सुरक्षाव्यवस्था आणि राहुल गांधी यांचा पोरखेळ…!

0
61

दिल्लीचे वार्तापत्र
राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांना एका स्वयंसेवी संघटनेने, इंडिया गेटवर आयोजित केलेल्या दौडीला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी आमंत्रित केले. दौडीला हिरवी झेंडी दाखवल्यावर काही अंतर धावण्याची राजीव गांधी यांची इच्छा होती. मात्र, हजारोंच्या गर्दीत पंतप्रधानांनी धावणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नव्हते, त्यामुळे सुरक्षायंत्रणा यासाठी तयार नव्हत्या. टी. एन. शेेषन तेव्हा पंतप्रधानांचे मुख्य सुरक्षा अधिकारी होते. कार्यक्रमाच्या दिवशी राजीव गांधी यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली आणि रॅलीत धावण्यासाठी आपले पाय उचलले, त्यांनी दोन-तीन पावलेच टाकली असतील, तोच त्यांच्याभोवती सुरक्षा घेरा करून असलेल्या एसपीजीच्या अधिकार्‍यांनी शेषन यांच्या आदेशाने राजीव गांधी यांना शब्दश: उचलून कारमध्ये टाकले आणि थेट पंतप्रधान निवासस्थानी आणले, राजीव गांधी काहीच करू शकले नाहीत. पंतप्रधानांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करता येत नाही तसेच पंतप्रधानांची सुरक्षा करणार्‍या यंत्रणेला किती अधिकार असतात, हे यातून दिसून येते.
हा प्रसंग आठवण्याचे कारण म्हणजे मंगळवारी लोकसभेत, कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर, गुजरातच्या पूरग्रस्त भागाच्या दौर्‍यावर असताना झालेल्या दगडफेकीच्या घटनेवर चर्चा झाली. राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत सरकार हयगय करते, असा कॉंग्रेसचा आरोप होता. या मुद्यावरून सरकारला घेरण्याची व्यूहरचना कॉंग्रेसने तयार केली होती, पण केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी यावर निवेदन करताना कॉंग्रेसच्या आरोपातील हवाच काढली नाही, तर राहुल गांधी यांच्या वागण्यातील अक्षम्य असा बेजबाबदारपणाही उघड केला. राहुल गांधी आपल्याच सुरक्षाव्यवस्थेशी पोरखेळ करतात, याकडे राजनाथसिंह यांनी लक्ष वेधले, तेव्हा संपूर्ण सभागृह थक्क झाले!
राहुल गांधी यांच्या आजी श्रीमती इंदिरा गांधी तसेच वडील राजीव गांधी यांची हत्या झाली. हे दोघेही देशाचे पंतप्रधान होते. श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या पंतप्रधानपदावर असताना, तर राजीव गांधी यांची हत्या पंतप्रधानपदावर नसताना झाली. तेव्हापासून संपूर्ण गांधी परिवाराला एसपीजीची सुरक्षा आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावर, माजी पंतप्रधान आणि त्याच्या कुटुंबाला ५ वर्षेपर्यंत एसपीजीची सुरक्षा देण्याचा कायदा केला होता. पण, त्यांच्या हत्येनंतर पंतप्रधान झालेल्या पी. व्ही. नरसिंह राव यांनी माजी पंतप्रधानांच्या कुटुंबीयांना विशेषत: गांधी परिवाराला असलेला धोका लक्षात घेता, तहहयात एसपीजीची सुरक्षा व्यवस्था देण्याबाबतचा कायदा केला.
त्यानुसार आज कॉंग्रेसचे उपाध्यक्ष असलेल्या राहुल गांधी यांना, श्रीमती इंदिरा गांधी यांचे नातू आणि राजीव गांधी यांचे पुत्र म्हणून एसपीजीची सुरक्षा मिळत आहे. एसपीजीची सुरक्षा मिळण्यात त्यांचे स्वत:चे कोणतेही कर्तृत्व नाही वा त्यांच्याजवळ तसे कोणतेही घटनात्मक पद नाही. त्यामुळे किमान घराणेशाहीतून जी सुरक्षा मिळते, त्याचे भान ठेवत राहुल गांधी यांनी आपली वागणूक जबाबदारीची ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, राहुल गांधी आपल्या बेजबाबदारपणामुळे एसपीजीच्या सुरक्षाविषयक मापदंडाचे वारंवार उल्लंघन करत असल्याचे राजनाथासिंह यांच्या निवेदनातून स्पष्ट झाले. दोन वर्षांत राहुल गांधी यांनी सुरक्षाविषयक मापदंडाचे शंभर वेळा उल्लंघन केले, हा सारा प्रकार दुर्दैवी म्हणावा लागेल. राहुल गांधी यांच्या परदेश दौर्‍यांमुळे आतापर्यंत कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते त्रस्त असल्याचे मानले जात होते. पण, आता राहुल गांधी यांच्या मनमानीपणामुळे तसेच बेजबाबदारपणामुळे एसपीजीसह अन्य सुरक्षायंत्रणाही त्रस्त असल्याचे राजनाथसिंह यांच्या निवेदनातून स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी म्हणजे कॉंग्रेससाठी ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी स्थिती आहे! अजून तर राहुल गांधी यांच्याकडे कॉंग्रेसचे अध्यक्षपद आले नाही तर ही गत आहे, उपाध्यक्षपदावर असतानाच त्यांच्या वागणुकीमुळे सर्वजण त्रस्त आहेत, अध्यक्षपद तर आले तर ते काय करतील, याची कल्पनाही करवत नाही.
