पं. दीनदयालजींच्या विचारातूनच शाश्‍वत विकासाकडे वाटचाल : मुख्यमंत्री

0
41

•विधानसभेत उपाध्याय यांच्या कार्याचा गौरव
मुंबई, १० ऑगस्ट
ज्येष्ठ विचारवंत पंडित दीनदयालजी उपाध्याय यांनी भारतीय संस्कृतीवरील आधारित आर्थिक चिंतनाचा विचार मांडला. जोवर शेवटच्या माणसाचा विचार होणार नाही तोवर शाश्‍वत विकास होणार नाही. हा त्यांच्या अंत्योदयाचा विचार घेऊन पुढे जाण्याचे कार्य राज्यात आणि देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या कार्याचा गौरव विधान सभेत केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंत्योदयाचे दीनदयाय उपाध्याय, ज्येष्ठ समाजसेवक स्व. नानाजी देशमुख व लोकनेते स्व. दौलतराव उर्फ बाळासाहेब श्रीपतराव देसाई यांच्या कार्याचा गौरव करण्याचा प्रस्ताव मांडला. पंडितजी हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना भारतीय संसदेने त्यांचा गौरव केला. राजकीय क्षेत्रात साधनशूचिता कशी असावी, राजकारण हे सैध्यांतिक कसे असावे याचा वैचारिक परिपाक दीनदयाल उपाध्याय यांनी घालून दिला. जनसंघाचे माजी अध्यक्ष आणि उत्कृष्ठ वक्ते म्हणून ओळख असलेले दीनदयायजी यांचे वयाच्या सातव्या वर्षी आई-वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांच्या मामाने त्यांचे शिक्षण पूर्ण केले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले. थोर नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या सोबत काम सुरू करून राजकीय विकल्प तयार करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. सण १९२० साली झालेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनातून डॉ. हेडगेवार यांनी फारकत घेतल्यावर जोवर देशात राष्ट्रभावना तयार होणार नाही, तोपर्यंत देश सातत्याने पारतंत्र्यात जाईल. त्यामुळे राष्ट्रभावना, एक देश आशा विचारासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. या विचारांनी प्रेरित होऊन पंडितजी यांनी १९४२ साली राष्ट्रकार्यांसाठी पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम करण्याचा निश्‍चय केला. लोककल्याण व राष्ट्रवाद या विचारांशी कधी तडजोड न करणारे पंडितजींच्या अंगी बालपणापासूनच संघटनात्मक कौशल्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. शिक्षण पूर्ण झाल्यावर प्राध्यापकांची नोकरी न करता संपूर्ण जीवन राष्ट्रकार्यांसाठी अर्पण करीत एक मोठी विचारधारा या देशात स्व. दीनदयायजी उपाध्याय यांनी निर्माण केली. साधी राहणीमान आणि उच्चविचार ही त्यांची ओळख तयार झाली. भारताचा विकास हा संस्कृतीवरील विचारधारेवरच होऊ शकतो, असे सांगत सदैव आपल्या सिद्धांताशी ठाम राहिले. शिक्षणतज्ज्ञ, राजकारणाचे जाणकार, पत्रकार, तत्वज्ञानी असलेल्या पंडितजींनी साहित्यात त्यांची रुची असल्यामुळे चंद्रगुप्त नावाच्या नाटकाची निर्मिती केली असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राष्ट्रधर्म नावाचे मासिक, पांचजन्य साप्ताहिक व स्वदेशी दैनिकाच्या माध्यमातून राष्ट्रवादी विचार मांडल्याचेही ते म्हणाले.

अत्यंत निर्धारपणे काम करणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिजे जात होते. त्यांनी एकात्म मानव वादाचा सिद्धांत मांडला. पश्‍चिमी जीवनाचा त्यांनी पुरस्कार केला. मात्र, त्या जीवनशैलीचा अंगीकार केला नाही. जो जन्माला आला, त्या प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि त्याला जगविण्याची जबाबदारी समाज घेईल. हीच भारतीय संस्कृती असून, त्यावरच आपली भारतीय अर्थव्यवस्था उभी राहिली पाहिजे असा विचार मांडला. संघर्षाच्या आधारावर परिवर्तन होऊ शकते, क्रांती होऊ शकते पण शाश्वत विकास होऊ शकत नाही असा विचार उपाध्ययजी यांनी मांडला. भोगवाद सोडून आवश्यक तेवढेच मिळवायचे आणि त्यावर आधारित जगायचे, तरच आपण शाश्वत अर्थव्यवस्था तयार करू शकतो असे तत्त्व मांडले. आज जगाला हे तत्त्व पटले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

विरोधी पक्ष म्हणजे विपक्ष नव्हे तर विकल्प आहे. मानव जन्माला येतो तो कृत्रिमरित्या तयार होत नाही. तसच राष्ट्रसुद्धा कृत्रिमरित्या तयार करता येत नाही, झाल्यास टिकट नसल्याचे सांगत प्रत्येक राष्ट्रााला एक नैसर्गिक स्वभाव स्वभाव असतो त्यालाच आपण राष्ट्रीय अस्मिता म्हणत, असे दीनदयाय उपाध्याय यांच्या विचारांची जाणीव मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सभागृहाला करून दिली. या कार्यगौरव प्रस्तावावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही पंडितजींच्या विचारांना उजाळा देत त्यांचा कार्यगौरव केला.

नानाजी देशमुख म्हणजे राजकीय जीवनाचा वस्तूपाठ

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उच्चशिक्षण घेतल्यानंतरही देशकार्यात झोकून देणार्‍या नानाजी देशमुख यांनी समाजात राष्ट्रकार्य रूजविण्याचे कार्य केले होते. वयाची साठ वर्षे झाल्यानंतर राजकीय निवृत्ती घेऊन समाजकार्यात झोकून देणार्‍या ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांनी राजकीय जीवन कसे असावे याचा वस्तूपाठ घालून दिला, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
मुख्यमंत्री म्हणाले, शिक्षण हे आवडते कार्यक्षेत्र असणार्‍या देशमुख यांनी उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे सरस्वती शिशू मंदिराची स्थापना केली. आज या संस्थेच्या उत्तरप्रदेशमध्येच ३५ हजार शाळा आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासमवेत त्यांनी तीन नियतकालिकांच्या माध्यमातून अखिल भारतीय स्तरावर ओळख निर्माण केली. देशमुख यांनी नागपूर येथे बालजगत संस्थेची स्थापना केली तर बीड जिल्ह्यात जलसंधारणाचे मोलाचे काम केल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. रोजगारापेक्षा स्वयंरोजगारावर भर देणार्‍या आणि प्रत्येक हाताला काम या उद्देशाने विविध उपक्रम राबविणार्‍या नानाजींना ‘राष्ट्रऋषी’ची उपमा दिली जाते. उत्तरप्रदेशमधील चित्रकूटमध्ये त्यांनी पहिले ग्रामीण विद्यापीठ स्थापन केले. कृषी क्षेत्रातील त्यांचे कार्य मोलाचे होते. महाराष्ट्रातील कृषी संजीवनी योजनेला नानाजी देशमुख यांचे नाव देण्यात आले आहे, ही महाराष्ट्राचे सुपुत्र असणार्‍या नानाजी देशमुख यांना खरी श्रद्धांजली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.