लॉकरची सुरक्षा बँकांकडेच : अर्थमंत्री

0
50

नवी दिल्ली, ९ ऑगस्ट 
बँकेत लॉकर उघडल्यावर त्या लॉकरच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित बँकेचीच असल्याचे व यात कोणत्याही प्रकारची हयगय चालणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. ही माहिती प्रश्‍नोत्तरांच्या तासात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिली.
आपल्या जवळची महत्त्वाची कागदपत्रे, दागिने व अन्य मौल्यवान वस्तू ग्राहक बँकेत लॉकरच्या माध्यमातून मोठ्या विश्‍वासाने ठेवतात. बँकेत हा ऐवज असल्याने तो सुरक्षित राहिल, अशी ग्राहकांची समजूत असते. परंतु लॉकरची जबाबदारी बँकांची नसल्याचे परिपत्रक पूर्वी जारी करण्यात आले होते. त्यामुळे बँकांकडून लॉकर पुरवताना हात आखडता घेण्यात येत होता. त्याविषयी स्पर्धा आयोगाकडून चौकशी करण्यात येत आहे. या पृष्ठभूमीवर रिझर्व्ह बँकेने बँकांना ग्राहकांचे लॉकर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घेण्यास सांगितले आहे. परंतु वित्तसेवा विभागाकडून लॉकरमधील ऐवजाची चोरी झाल्यास संबंधित बँकेने ती भरून द्यावी, असे  आदेश देण्यात आले नसल्याचे जेटलींनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)