विजयी घोडदौड…

0
57

वेध
हौशी क्षेत्राची कास सोडून व्यावसायिक क्षेत्राकडे वळलेला, एवढेच नव्हे, तर पोलिस विभागातील मोठ्या पदाची नोकरी सोडून व्यावसायिक बॉक्सिंगसाठी स्वत:ला वाहून घेणार्‍या विजेंदर सिंह याने परवा आपल्या आणखी एका व्यावसायिक लढतीत चीनच्या स्पर्धकाला लोळवून आपली या क्षेत्रातील विजयी घोडदौड कायम राखली आहे. एक क्रिकेटचा अपवाद वगळला आणि अलीकडील काही खेळांचा (प्रो कबड्डीवगैरे) विषय जर बाजूला ठेवला, तर अजूनपर्यंत आपल्या देशातील खेळाडूंमध्ये व्यावसायिकतेची मानसिकता रुजलेली दिसून येत नाही. जे अभ्यासात हुशार नाही किंवा ज्यांना अभ्यासाचा कंटाळा आहे, अशीच मुले खेळाकडे वळतात, असा अनेकांचा समज आहे किंवा तसे आपल्या आजूबाजूचे चित्र आहे. कोणता तरी एक खेळ खेळायचा, त्या खेळातील कौशल्य काही प्रमाणात अंगीकारायचे, त्याआधारे आंतर विद्यापीठ, राज्य किंवा राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करायचे आणि स्पोर्टस् कोट्यात एखादी सरकारी नोकरी मिळवून आपल्या जीवनाची सार्थकता झाली, असे समजून घेण्याची मानसिकता आपल्या येथील खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. रेल्वे किंवा पोलिस यांसारखे विभाग हे खेळाडूंचे जणू आशास्थान झाले आहे. रेल्वेमध्ये क्रीडा गुणांच्या आधारे नोकरीत सामावून घेतले जाते, तर दर्जेदार खेळाडू उमेदवार भरतीसाठी आल्यास त्याला जास्त त्रास न देता पोलिस विभागात थेट भरती करून घेतले जाते. कधीकधी एखाद्या खेळाडूने मोठी स्पर्धा गाजविली तर त्याला थेट मोठ्या पदावर नोकरी दिली जाते. आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू आमच्या सेवेत आहे, हीसुद्धा संबंधित विभागांसाठी प्रतिष्ठेची बाब असते. अशा प्रकारे ऑलिम्पिकपदक विजेत्या विजेंदरला पंजाब पोलिसांनी आपल्या सेवेत सामावून घेताना थेट उपायुक्तपदच बहाल केले होते! अचानकच त्याने एक निर्णय घेऊन हौशीमधून व्यावसायिक क्षेत्रात उडी घेतली आणि पोलिसच्या नोकरीचाही त्याग केला. त्याचा निर्णय त्याच्या कामगिरीकडे बघता योग्य ठरल्याचे दिसून येत आहे. परवाच त्याने चीनच्या झुल्फीकार मैमैतियाली याला गुणांच्या आधारे पराभूत करीत व्यावसायिक क्षेत्रातील आपला सलग नववा विजय साजरा केला. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकाविणार्‍या विजेंदरने आतापर्यंत झालेल्या नऊ व्यावसायिक लढतींपैकी सात लढतींमध्ये नॉकआऊट विजय मिळविलेले आहेत.
