मुख्यमंत्र्यांच्या समालोचनाने रंगला आमदारांचा फुटबॉल फिवर

0
79

फुटबॉल खेळाला प्रोत्साहनासाठी प्रदर्शनीय सामना
मुंबई, १० ऑगस्ट
सतरा वर्षांखालील फुटबॉल खेळाडूंसाठी भारतात फिफा वर्ल्ड कप २०१७ सुरू होत आहे. त्याचे औचित्य साधून राज्यातील कानाकोपर्‍यात मुलांनी फुटबॉल खेळावा, यासाठी गुरुवारी विधिमंडळाच्या आवारात दोन्ही सभागृहांच्या आमदार आणि मंत्र्यांनी चक्क फुटबॉल खेळ खेळला. खेळाला धावते समालोचन लाभले ते विदर्भ बास्केटबॉल असोसिएशनचे माजी अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे. या सामन्यामुळे काही काळ विधानमंडळ आवाराला फुटबॉल ज्वर चढला होता.
दर पाच वर्षांनी निवडणुकीचा सामन्याचा मतदानाचा गोल आपल्याच पदरात पाडून घेण्यात माहीर असलेले आमदार चक्क विधिमंडळाच्या आवारात उभारण्यात आलेल्या फुटबॉल मैदानात गोल मारताना दिसले. यात विधानसभेतील आमदारांचा विधानसभा अध्यक्ष इलेव्हन संघ, तर विधान परिषद आमदारांचा सभापती इलेव्हन संघ निर्माण केलेला होता.
नेहमी विधिमंडळात महाराष्ट्राच्या कोट्यवधी जनतेचे प्रतिनिधित्व करीत त्यांचे प्रश्न व समस्या मांडणारे आमदार गुरूवारी फुटबॉल खेळताना दिसले. अध्यक्ष इलेव्हन विरुध्द सभापती इलेव्हन हा असा मैत्रीपूर्ण सामना चांगलाच रंगला. सामन्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी समालोचन केले. १७ वर्षाखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा भारतात होणार असून त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन १ मिलियन ची घोषणा केली आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर मिशन ११ मिलियन हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मिशन १ मिलियन हा फुटबॉल क्रांती प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्रात मिशन १ मिलियन- अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय अभियानाची योजना केली आहे. याच संकल्पनेतून आज विधिमंडळाच्या परिसरातील वाहनतळाच्या मोकळ्या जागेत अध्यक्ष इलेव्हन विरुध्द सभापती इलेव्हन असा सामना आयोजित केला होता. सर्वपक्षीय आमदार या फुटबॉल सामनामध्ये सहभागी झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन्ही संघाच्या कर्णधारांच्या समोर नाणेफेक करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किक मारुन फुटबॉल सामन्याचा शुभारंभ केला.
या सामना पाहण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरिश बापट, अजित पवार, सुनिल तटकरे,पतंगराव कदम, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांच्यसह सर्वपक्षीय आमदार उपस्थित होते. (तभा वृत्तसेवा)