योगेश्‍वरचे लक्ष फिटनेस, राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेवर

0
78

नवी दिल्ली, १० ऑगस्ट
गत एका वर्षापासून कोणत्याही स्पर्धेत भाग न घेणारा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्‍वर दत्त सध्या आपल्या शारीरिक तंदुरुस्तीवर लक्ष देत आहे, जेणेकरून तो पुढील वर्षी होणार्‍या राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत भाग घेऊ शकेल.
योगेश्‍वर गत काही वर्षांपासून दुखापतीच्या समस्येला तोंड देत आहे. त्यामुळेच त्याने गतवर्षी रिओ ऑलिम्पिकनंतर कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला नाही, परंतु त्याने अजूनही मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची आशा सोडली नाही.
द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक कॅप्टन चांदरुप यांच्या पुतळ्याचे अनावरण योगेश्‍वर दत्तच्या हस्ते झाले.
मी सध्या आपल्या शारीरिक तंदुरुस्तीवर लक्ष देत आहो व त्याकरिता मी दररोज सकाळी व सायंकाळी कमीत कमी ५ तास सराव करीत आहो, परंतु मी हे सर्व आपल्या फिटनेससाठी करीत आहे, कारण मी गत काही काळापासून दुखापतीच्या समस्येला तोंड देत राहिलो व त्यामुळे आता आपली शारीरिक तंदुरुस्ती उत्तम ठेवणे याला प्राधान्य देत आहो.
लंडन ऑलिम्पिकमध्ये ६० कि.ग्रॅ. वजनगटात कांस्यपदक जिंकणारा ३४ वर्षीय योगेश्‍वर दत्त म्हणाला की, पुढल्या वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा व आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहे. जर मी तंदुरुस्त राहिलो, तर या दोन्ही स्पर्धेत भाग घेईल. सध्या टोकिओ ऑलिम्पिकबाबत काहीही विचार केला नाही, असेही तो म्हणाला.
भारतीय कुस्तीपटूंची पुढील परीक्षा आता पॅॅरिसमध्ये या महिन्याच्या अखेरीस होणार्‍या विश्‍व कुस्ती स्पर्धेत होणार आहे.
(वृत्तसंस्था)