जिज्ञासा

0
27

प्रबोधन
एखादी गोष्ट किंवा त्या गोष्टीमागील गोष्ट, एखादी घटना किंवा त्या घटनेमागील घटना, एखादे वास्तव किंवा त्या वास्तवामागचे वास्तव, खरे-खोटे, खर्‍यामागील खोटे किंवा खोट्यामागील खरे… हे सारे जाणून घेण्याची कित्येकांना आवड असते, कुणाचा तो स्वभाव असतो, कुणाचा तो डाव असतो, तर कुणाची ती स्वाभाविक जिज्ञासा असते. आपल्या प्रत्येकाच्याच मनात जिज्ञासा ही असतेच असते; परंतु त्याचे प्रमाण हे व्यक्तिपरत्वे कमी अथवा जास्त असते. जिज्ञासेचे प्रमाण कमी असणारे काही काळ तग धरतात आणि कालांतराने त्यांची जिज्ञासा लोप पावते. काहींचे मात्र असे नसते. त्यांची जिज्ञासा इतकी उच्चकोटीला पोहचलेली असते की, त्याची पूर्तता होतपावेतो ते स्वस्थ बसूच शकत नाही, त्यांची जाणून घेण्याची तीव्रता त्यांना अस्वस्थ करून सोडते.
मनुष्यस्वभावात जिज्ञासा कधी आणि कशी जागृत होते असे जर विचारले गेले, तर त्याचे उत्तर ते त्याच्या बाल्यावस्थेत त्याला थोडीशी समज आल्यावर, असे नक्कीच देता येईल. महत्त्वाचे म्हणजे केवळ मनुष्यप्राण्यातच नव्हे, तर इतर प्राणिमात्रांमध्येही जिज्ञासा हा गुणधर्म असतोच. या जिज्ञासेमुळेच काहीतरी मिळविण्याची सवय त्याला लागत असते. म्हणजे काहीतरी मिळविण्यासाठी ते काहीतरी नक्की काय आहे? कसे आहे? कुठे आहे? किती आहे? या क पासून त्याची सुरुवात होते आणि ते जाणून घेतल्यावर, त्याचा स्वत:ला होणारा उपयोग लक्षात आल्यावर ती जिज्ञासा संपेल असं नसतं, तर ती कशी मिळवायची यासाठीची जिद्द किंवा खुमखुमी अंगात येत असते.
जिज्ञासा ही योग्य विषयासाठी, योग्य कारणासाठी अथवा योग्य कार्यासाठी जागृत होत असली, तर त्यासाठीची पावलेसुद्धा योग्य मार्गाने पडत असतात. परंतु अयोग्य, असाध्य आणि विकृत विषयासाठी निर्माण झालेली जिज्ञासा ही वाट लावणारी आणि वाटेला लावणारी ठरत असते. योग्यतापूर्ण जिज्ञासा ही बुद्धिवर्धक, ज्ञानवर्धक आणि लक्ष्यतेच्या साध्यतेसाठी साहाय्यकारी ठरत असते आणि त्यामुळे ती स्वार्थविरहित समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत असते. परंतु, व्यक्तिगत स्वार्थपूरक विषयासाठी जागृत झालेली जिज्ञासा ही संकुचित आणि समाजहिताला अडसर, अडचणीची आणि अविवेकी ठरत असते.
जिज्ञासा हा कुणाचा स्वभावगुण असतो, ती कुणासाठी विरंगुळा असते, तर कुणाची ती आवड असते. काही स्वभावगुण असे असतात की, त्यांच्यातील जिज्ञासा हा गुणधर्म केवळ त्यांच्यापुरता मर्यादित असतो. त्या जिज्ञासेची व्याप्ती त्यामुळे वाढत नाही आणि त्यामुळे कालांतराने ती जिज्ञासा लुप्त होत जाते. काहींच्या जिज्ञासा या काही काळापुरत्याच मर्यादित असतात आणि त्यामुळे त्याची व्याप्ती ही कालांतराने कमी कमी होत जाते आणि काळाच्या ओघात संपूनही जाते. स्वार्थप्रेरित जिज्ञासा स्वार्थप्राप्तीनंतर आपोआपच नष्ट होते.
बालकाच्या मनात निर्माण होणारी जिज्ञासा अथवा काही स्त्रियांच्या मनात निर्माण होणारी जिज्ञासा ही केवळ विरंगुळा या परिघातच मर्यादित असतात. त्यातून मिळणारा आनंद हा केवळ आपणच घ्यायचा असतो, हा स्वभाव बनून जातो. असे असले तरी विशेषत: काही स्त्रियांच्या बाबतील जिज्ञासेतून जे काही आपल्याला प्राप्त झाले ते आपल्यासोबतच्या आपल्या मैत्रिणींना कधी एकदा सांगू, असेही होऊन जात असते. त्यामध्ये केवळ स्वार्थ हाच उद्देश असू शकतो. कारण अशा कृतीचा आनंद केवळ स्वत:पुरता मर्यादित असतो.
सद्गुणी आणि अभ्यासू व्यक्तीमधील जिज्ञासा ही समाज आणि राष्ट्रासाठी महत्त्वाची ठरते. कारण अशी व्यक्ती त्यांच्या जिज्ञासेपोटी योग्य विचार, योग्य आचार, योग्य अभ्यास आणि योग्य मार्गदर्शन याद्वारे ज्यासाठी किंवा ज्यामुळे ती निर्माण झालेली आहे तिचा योग्य पाठपुरावा करून सफल होत असतात. अवगुणी व्यक्तींमधील जिज्ञासा मात्र अतिशय भिन्न, घातक आणि अविचारी असतात आणि अशा जिज्ञासेपोटी करण्यात आलेली कृत्ये ही इतर व्यक्ती, समाज आणि राष्ट्रासाठी घातक ठरत असतात.
लहान मुलांच्या जिज्ञासू वृत्ती मात्र कधी कौतुकास्पद, कधी चीड आणणारी, तर कधी गोत्यात आणणारी ठरत असते. कारण काही बालके इतकी जिज्ञासू असतात की, त्या जिज्ञासेपोटी काय करू, काय करू नये अथवा काय विचारावे किंवा विचारू नये, ही विचारमर्यादा ओलांडून जातात आणि त्यांची उत्तरे देणार्‍याला काय उत्तर देऊ आणि काय नाही, असे होऊन जाते.
काहीही असो, जिज्ञासा हा गुणदोषयुक्त महत्त्वाचा जीवनघटक आहे, एवढे मात्र निश्‍चित!
मधुसूदन (मदन) पुराणिक
९४२००५४४४४