उत्तराखंड, काश्मिरात प्रवेश केला तर चालेल?

0
205

चीनची आक्रमक प्रतिक्रिया
बीजिंग, ९ ऑगस्ट 
डोकलाममधून सैन्य टप्प्याटप्प्याने काढून घेण्याबाबत भारताच्या सूचनेवर चीनने मंगळवारी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जर आम्ही उत्तराखंडमधील कलापिनी किंवा काश्मिरात प्रवेश केला तर चालेल का, असे चीनने म्हटले आहे. डोकलाममध्ये चीनला रस्तेबांधणी करण्यापासून भारताने रोखल्यानंतर या भागात गेल्या ५० दिवसांपासून भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारतीय माध्यम प्रतिनिधींसमोर हे वक्तव्य केले. ही भेट चीनची भूमिका भारतीय जनतेसमोर आणण्यासाठी एसीजीए या चिनी पत्रकारांच्या संस्थेने आयोजित केली आहे. भारत, चीन आणि भूतान या तिन्ही देशांच्या सीमा जिथे मिळतात त्या चिकन्स नेक भागात रस्ते बांधणी केल्यामुळे उभय देशामधील संबंध बिघडल्याचे भारताचे म्हणणे आहे. भारतातही असे अनेक सीमा भाग आहेत, जिथे तीन देशांच्या सीमा एकत्र येतात. मग याच नियमाने आम्ही कलापिनी किंवा काश्मीरमध्ये घुसावे काय, असा सवाल वांग यांंनी केला. (वृत्तसंस्था)