रेमंड्‌सचे मालक भाड्याच्या घरात!

0
87

मुंबई, ९ ऑगस्ट 
देशातील श्रीमंत कुटुंबांच्या यादीत समाविष्ट होणार्‍या सिंघानिया कुटुंबाचा वाद आता टोकाला गेल्याचे चित्र आहे. हा वाद विजयपत सिंघानिया आणि त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांच्यात सुरू आहे. रेमंड लिमिटेडचे साम्राज्य उभे करणारे विजयपत सिंघानिया यांनी आपल्या मुलावर आरोप केले आहेत की, त्यांच्या मुलाने त्यांना रस्त्यावर आणले असून, दारोदारी भटकण्याची वेळ आणली आहे. रेमंड लिमिटेड आपली खासगी कंपनी असल्यासारखे गौतम सिंघानिया वागत असल्याचा आरोप विजयपत सिंघानिया यांनी केला आहे.
भारतातील प्रसिद्ध ब्रॅण्ड्समध्ये समावेश असलेल्या रेमंड लिमिटेडला आपला मुलगा गौतम सिंघानियाच्या हाती सोपवल्यानंतर विजयपत सिंघानिया स्वत: मुंबईतील ग्रॅण्ड पराडी सोसायटीत एका भाड्याच्या घरात राहत आहेत. विजयपत सिंघानिया यांनी रेमंड लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर असलेल्या गौतम सिंघानिया यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेमध्ये मुंबईतील मलबार हिलमधील जे के हाऊस या ३६ मजली इमारतीतील डुुप्लेक्स फ्लॅटचा ताबा दिला जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंबंधी वारंवार गौतम सिंघानिया यांना आठवण करुन देण्यात आले, मात्र त्याचा फायदा झाला नाही असेही त्यांनी याचिकेत म्हंटले आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीत विजयपत सिंघानिया यांना कशाप्रकारे आर्थिक समस्यांना सामोरे जाव लागत आहे याची माहिती वकिलाने दिली. विजयपत सिंघानिया यांनी कंपनीचे सारे शेअर्स आपल्या मुलाच्या नावे केले होते, ज्याची किंमत १००० कोटींच्या आसपास होती. मात्र गौतम सिंघानिया यांनी यानंतरही वडिलांना वार्‍यावर सोडले. इतकेच नाही तर त्यांची गाडी आणि ड्रायव्हरही काढून घेतले अशी माहिती वकिलाने दिली आहे. (वृत्तसंस्था)