देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना

0
72

हमीद अन्सारींच्या विधानावर सार्वत्रिक टीका 

नवी दिल्ली, १० ऑगस्ट

देशातील नागरिकांमध्ये विशेषत: दलित, मुस्लिम आणि ख्रिश्‍चन लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे, याकडे लक्ष वेधत मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी देशातील मुस्लिमांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली. दरम्यान, त्यांनी उपराष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ संपत असताना केलेल्या या  विधानाचा विविध संस्था-संघटनांतर्फे जोरदार निषेध केला जात आहे. राज्यसभा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बंगळुरूच्या नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीमध्ये भाषण करतांना जी चिंता व्यक्त केली होती, त्याचा या मुलाखतीत पुनरुच्चार केला.

सांस्कृतिक राष्ट्रवाद हा राष्ट्रवादाचे मुक्त स्वरूप नाही, अशा प्रकारचा राष्ट्रवाद देशात असहिष्णुता आणि देशभक्तीच्या नावावर दहशत निर्माण करतो, याकडे लक्ष वेधत अन्सारी म्हणाले की, देशातील नागरिकांमध्ये विशेषत: दलित, मुस्लिम आणि ख्रिश्‍चन लोकांमध्ये असुरक्षितेतची भावना घर करून राहिली आहे. ही असुरक्षितता दूर करण्यात सरकार कमी पडत असून, हा चिंतेचा विषय आहे. कोणाच्या भारतीयत्वावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणे अतिशय दुर्दैवी आहे, वारंवार आपल्या देशभक्तीचे पुरावे देण्याची कोणाला गरज नाही, मी भारतीय आहे, एवढेच पुरेसे आहे, असे अन्सारी म्हणाले. मुस्लिमांमध्ये वाढत असलेल्या असुरक्षितेतच्या भावनेबाबत आपण एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चाही केली होती, याकडे लक्ष वेधत या चर्चेचा तपशील सांगण्याचे हमीद अन्सारी यांनी नाकारले. देशातील लोकांमध्ये देशभक्तीची भावना वाढली पाहिजे, याकडे लक्ष वेधत अन्सारी यांनी धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केला. सभापती मग तो लोकसभेचा असो की राज्यसभेचा, त्याची भूमिका पंचासारखी असते. मर्यादित चौकटीतच त्याला काम करावे लागते, असे अन्सारी म्हणाले. (तभा वृत्तसेवा)