थर्मेक्सचा इंडोनेशियामध्ये ‘मेड इन इंडिया’चा नारा

0
35

पुणे, ९ ऑगस्ट 
अभियांत्रिकी क्षेत्रातील कंपनी असलेल्या ‘थर्मेक्स’ने इंडोनेशियामध्ये ‘मेड इन इंडिया’चा ठसा उमटवला आहे. कंपनीने इंडोनेशियाची राजधानी जकार्ताजवळ उत्पादन सुविधा केंद्र उभारले आहे. या केंद्रात बॉयलर, हीटर्स, स्टीम ऍक्सेसरीज अशा विविध उपकरणांचे विस्तृत प्रमाणात उत्पादन केले जाणार आहे. यासाठी इंडोनेशियामध्ये टप्प्याटप्प्याने सुमारे १५० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
थर्मेक्सला सरलेल्या तिमाहीत ४७ कोटींचा नफा झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात ११.३ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. कंपनीने नुकतेच जून अखेर संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले असून,  यादरम्यान कंपनीच्या एकत्रित उत्पन्नात १०.५ टक्क्यांची घसरण झाली आहे. ते १०२५ कोटींवरून कमी होऊन ९१७ कोटींवर पोहोचले आहे.
थर्मेक्स समूहाच्या अध्यक्ष मेहेर पदमजी यावेळी बोलताना म्हणाल्या की, कंपनीने आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्यासाठी पावले उचलली असून, इंडोनेशियामध्ये पोहचून ‘मेड इन इंडिया’चा नारा लगावला आहे. तसेच या प्रकल्पामुळे इंडोनेशिया आणि इतर दक्षिण-पूर्व आशियाई बाजारांवर लक्ष केंद्रीत करण्यात मदत होणार आहे. शिवाय कंपनीला मिळणार्‍या कंत्राटांमध्ये २२.४ टक्क्यांची वाढ झाली आहे. चालू वर्षात जूनअखेरपर्यंत कंपनीला ४९४४ कोटींची कंत्राटे मिळालेली आहेत.कंपनीच्या संचालक मंडळाने प्रत्येकी दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरसाठी सहा रुपयांचा लाभांश जाहीर केला. (वृत्तसंस्था)