फुकटचा लाल सल्ला!

0
27

वाचकपत्रे
तिकडे चीनमधील वर्तमानपत्रं भारतविरोधी गरळ ओकत असताना, इकडे येचुरी-करात यांच्या माकपचे मुखपत्र ‘पीपल्स डेमॉक्रसी’ म्हणते, भूतानच्या भानगडीत भारताने नाक खुपसू नये. चीनशी दोस्ती करावी आणि अमेरिकेशी असलेली जवळीक संपवावी… या लालभाईंना केवढा हा चीनचा कळवळा! इकडे, ‘भारत तेरे टुकडे होंगे’ म्हणायचे आणि तिकडे भारताच्या जिवावर उठलेल्या चीन-पाकिस्तानचे गोडवे गायचे, हा राष्ट्रद्रोह नाही काय? चीन रोज युद्धाच्या धमक्या देत असताना, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राजकुमार राहुल भारतातील चिनी राजदूतांना चोरून भेटतात. कॉंग्रेसचेच मणिशंकर अय्यर हुरियत नेत्यांच्या घरी जाऊन पाहुणचार झोडतात! पाकिस्तानात जाऊन मोदी सरकार पाडण्यासाठी मदत करा म्हणून नापाक पाकड्यांचे पाय धरतात! उद्या युद्ध सुरू झालेच तर ही घरभेदी मंडळी कशी वागतील? विंचू महादेवाच्या पिंडीवर चढला तर खेटराने त्याची पूजा करणारे आम्ही, यांचे डंख आणखी किती दिवस सहन करणार आहोत? वेळीच यांना यांची जागा दाखवली पाहिजे, मतदान यंत्रांमधून! जय हिंद!
सोमनाथ देविदास देशमाने
९४२१६३६२९१

वृक्षवल्ली आम्हा सोयरे; आम्ही वन चरे!
नागपूर सुधार प्रन्यासने २०१२-१३ साली वृक्षारोपणासाठी एक लाख साठ हजार वृक्षांची लागवड आणि तीन वर्षेपर्यंत त्यांचे संगोपन करून त्यांना जगविणे, यासाठी पुण्याच्या कंपनीला १९ कोटींचे कंत्राट दिले. तीन वर्षांनंतर असे लक्षात आले की, यापैकी अर्धी म्हणजे केवळ ८० हजार झाडे तेवढी वाचली होती. इतर ८० हजार झाडे सुकून गेली होती. हा प्रश्‍न आ. गिरीश व्यास यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला आणि माहितीत असे कळले की, केवळ ३५ टक्केच झाडे जगली. याचा अर्थ, नासुप्रने आणि कंपनीने आधी खोटी माहिती दिली होती. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे तीनतेरा वाजविणार्‍या आणि त्यासाठी जनतेच्या कराच्या पैशाचा अपव्यय करणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. वारे नासुप्र आणि त्यांचे वृक्षारोपण! म्हणतात ना, कुंपणच शेत खाते! येेथे तर नासुप्रने वृक्षच खाऊन टाकले!!
गजेंद्र डोळके
७५०७५५२९७७

शिवसेनेचे देसाई यांचाही घोटाळा?
उद्योग विभागाची ३१ हजार ५० एकर जमीन बिल्डरांच्या घशात घालण्याच्या कामात सुमारे ५० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप अजित पवार आणि अन्य विरोधकांनी केल्यामुळे शिवसेनेवरही आता प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. वास्तविक पाहता सुभाष देसाई हे या खात्याचे मंत्री असताना हा घोटाळा कसा झाला, याची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. देसाई यांनी आपले बालंट माजी दोन मंत्र्यांवर ढकलले आहे. पण, त्यात सत्य नाही, असा विरोधकांनी आरोप केला. आता भ्रष्टाचाराविषयी सातत्याने बोलणारे उद्धव ठाकरे आणि पोपट संजय राऊत कसे चिडिचूप झाले आहेत! यातील सत्य त्यांनी जनतेला सांगितले पाहिजे. अन्यथा शिवसेना हासुद्धा भ्रष्टाचारी पक्ष आहे, यावर शिक्कामोर्तब होईल!
अशोक पवार
नागपूर

लालूंच्या भ्रष्टाचाराला कॉंग्रेसचा पाठिंबा!
नितीशकुमार यांनी लालूंची साथ सोडून भाजपासोबत युती केल्यामुळे सर्व कॉंग्रेसजन नितीशवर तुटून पडले आहेत. ते संधिसाधू आहेत, धोकेबाज आहेत वगैरे आरोप त्यांनी केले. याचा सरळ अर्थ असा की, या सर्व नेत्यांचा लालूंच्या भ्रष्टाचाराला सक्रिय पाठिंबा आहे. त्यात भालचंद्र मुणगेकर यांनीही तोंड खुपसले. आता ते पूर्णपणे कॉंग्रेसवासी झाले आहेत, यात शंका नाही! भ्रष्टाचारामुळे लोकसभेत आणि विधानसभांमध्ये नाचक्की होऊनही कॉंग्रेसला अजून अक्कल सुचलेली दिसत नाही!
विकास रामटेके
नागपूर

शिया वक्फ बोर्डाची स्तुत्य भूमिका…
राममंदिरापासून दूरवर मशीद बांधली जावी, अशी स्तुत्य भूमिका शिया वक्फ बोर्डाने घेतली असून, तसे प्रतिज्ञापत्र त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. राममंदिरावरील जागेचा हक्क सोडून मशीद अन्यत्र बांधावी, ही सूचना सुन्नी वक्फ बोर्डाला मान्य नाही. आता तर अनेक वादींनी आपला दावा मागे घेतला आहे. आता सुन्नी वक्फ बोर्डानेही आपला दावा मागे घेऊन शिया वक्फ बोर्डाने जी भूमिका घेतली आहे, ती मान्य करून आपला दावा सोडावा व मंदिर आणि मशिदीचा वाद कायमचा संपुष्टात आणावा. असे झाले तर सामंजस्याने हा वाद सुटून आपापसातील दुरावा कमी होऊन एक चांगले वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.
विकास ठोंबरे
अमरावती