१५ ऑगस्टपासून देशभर संकल्प ते सिद्धी अभियान राबवा : मोदी

माझ्या, तुमच्यापेक्षाही पक्ष मोठा

0
67

•-अनुपस्थितीबद्दल पक्ष खासदारांची खरडपट्टी
•-प्रत्येक वेळी व्हिप का जारी करायचा
•-काय करायचे करा, २०१९ मध्ये पाहून घेईन
नवी दिल्ली, १० ऑगस्ट
भाजपा सदस्यांच्या सभागृहातील अनुपस्थितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी आपली तीव्र नाराजी पुन्हा एकदा व्यक्त करीत खासदारांची चांगलीच खरडपट्टी काढली. सभागृहात उपस्थित राहण्याबाबत तुम्हाला वारंवार का सांगावे लागते, तुम्ही स्वत:ला समजता काय, असा प्रश्‍न विचारत मी आणि तुम्ही काहीच नाही, पक्ष सर्वांत मोठा आहे, या शब्दात मोदी यांनी खासदारांना सुनावले.
भाजपा संसदीय पक्षाच्या आज सकाळी संसदभवनात झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी पक्षाच्या सर्वच खासदारांना धारेवर धरले. मोदी यांचा आजचा रुद्रावतार पाहून भाजपा खासदारांना चांगला घाम फुटला.
सभागृहात उपस्थित राहणे ही प्रत्येक खासदाराची नैतिक जबाबदारी आहे, सभागृहात उपस्थित राहण्याबाबत पक्षादेश (व्हीप) का काढावा लागतो, अशी संतप्त विचारणा करीत मोदी म्हणाले की, तुम्हाला काय करायचे ते करा, मी सर्वांना २०१९ मध्ये पाहून घेईल.
उपराष्ट्रपतिपदी व्यंकय्या नायडू यांच्या निवडीचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, आता राज्यसभेत आपले नवीन अध्यक्ष आले आहेत, त्यामुळे तुमचे मौजमस्तीचे दिवस संपले.
सभागृहातील विशेषत: राज्यसभेतील भाजपा सदस्यांच्या वाढत्या अनुपस्थितीबद्दल वारंवार सूचना देऊनही सुधारणा झाली नाही. भाजपा सदस्यांची सभागृहातील उपस्थिती वाढली नाही. भाजपा सदस्यांच्या राज्यसभेतील अनुपस्थितीमुळे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याबाबतच्या विधेयकावर विरोधकांनी सूचवलेली दुरुस्ती मान्य करण्याची नामुष्की सरकारवर आली होती. मागील आठवड्यात झालेल्या भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत अध्यक्ष अमित शाह यांनी खासदारांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्या बैठकीला पंतप्रधान मोदी उपस्थित नव्हते.
२०२२ पर्यंत आपल्याला नवा भारत घडवायचा आहे, त्यासाठी १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्टपयर्र्ंत देशभर संकल्प से सिद्धी अभियानाचे आयोजन करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले. १९४२ मध्ये स्वातंत्र्य आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात आले, त्यानंतर ५ वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळाले, याकडे लक्ष वेधत मोदी यांनी २०२२ मध्ये नवा भारत आम्हाला घडवायचा आहे, त्यासाठी २०१७ ते २०२२ पर्यंतचा ५ वर्षाचा कार्यकाळ आमच्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे या काळात नवीन भारताची घोषणा आणि त्यांचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे, कामाला लागले पाहिजे, असे आवाहन केले.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील भाजपा संसदीय पक्षाची आजची शेवटची बैठक होती. या बैठकीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, संसदीय कामकाज मंत्री अनंकुमार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार उपस्थित होते.
गुजरातमध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी अमित शाह आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे अभिनंदन केले. मोदी यांनी अमित शाह यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले, तसेच मिठाई देत त्यांचे तोंड गोड केले. अमित शाह यांचा अध्यक्षपदाचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दलही मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. अमित शाह पहिल्यांदाच राज्यसभेवर निवडून आले आहेत. (तभा वृत्तसेवा)