राहुल गांधी यांच्या जिवाला असलेला धोका तसेच एसपीजीची सुरक्षाव्यवस्था पाहता, त्यांनी बुलेटप्रूफ गाडीतून प्रवास करणे अपेक्षित आहे, गुजरातच्या दौर्‍यावर असतानाही त्यांना बुलेटप्रूफ गाडीतून प्रवास करण्याचा सल्ला एसपीजीच्या अधिकार्‍यांनी दिला होता. मात्र, तो डावलून आपल्या खाजगी सचिवाच्या सूचनेवरून राहुल गांधी यांनी विना बुलेटप्रूफ गाडीतून प्रवास केला. यावेळी झालेल्या दगडफेकीच्या घटनेत सुदैवाने राहुल गांधी यांना इजा झाली नाही, पण काही झाले असते, तर त्याची जबाबदारी कुणी घेतली असती? त्यामुळेच राहुल गांधी यांनी विना बुलेटप्रूफ गाडीतून प्रवास करण्याची सूचना त्यांच्या खाजगी सचिवाने का केली? सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला जीव धोक्यात टाकण्याची खाजगी सचिवाची सूचना राहुल गांधी यांनी का मान्य केली? यामागे काही षडयंत्र होते काय? सरकारला अडचणीत आणण्यासाठी दगडफेकीची घटना कॉंग्रेस पक्षातूनच प्रायोजित होती काय? असा संशय घ्यायला जागा आहे, त्यामुळे याची चौकशी होण्याची गरज आहे.
राहुल गांधी ६ परदेश दौर्‍यांमध्ये ७२ दिवस देशाबाहेर होते. पण, त्या काळात त्यांनी एसपीजीची सुरक्षाव्यवस्था घेतली नाही. आपल्या परदेश दौर्‍याची सूचना राहुल गांधी काही तास आधी एसपीजीला देतात, त्यामुळे एसपीजीला राहुल गांधी यांची परदेशातील सुरक्षाव्यवस्था करण्यात अडचणींचा सामना करावा लागतो, याकडे राजनाथसिंह यांनी लक्ष वेधले. राहुल गांधी परदेश दौर्‍यावर कुठे जातात, काय करतात, याची माहिती देशवासीयांना मिळाली पाहिजे. परदेश दौर्‍यात राहुल गांधी एसपीजीची सुरक्षा का घेत नाहीत, त्यांना काय लपवायचे आहे, हे स्पष्ट झाले पाहिजे. परदेश दौर्‍यात सुरक्षाव्यवस्था न घेणे हा योगायोग आहे की पद्धतशीर केला गेलेला प्रयत्न, ते स्पष्ट झाले पाहिजे. या सगळ्या प्रकारात एखाद् वेळी राहुल गांधी यांच्या जिवाला धोका पोहोचला, तर त्याची जबाबदारी कुणाची, तेसुद्धा समजले पाहिजे.
राहुल गांधी सुरक्षाविषयक मापदंडाचे वारंवार उल्लंघन करत असल्याबद्दल कॉंग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे कार्यालय आणि कॉंग्रेस पक्षाला सरकारतर्फे अधिकृतपणे कळवण्यात आले आहे, पण यापैकी कुणीही याची पाहिजे तेवढ्या गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावरील दगडफेकीचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याचा कॉंग्रेस पक्षाला कोणताच अधिकार नाही. दगडफेकीची घटना म्हणजे राहुल गांधी यांच्या हत्येचा प्रयत्न होता, असे म्हणणे तर कॉंग्रेस पक्षाला मुळीच शोभणारे नाही. राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत कॉंग्रेस पक्ष एवढा गंभीर असेल, तर त्याने सुरक्षाविषयक मापदंडाचे पालन करण्याची सूचना आधी आपल्या भावी अध्यक्षाला केली पाहिजे, नंतर सरकारला उपदेशाचे डोस पाजले पाहिजे.
कोणत्याही नेत्याची सुरक्षा हा अतिशय गंभीर असा विषय आहे. त्यातही ज्या नेत्यांना झेड प्लस सुरक्षा आहे, अशा नेत्यांच्या सुरक्षेबाबत तर आणखी गंभीर राहण्याची गरज आहे. पण, आपण सुरक्षाविषयक मापदंडाचे उल्लंघन करायचे आणि सरकारवर गंभीर नसल्याचा आरोप करायचा, हा दुटप्पीपणा आहे. कॉंग्रेसने आधी असा दुटप्पीपणा सोडावा. राहुल गांधी यांच्यात सर्वच बाबतीत गंभीरपणा आणि प्रगल्भतेचा अभाव आहे. त्यांच्यात गंभीरपणा आणि प्रगल्भता असती, तर आज कॉंग्रेस पक्षाची ही स्थिती झाली नसती. राहुल गांधी यांना कॉंग्रेस पक्षाची गरज नाही, तर कॉंग्रेस पक्षाला राहुल गांधी यांची गरज आहे, त्यामुळे राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत कॉंग्रेस पक्षानेच गंभीर असले पाहिजे.
श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७