प्रॉडुनोव्हा गर्ल वळली हॅण्डस्प्रिंग ५४० कडे

0
89

नवी दिल्ली, १० ऑगस्ट

रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रॉडुनोव्हा जिम्नॅस्टिक्सचा मार्ग दाखविल्यानंतर भारताच्या दीपा कर्माकरने आता प्रॉडुनोव्हाला पर्याय म्हणून हॅण्डस्प्रिंग ५४० हा नवीन जिम्नॅस्टिक्स प्रकार निवडला आहे. तिने आगामी २०१८ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ५४० हॅण्डस्प्रिंग प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.रिओ ऑलिम्पिकमध्ये दीपाने प्रॉडुनोव्हा सारखा कठीण जिम्नॅस्टिक्स प्रकारात प्रदर्शन करून समस्त जगाचे लक्ष वेधले व प्रशंसा मिळविली, परंतु दुर्देवाने तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले व तिचे पदक थोडक्यात हुकले. ऑलिम्पिकनंतर सराव करताना त्रिपुराची जिम्नॅस्ट दीपाच्या उजव्या गुडघ्याला ऍण्टेरियर क्रुशल लिगामेंट (एसीएल) दुखापत झाली. एप्रिल महिन्यात शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून तिने कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला नाही. आता तिला आशियाई जिम्नॅस्टिक्स स्पर्धेला मुकावे लागले. तसेच ती कॅनडामध्ये होणार्‍या आगामी विश्‍व जिम्नॅस्टिक्स स्पर्धेतही भाग घेणार नाही.

गत सोमवारी आपला २४ वा जन्मदिवस साजरा करणारी दीपा कर्माकर पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणार्‍या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून पुनरागमन करणार आहे. आता दीपाने आपल्या जिम्नॅस्टिक्स कौशल्यात आणखी एका नवीन वॉल्टची भर घातली आहे. ती हॅण्डस्प्रिंग ५४० प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करेल.हॅण्डस्प्रिंगला ५४० अंशाचे वळण आहे. हा जिम्नॅस्टिक्स प्रकार कठीण आहे, पण प्रॉडुनोव्हापेक्षा कमी कठीण आहे, असे दीपा म्हणाली.प्रॉडुनोव्हा गर्ल म्हणून तुझी ओळख आहे, मग हे परिवर्तन कां केले असे विचारताच ती म्हणाली की, मला एसीएलची दुखापत आहे, त्यामळे मी कोणतेही दडपण घेऊ इच्छित नाही. माझे मुख्य लक्ष्य २०२० टोकिओ ऑलिम्पिक आहे. जर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मी अचूकपणे हॅण्डस्प्रिंग ५४०चे प्रदर्शन केले, तर पदक निश्‍चित जिंकेल.

यासोबतच प्रॉडुनोव्हासुद्धा सुरू राहील. गत ग्लॅसगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दीपाने कांस्यपदक पटकावले होते. दीपा जगातील केवळ पाच जिम्नॅस्टपैकी एक आहे, ज्यांनी प्रॉडुनोव्हाचा यशस्वी प्रयत्न केला आहे. दीपाचे प्रशिक्षक बिसश्‍वेर नंदी म्हणाले की, दीपाच्या शारीरिक तंदुरुस्तीची काळजी घेतली जात आहे. दीपासाठी नवीन वॉल्ट का निवडला यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, दीपा कोणतेही दोन जिम्नॅस्टिक्स प्रकारात प्रदर्शन करू शकते. (वृत्तसंस्था)