निराशाजनक शेवट
खेळाडूंनी प्रलोभनांचा जास्त हव्यास न करता एका विशिष्ट कालावधीत किंवा वयात आकस्मिक निर्णय घेऊन आपल्या कारकीर्दीला रामराम ठोकायला हवा. अनेकदा काही खेळाडूंना याची जाणीव असते आणि त्यामुळे ते अचानक निवृत्ती निर्णय जाहीर करून सार्‍यांना आश्‍चर्यचकित करतात; तर काही जण कोणाचीही तमा न बाळगता स्वत:च्या स्वार्थापोटी किंवा अन्य कोणत्या प्रलोभनापोटी विशिष्ट कामगिरीची उंची गाठल्यानंतर आपण आता त्यावरून खाली घसरत आहोत, याची जाणीव होत असतानाही खेळत असतात. मागे भारताचा क्रिकेटस्टार सचिन तेंडुलकरबाबत असा प्रकार घडला. अनेक क्रिकेटपटूंनी सन्मानजनक निवृत्ती पत्करली. मात्र, सचिनने इतके विक्रम-पराक्रम करूनही लोकांवर व समीक्षकांवर शेवटच्या काळात आता त्याने निवृत्त व्हायला हवे, असे म्हणण्याची, लिहिण्याची व बोलण्याची वेळ आली होती. सचिन अमक्या सामन्यात निवृत्त होणार, सचिन तमक्या लढतीत क्रिकेटला रामराम ठोकणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. अखेर सचिनने स्वत:च्या मैदानावर आयोजित सामन्यात क्रिकेटला अलविदा करून या चर्चांना विराम दिला होता. आपल्या या शेवटच्या कार्यकाळात सचिनकडून अपेक्षित कामगिरी घडलेली नव्हती. असाच काहीसा प्रकार उसेन बोल्टबाबत घडला आहे. त्यानेही आता जास्त हव्यास न करता सन्मानजनक निवृत्ती पत्करायला हवी. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविताना अनेक सुवर्णपदकांवर आपले नाव कोरणार्‍या उसेन बोल्टला मात्र आपल्या शेवटच्या दौडीत निराश व्हावे लागले. जगातील सर्वात वेगवान धावपटू म्हणून बोल्टची सर्वत्र ओळख आहे. कारकीर्दीतील शेवटची दौड जिंकून सोनेरी सांगता करण्याचे बोल्टचे स्वप्न नुकतेच भंगले आहे. जागतिक ऍथ्लेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेनंतर आपण आपल्या कारकीर्दीची सांगता करणार, असे जमैकाचा धावपटू असलेल्या उसेन बोल्टने आधीच जाहीर केले होते. त्यामुळे लंडन येथील या स्पर्धेतील कामगिरीकडे सार्‍यांचे लक्ष लागले होते. या स्पर्धेत तो आपल्या बाराव्या सुवर्णपदकावर नाव कोरेल, अशी सार्‍यांची अपेक्षा होती. मात्र, अनेक दौड स्पर्धा लीलया जिंकणार्‍या बोल्टला या दौडीत मात्र संघर्ष करावा लागला, तरीही त्याला सोनेरी यशाने हुलकावणी दिली. बोल्टला खूप मागे सारून अमेरिकेचा जस्टिन गॅटलीनने ९.९२ सेकंदाची वेळ देत हे सुवर्णपदक हिसकावून घेतले. अमेरिकेच्याच क्रिश्‍चन कोलमनने ९.९४ सेकंदाच्या वेळेसह रौप्य मिळविले. सुवर्णाच्या अपेक्षेने धावलेल्या बोल्टला मात्र अखेर कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
सुरुवातीपासूनच माघारल्यामुळे त्याला आपल्या शेवटच्या दौडीत ९.९५ सेकंदाची वेळ नोंदविता आली. काही क्षणांनीच त्याला सोनेरी यशापासून दूर राहावे लागले. आपले हे अपयश लपविताना त्याने दाखविलेल्या खिलाडू वृत्तीमुळे उपस्थितांची मने जिंकली. दौड हरल्यानंतर त्याची निराशा जाहीर न करता तो थेट गॅटलीनकडे धावत गेला आणि त्याला आलिंगन देऊन बोल्टने त्याचे अभिनंदन केले. अखेर बोल्टने आपल्या चाहत्यांचा भावपूर्ण निरोप घेतला आणि मैदान सोडले.
महेंद्र आकांत
९८८१७१७८०३