अडचणींचा सामना केला. शेजारील राष्ट्राची नेहमीच काश्मीरवर नजर होती. आजही देशाचा एक भाग आमच्यापासून वेगळा झाल्याचे  आम्ही विसरू शकत नाही. पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात समाविष्ट करावा, अशी अनेक भारतीयांची इच्छा आहे. देश दहशतवाद आणि नक्षलवादासारख्या मोठ्या आव्हानांचा सामना करत आहोत. राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांना दहशतवादामुळेच स्वतःचा जीव गमावावा लागला आहे. सुरक्षा दलाचे जवान जम्मू-काश्मीरला दहशतवादापासून मुक्त करण्यासाठी मोठे योगदान देत आहेत. (वृत्तसंस्था)