शेती व शेतकर्‍यांचे स्वातंत्र्य केव्हा?

0
25

वास्तव
देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झालीत. साधारणपणे इ. स. ११०० ते १२०० च्या दरम्यान परकीय आक्रमकांनी आपल्या भारत देशावर आक्रमणे केलीत. कशासाठी त्यांनी आपल्या देशावर आक्रमण केले? याचा जर अभ्यास केला, तर शेतीतून आलेल्या समृद्धीची लूट करण्यासाठी! असे उत्तर मिळेल. जवळजवळ ७०० वर्षे या आक्रमकांनी या देशावर राज्य केले. आपल्या देशातील संपत्तीची लूटतर केलीच, पण स्थानिक लोकांचा विरोध मोडून काढण्यासाठी धर्मांतरेही केलीत. आपल्याच रक्ताची नाती असलेली प्रजा त्यामुळे आपल्यापासून दूर गेली. दूर गेलेल्या स्वकीयांना पुन्हा आपल्यात घेण्यासाठी धर्ममार्तंडांनी केलेल्या मूर्खपणामुळे शक्यता दुरावली. सततच्या लढायांमुळे शेतीची होणारी लूट व नासधूस यामुळे शेतकरी हतबल झाला. अशी ७०० वर्षे परकीयांच्या गुलामगिरीत रयतेने काढली. या आक्रमकांना स्थानिक लोकांनी त्यांची सरदारकी व वतनदारी मिळवून त्यांना साथ दिली.
नंतरचा काळ १५० वर्षे इंग्रज राजवटीचा. आपल्या देशातील लोकांना गुलामगिरीची इतकी सवय रक्तात भिनली की, मोगलांची राजवट केव्हा संपली व इंग्रजी राजवट केव्हा चालू झाली, हे सामान्य शेतकर्‍याला कळलेसुद्धा नाही! कारण इंग्रजांच्या मदतीला तेच हात होते जे पूर्वी मोगलांच्या राजवटीला मदत करीत होते. लुटारू बदलला, एवढाच काय तो फरक!
१९४७ साली या देशाला स्वातंत्र्य मिळाले. गोरे जाऊन काळे आले, एवढाच काय तो बदल! पं. नेहरूंनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात, परकीयांनी लुटीच्या तंत्राचा जो प्रयोग पूर्वी केला त्याच धोरणाचा पुरस्कार केला. शेतीच्या शोषणातूनच देशात औद्योगिक क्रांती करण्याचा मानस व्यक्त केला. घटनेत नसलेले कलम १९५१ च्या लोकसभेत तसा कायदा करून तो पास केला. पूर्वी मोगल व इंग्रजांना मदत करणारे हात, याही वेळेस नेहरूंच्या या दुष्टनीतीला मदत करण्यास पुढे आले.
आपल्याच जातिधर्माचे लोक आपल्याला लुटणार आहेत हे, त्या काळातील अशिक्षित समाजाला समजले नाही. आपल्याच जातीचा नेता राज्यकारभार करणार, याचाच त्याला आनंद झाला. पूर्वी जे सरदार म्हणून मिरवत होते त्यांचे स्वातंत्र्यात नेत्यात रूपांतर झाले! जनतेनेही त्यांच्यावर विश्‍वास टाकला. पं. नेहरूंनी लोकसभेत परिशिष्ट ९ व शेतीच्या शोषणाचा कायदा मांडला. या कायद्याला, शेतीवर जगणार्‍या बहुजन समाजाच्या नेत्यांना नेहरूंना विरोध करणे जमले नाही किंवा गुलामी करण्याची इतकी सवय अंगवळणी पडली होती की, बिनविरोध ते बिल पास केले गेले. आज देशात शेतकर्‍यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत त्याचे मूळ कारण या नेहरूनीतीत दडले आहे!
आश्‍चर्य याचे वाटते की, शेती व्यवसायावर आणल्या जात असलेल्या जाचक कायद्यांचा, शेतीवर जगणार्‍या बहुजन समाजावर काय विपरीत परिणाम होईल, हा एकतर त्या काळच्या नेत्यांच्या बुद्धिपलीकडचा विषय असेल किंवा समजूनउमजून स्वत:ची नेतृत्वाची खुर्ची कायम ठेवण्यासाठी बहुजनांचा बळी घेण्यास संमती दिली असेल.
औद्योगिक विकास करण्यास कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही. पण, त्यासाठी शेतकरी व शेती व्यवसायाचा गळा दाबण्याची काय गरज होती? शेतीच्या समृद्धीतून औद्योगिक विकास करणे सहज शक्य होते. जपान हा देश त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. नेहरूंना समाजवादाचे मोठे आकर्षण. सार्‍या गोष्टी सरकार करणार. त्यासाठी नोकरशाहीचे भूत जनतेच्या मानगुटीवर बसवले. देशाच्या महसुली उत्पन्नाचा जास्तीत जास्त भाग त्यांना पोसण्यातच जातोय्. सरकारी उद्योग भ्रष्ट व्यवस्थेमुळे डबघाईस आले. त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी सरकारी मदतीचा ओघ सुरू झाला. परिणाम, जनतेच्या कल्याणासाठी पैशाची कमतरता!
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेती व्यवसाय डबघाईस आला. शेतीवर जगणारा समाज नोकरशाहीच्या थाटामाटाने तिकडे आकर्षित झाला. शेतकर्‍यांची पोरे शेती सोडून नोकरी-व्यवसायाकडे वळली. समाज पुन्हा स्वातंत्र्याकडून गुलामगिरी करण्याकडे वळला. बहुजनांना शेतीचे स्वातंत्र्य पुन्हा परत मिळविण्याची मानसिकता नाही. मात्र, नोकरी म्हणजे सुखासीन गुलामगिरी करण्यासाठी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरण्याची तयारी करीत आहेत, ही दुर्दैवाची बाब होय.
शेती व्यवसायावर असलेले संपूर्ण जाचक कायदे मोडीत काढून, जगाच्या बाजारपेठेत त्याला स्पर्धा करण्याची जेव्हा संधी मिळेल तेव्हाच शेतकरी स्वतंत्र होईल. तेव्हाच देश खर्‍या अर्थाने स्वतंत्र झालेला असेल! मात्र, अशी आशा आजच्या तरुण पिढीमध्ये जागृत करण्याची ताकद एकाही राजकीय नेत्यामध्ये नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
जयंत बापट
९४२१७७५६१६