राममंदिर पाडूनच मशीद बांधली

0
58

•शिया वक्फ बोर्डाचा सुप्रीम कोर्टात दावा

नवी दिल्ली, १० ऑगस्ट
अयोध्येतील ज्या जागेवर १९९१ मध्ये बाबरी मशिदीचा विध्वंस करण्यात आला तिथे आधी भगवान श्रीरामाचे मंदिरच होते. पण, हे मंदिर पाडून बाबरी मशीद बांधण्यात आली होती, असा दावा शिया वक्फ बोडाने आज गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात केला.
बाबरी मशिदीच्या मालकी हक्काची कायदेशीर लढाई हरल्याच्या ७१ वर्षानंतर शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विशेष न्यायालयाने ३० मार्च १९४६ रोजी या मुद्यावर आपला निर्णय देताना ही मशीद सुन्नी वक्फ बोर्डाची मालमत्ता असल्याचे म्हटले होते. त्याला शिया वक्फ बोर्डाने आव्हान दिले आहे.
अयोध्येतील या जागेवर सुरुवातीला रामाचे मंदिरच होते. पण, ते मंदिर पाडण्यात आले आणि तिथे बाबरी मशीद उभी करण्यात आली होती, असे शिया बोर्डाने न्यायालयात स्पष्ट केले.
मंगळवारी शिया वक्फ बोर्डाने वादग्रस्त जागेवर रामाचे मंदिर बांधण्यास आमचा काहीच आक्षेप नसल्याची भूमिका घेतली होती. तिथे मंदिरच बांधले जावे आणि त्यापासून काही विशिष्ट अंतरावर मुस्लिमबहुल भागात आम्हाला मशीद बांधण्याची परवानगी देण्यात यावी, असेही शिया बोर्डाने म्हटले होते.
अयोध्येत ही मशीद शिया मुस्लिमांनीच बांधली होती, त्यामुळे विशेष न्यायालयाने बाबरी मशीद सुन्नी वक्फ बोर्डाची संपत्ती असल्याचा दिलेला निर्णय चुकीचाच होता. मुघल बादशाह बाबराने या मशिदीचे बांधकाम केले होते, या दंतकथेलाच शिया बोर्डाने आव्हान दिले असून, बाबरचा एक मंत्री अब्दुल मीर बाकी याने आपल्या पैशाने ही मशीद बांधली होती, असा दावा शिया बोर्डाने केला. अब्दुल मीर बाकी हा शिया मुस्लिम, तर बाबर सुन्नी मुस्लिम होता, अशी माहिती देण्यात आली आहे.
शिया वक्फ बोर्डाच्या मते, मंदिर तोडून मशीद बांधण्यासाठी बराच कालावधी लागणार असल्याने बाबर अयोध्येत फक्त पाच ते सहा दिवस थांबला होता. केवळ मशीद बांधण्याचा आदेश देणे म्हणजे ती व्यक्ती त्या संपत्तीची मालक होत नाही. बाबराने कदाचित अब्दुल मीर बाकीला मशीद बांधायला सांगितले असावे. अब्दुल मीर यानेच जागेची निवड करून राममंदिर पाडले आणि तिथे मशीद बांधली, असेही शिया बोर्डाने म्हटले आहे.
मशीद बांधण्यात आल्यापासून शिया मुस्लिमच त्याची देखरेख करीत होते, मात्र १९४४ मध्ये ब्रिटिशांनी चुकीच्या पद्धतीने ही सुन्नी वक्फची संपत्ती असल्याचा निकाल दिला. यानंतर १९४५ मध्ये फैजाबाद दिवाणी न्यायालयानेही अशाच प्रकारचा निकाल दिला होता, असा आरोप शिया बोर्डाने केला आहे. मशिदीत अनेक पुरावे उपलब्ध आहेत, ज्यानुसार अब्दुल मीर बाकीनेच ही मशीद बांधल्याचे सिद्ध होते, असेही शिया बोर्डाने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)