अमित शाह यांचा राज्यसभा प्रवेश…

0
87

अग्रलेख
गुजरातमधून राज्यसभेवर, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांची निवड होणे, ही एक आगळीवेगळी घटना मानावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूत्रे ग्रहण केल्यानंतर ज्या ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आल्या, त्या सर्व निवडणुकीत त्यांनी संबंधित राज्यांमध्ये आपली बैठक मांडली आणि योग्य नियोजन करून बहुतेक राज्यांवर भाजपाचा झेंडा फडकविला. विशेष म्हणजे, उत्तरप्रदेशात भाजपाला लोकसभेत आणि विधानसभेत मोठे बहुमत मिळवून दिले. सध्या देशातील तेरा राज्यांमध्ये भाजपाची स्वबळावर सत्ता आहे, तर पाच राज्यांमध्ये मित्रपक्षांसोबत ते सत्तेत आहेत. ज्या राज्यसभेवर ते निवडून गेले आहेत, त्या राज्यसभेत आतापर्यंत कॉंग्रेसचे सर्वाधिक सदस्य होते. त्या संख्येवर मात करून परवाच एका सदस्याची वाढ होऊन आता राज्यसभेत भाजपा हा सर्वात मोठ्या संख्येचा पक्ष झाला आहे. आता अमित शाह आणि स्मृती इरानी यांचा समावेश झाल्यामुळे या संख्येत आणखीच वाढ झाली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे पुढील लक्ष्य आहे, राज्यसभेत बहुमतात येण्याचे! त्यासाठी आगामी वर्षापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पण, त्यात काही अडचण येणार नाही, असे सध्यातरी दिसत आहे. गोवा आणि मणिपूरमध्ये कॉंग्रेसच्या गलथानपणाचा पुरेपूर फायदा घेत, तेथे भाजपाची सरकारे स्थापण्यात अमित शाह यांना यश मिळाले आहे. नुकतीच बिहारमध्ये नितीशकुमार यांच्यासोबत युती झाली. एक जुना मित्र भाजपाला मिळाला. त्रिपुरातील तृणमूल कॉंग्रेसच्या सहा आमदारांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली आणि आम्ही सहाही जण भाजपात येत असल्याची त्यांनी घोषणा केली. तिकडे उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टीला गळती लागलीच आहे. आणखी काही सदस्य भाजपात येण्याची शक्यता बळावली आहे. अमित शाह यांच्या घोडदौडीचा ग्राफ पाहिल्यास कोणताही राजकीय नेता थक्क झाल्याशिवाय राहणार नाही! जगात सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचा गौरव आज जो भारतीय जनता पक्षाला प्राप्त झाला आहे, त्याचे शिल्पकार अमित शाह आहेत, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. नरेंंद्र मोदी आणि अमित शाह या जोडगोळीने सारा देश पालथा घातला आणि पक्षाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. अमित शाह हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे युवावस्थेपासूनच स्वयंसेवक आहेत. महाविद्यालयीत शिक्षण घेत असतानाच, १९८२ साली त्यांची ओळख नरेंद्र मोदी यांच्यासोबत झाली. १९८३ साली ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जुळले. एक उत्तम वक्ता आणि सामाजिक समस्यांची जाण त्यांना होती. त्यांचे कार्य पाहून त्यांना १९८६ साली भाजपात आणण्यात आले. लगेच त्यांना भाजयु मोर्चाचे सदस्य करण्यात आले. १९९१ साली लालकृष्ण अडवाणी यांच्या, गांधीनगर या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांच्याकडे अडवाणींच्या प्रचाराची धुरा देण्यात आली. दुसर्‍यांदा अटलबिहारी वाजपेयी यांनी गुजरातमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, तेव्हाही त्यांच्यावरच प्रचाराची धुरा सोपविली गेली. १९९७ साली सरखेज विधानसभा उपनिवडणुकीत ते विजयी झाले. त्यानंतर त्यांनी आणखी तीन वेळा याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. सध्या ते नरनपुरा येथून विधानसभा सदस्य आहेत. मोदी मुख्यमंत्री असताना, २००३ ते २०१२ पर्यंत ते गुजरातचे गृहमंत्री होते. फेब्रुवारी २००२ मध्ये गोध्रा स्थानकावर