खासदार साबळेंच्या न्यूज ऍपचे जेटलींच्या हस्ते उद्घाटन 

0
45

नवी दिल्ली, ९ ऑगस्ट 
राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या ‘अमरवाणी न्यूज पोर्टल आणि न्यूज ऍप’चे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते आज संसद भवनात करण्यात आले. न्यूज पोर्टल व ऍपची निर्मिती करून साबळे यांनी केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल इंडिया योजनेत महत्त्वाचा सहभाग नोंदविल्याचे गौरवोद्गार जेटली यांनी काढले.
संसद भवनात आयोजित या शानदार कार्यक्रमास केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री कलराज मिश्र, ऊर्जामंत्री पीयूष गोयल, केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, खते व रसायने राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांच्यासह खासदार संजय राऊत, अजय संचेती, अनिल देसाई, विकास महात्मे, आर. के. सिन्हा, विनय तेंडुलकर, शिवप्रताप शुक्ला, प्रभात झा, सी. पी. ठाकूर, गोपालनारायण सिंग, महेश पोतदार, दिलीपभाई पांड्या, रामनारायण दुदी, सुभाष चंद्रा, हर्षवर्धन सिंग, ओमप्रकाश माथुर, रामकुमार वर्मा, रूपा गांगुली, सत्यनारायण जाटीया आदी  उपस्थित होते.अरुण जेटली पुढे म्हणाले, भारताची वाटचाल डिजीटल क्रांतीच्या दिशेने सुरू आहे. या क्रांतीमध्ये  ‘अमरवाणी न्यूज पोर्टल आणि ऍप’ ने आपला सहभाग नोंदवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजीटल इंडियाच्या संकल्पनेला हातभार लावला आहे. पत्रकारिता क्षेत्र हे लोकशाहीचा एक मजबूत स्तंभ असून अमरवाणी न्यूज पोर्टल व न्यूज ऍप या क्षेत्रामध्ये आपला मजबूत ठसा उमटवेल, असा विश्‍वास जेटली यांनी  व्यक्त केला.
याप्रसंगी खासदार साबळे म्हणाले, जवळपास २० वर्षे  पत्रकारितेच्या क्षेत्रात काम केल्यामुळे खासदार झाल्यानंतरही माझ्यातील पत्रकार स्वस्थ बसू देत नव्हता. राजकारणाबरोबरच पत्रकारितेच्या माध्यमातूनही देश आणि समाजासाठी काम करण्याची इच्छा होती. याच प्रेरणेतून ‘अमरवाणी न्यूज’ची संकल्पना जन्माला आली आणि आज ती  प्रत्यक्षात आली याचा सार्थ अभिमान वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील सशक्त भारत उभारण्यासाठी अमरवाणी न्यूज नक्कीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्‍वास साबळे यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर आधारित चित्रफितीचेही यावेळी अनावरण करण्यात आले. (वृत्तसंस्था)