आनंद कुलकर्णी यांनी घेतली पद व गोपनीयतेची शपथ    

0
76

मुंबई, ९ ऑगस्ट 
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती  झालेल्या सेवानिवृत्त अपर  मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. बुधवारी  सकाळी दहाच्या सुमारास मुख्य सचिवांच्या समिती कक्षात झालेल्या कार्यक्रमात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुलकर्णी यांना शपथ दिली.
यावेळी राज्यमंत्री मदन येरावार, आयोगाचे सदस्य अजीज खान, दीपक लाड यांच्यासह विविध विभागांंचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह यांनी नियुक्ती पत्राचे वाचन केले. कुलकर्णी यांचा आयोगाच्या अध्यक्षपदाचा कालावधी पाच वर्षांसाठीचा आहे. यावेळी ऊर्जामंत्री बावनकुळे आणि राज्यमंत्री येरावार यांच्या हस्ते कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. अपर मुख्य सचिव म्हणून निवृत्त झालेले कुलकर्णी यांनी आतापर्यंत राज्य शासनाच्या विविध विभागांचे प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली आहे. त्याचबरोबर त्यांनी केंद्र शासनाच्या ऊर्जा तसेच ग्रामविकास विभागातही काम पाहिले आहे.१९९३ ते १९९६ या काळात कुलकर्णी हे केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणून कार्यरत असताना त्यांनी ऊर्जा विभागाचा बारकाईने अभ्यास केला आहे. ऊर्जा क्षेत्राच्या विकासात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.   (तभा वृत्तसेवा)