साबरमती एक्सप्रेसला जाळण्यात आले. त्यात ५९ हिंदू मारले गेले. त्याचा रोष म्हणून गुजरातेत दंगल उसळली. त्यात मोठ्या संख्येत मुसलमान व हिंदूही मारले गेले. ही दंगल शांत झाल्यानंतर २००४ साली नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर हल्ला करण्यासाठी चार अतिरेकी गुजरातमध्ये शिरले असल्याचा इंटेलिजन्स ब्युरोचा अहवाल आला. त्यावरून इशरत जहां आणि तिच्यासोबतच्या आणखी तीन जणांना चकमकीत ठार मारण्यात आले. पण, ही चकमक बनावट होती असे भासवून विरोधकांनी रान उठविले. केंद्रात गृहमंत्री असलेले पी. चिदम्बरम् यांनी इशरत जहांच्या अहवालात बदल केले. अगदी अलीकडे ही बाब उघड झाली. यात अमित शाह यांना आरोपी करा, अशी एक याचिका दाखल करण्यात आली. पण, पुरेसा पुरावा नसल्याने ही केस खारीज करण्यात आली. २०१० साली सोहराबुद्दीन चकमक केसमध्ये तत्कालीन पोलिस अधिकारी वांजरा यांनीच, ही चकमक बनावट होती, असा शाह यांच्यावर आरोप केला. शाह यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर कुभांड रचण्यात आले. यात केंद्रातील कॉंग्रेसचे सरकार, मोदी आणि शाह यांच्या मागे हात धुवून लागले होते. पण, यातून तावूनसुलाखून दोन्ही नेते सहीसलामत सुटले. त्यानंतर तर वांजरा यांनाच अटक झाली आणि नुकतीच त्यांची सुटका झाली. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जेव्हा मोदींचे नाव समोर आले, तेव्हा अनेकांच्या अशा प्रतिक्रिया होत्या की, हा एका राज्याचा मुख्यमंत्री कोणते दिवे लावणार? पण, मोदींनी असा काही झंझावात दाखविला की, देशात सर्वत्र दिवेच दिवे लागले आणि विरोधक अंधारात गडप झाले! उत्तरप्रदेशसारख्या राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चमत्कार झाला. दोन्ही ठिकाणी भाजपाचे सर्वाधिक सदस्य निवडून आले. बसपाला तर खातेसुद्धा उघडता आले नाही! त्यानंतर दोघांनी अन्य राज्यांच्या विधानसभांत निवडणुकीत जी मुसंडी मारली, ती पाहून विरोधकांच्या तोंडचे पाणीच पळाले! आज देशातील सर्वच प्रमुख राज्यांत भाजपाची स्वबळावर सरकारे आहेत आणि काही ठिकाणी मित्रपक्षांची सरकारे आहेत. आसामसारख्या राज्यात भाजपाने मारलेली मुसंडी सर्वांनाच आश्‍चर्यचकित करून गेली. या सात राज्यांना जोडण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा धडक कार्यक्रम मोदी सरकारने हाती घेतला आहे. लोकांच्या विश्‍वासाला भाजपा पात्र ठरत आहे आणि विरोधक आता भाजपाची वाट चोखाळत आहेत. नेहमी भाजपा आणि संघावर तोंडसुख घेणार्‍या मंडळींचा श्‍वास कोंडला जाऊ लागला आहे. सर्वांना आता सर्वात आधी आपल्या अस्तित्वाची फिकीर पडली आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी तर स्पष्ट शब्दांत सुनावले आहे की, ‘‘कॉंग्रेस सध्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. कॉंग्रेसची इतकी वाईट स्थिती कधीही झाली नव्हती. राजेरजवाडे केव्हाच संपुष्टात आले, पण अजूनही काही लोक सुलतानासारखेच वागत आहेत. मोदी आणि अमित शाह यांचा रथ रोखण्याची ताकद आज कॉंग्रेसमध्ये राहिलेली नाही.’’ ‘सुलतान’ हा शब्द त्यांनी राहुल गांधींसाठी वापरला, असे आता दबक्या आवाजात कॉंग्रेसजन बोलू लागले आहेत. मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ ग्रहण केल्यानंतर ते ज्या प्रदेशात गेले, तेथे त्यांनी एकच नारा दिला होता- ‘कॉंग्रेसमुक्त भारत!’ तेव्हा त्यांची खिल्ली उडविण्यात आली होती. कॉंग्रेस सर्वात जुना पक्ष, त्याला कुणीही संपवू शकत नाही, अशा वल्गना करण्यात आल्या. निकालानंतर मात्र सर्वांचीच तोंडे बंद झाली. आता अमित शाह राज्यसभेत आले आहेत. जे मोदी बोलू शकत नव्हते, त्याची भरपाई आता अमित शाह यांच्या प्रवेशाने होईल, यात शंका नाही!