अक्षर पटेलला कसोटी पदार्पणाची संधी!

0
78

जडेजाच्या जागी संघात स्थान
कोलंबो, ९ ऑगस्ट 
अष्टपैलू रवींद्र जडेजाला तिसर्‍या कसोटी सामन्यासाठी निलंबित केल्यानंतर त्याच्या जागी डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे पल्लेकेल येथे शनिवारपासून प्रारंभ तिसर्‍या कसोटी  सामन्यातून अक्षरची कसोटी पदार्पण करण्याची शक्यता आहे.
अक्षर पटेल सध्या भारत अ संघाचा सदस्य असून काल रात्री दक्षिण आफ्रिकेवर ७ गड्यांनी मात करून भारताने तिरंगी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कायम राखले. या तिरंगी मालिकेत अक्षर पटेलने प्रभावी प्रदर्शन केले. अफगानिस्तानविरुद्ध ३३ धावात ३ बळी अशा सर्वोत्तम कामगिरीसह त्याने या स्पर्धेत १५.५०च्या सरासरीने ६ बळी टिपले. प्रिटोरिया येथे मंगळवारी दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धचा अखेरचा सामना खेळल्यानंतर अक्षय पटेल श्रीलंकेकरिता रवाना होण्याची शक्यता आहे. शनिवारपासून भारत-श्रीलंका यांच्यातील तिसरा कसोटी सामना होणार आहे.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय व टी-२० नंतर आता अक्षरला कसोटी पदार्पणाची संधी मिळणार आहे. त्याने भारताकडून ३० एकदिवसीय व ७ टी-२० सामने खेळले आहेत. अक्षरने अखेरचा वनडे सामना २९ ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणम येथे न्यूझीलंडविरुद्धचा पाचवा सामना खेळला होता. या सामन्यात त्याने अवघ्या ४.१ षटकात ९ धावात २ बळी टिपले होते. भारताने १९० धावांनी विजय नोंदवून ही मालिका ३-२ ने जिंकली होती. (वृत्तसंस्था)