२५० मीटर मागे जा२५० मीटर मागे जा•

0
113

भारताचा चिनी सैनिकांना स्पष्ट इशारा

नवी दिल्ली, १० ऑगस्ट

डोकलाम मुद्यावरून भारताला गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने युद्धाच्या धमक्या देणार्‍या चीनने आता काहिशी मवाळ भूमिका घेतली आहे. डोकलामच्या वादग्रस्त भूमीतून १०० मीटरपर्यंत माघार घेण्याची तयारी चीनने आज गुरुवारी दर्शविली. पण, केवळ १०० नव्हे, तर २५० मीटर अंतरापर्यंत माघार घ्या, त्यानंतरच आम्ही मागे हटू, असा स्पष्ट इशारा भारताने दिला आहे.युद्धाच्या धमक्या देऊनही भारतीय जवान मागे हटायला तयार नसल्याने चीनने अखेर समेटाची भाषा सुरू करीत युद्ध टाळण्यासाठी आमचे सैनिक १०० मीटरपर्यंत माघारी जायला तयार असल्याचे जाहीर केले. पण, भारताने चीनची ही भूमिका अमान्य केली. सीमेच्या दोन्ही बाजूंनी २५० मीटर अंतरापर्यंत कोणत्याही देशाचा सैनिक तैनात राहायला नको. त्यामुळे तुम्ही १०० ऐवजी २५० मीटरपर्यंत मागे जा. त्यानंतर आम्हीदेखील तितक्याच अंतरावर माघार घेऊ, असे भारतीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. संघर्ष आम्हालाही मान्य नाही. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून सुरू असलेला हा वाद मतैक्यानेच सुटावा, असे आम्हालाही वाटते. दोन्ही देशांच्या सैनिकांनी जर वादग्रस्त भूभागातून समान अंतरावर माघार घेतल्यास वादाचा मुद्दाच राहणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

भूतानच्या स्पष्टीकरणामुळे चीन तोंडघशी

डोकलाम आमचाच भूभाग असून, डोकलामवरून आम्ही दावा सोडलेला नाही, अशा ठाम शब्दांत भूतान सरकारने आज आपला दावा स्पष्ट केला आहे. चीनकडून देण्यात येणारी माहिती पूर्णपणे चुकीची असून, दिशाभूल करणारी असल्याचेही भूतान सरकारने स्पष्ट केले आहे.सूत्रानुसार, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी डोकलाम चीनच्या हद्दीत येत असल्याचे भूतानने मान्य केल्याचा दावा केला होता. भारत आणि चीनचे सैन्य डोकलाममध्ये ज्याठिकाणी समोरा-समोर आहेत, तो भाग भूतानच्या हद्दीत येत नाही असे भूतानने आपल्या राजनयिक चॅनेलच्या माध्यमातून चीन सरकारला कळवले आहे. डोकलाम समस्यावर आमची भूमिका स्पष्ट असून, २९ जून रोजी भूतानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली माहिती आमची अधिकृत भूमिका आहे. डोकलाममध्ये थेट रस्ता बांधायला सुरुवात करणे हे कराराचे उल्लंघन आहे. अशा प्रकारामुळे दोन देशांमधील सीमांकन करण्याच्या प्रक्रियात अडथळे येईल, असही भूतानने म्हटले आहे.दरम्यान, चीनने डोकलाममध्ये सैनिकांची संख्या वाढवली आहे. वादग्रस्त जागेपासून एक किलोमीटरच्या अंतरावर चीनने ८०० सैनिकांची तैनाती केल्याचे वृत्त भारतीय माध्यमांनी दिले आहे. चीनने या भागात ८० तंबू टाकले आहेत.भारताचे ऑपरेशन अलर्टवादग्रस्त भागात भारताचे ३५० जवान तैनात असून, चीनच्या बाजूला कोणतीही हालचाल होत नसल्याचे  भारतीय लष्कराने म्हटले आहे. भारतीय लष्कराने आपल्या तुकड्यांसाठी दोन आठवड्यांचा ऑपरेशन अलर्ट कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरऐवजी ऑगस्टमध्ये हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येईल. डोकलाममध्ये दोन्ही देशांचे सैन्य समोरा-समोर उभे ठाकल्याच्या घटनेला आता ५० पेक्षा जास्त दिवस झाले आहेत.

गाव खाली करण्याचे आदेश

सीमेवरील तणावात मोठी वाढ झाल्याने भारतीय लष्कराने डोकलामपासून ३५ किलोमीटरवर असलेल्या नाथनांगमधील नागरिकांना आपले गाव खाली करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सुकनाकडून लष्कराची तुकडी डोकलामकडे रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारतीय सैन्याकडून याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.