अध्यात्म

0
18

श्रीशिवमहिम्नस्तोत्र!

आपल्याकडे घरोघरी सायंकाळी देव-देवतांची स्तोत्रे म्हणण्याची परंपरा आहे. पैकी शिवमहिम्नस्तोत्र हे प्रमुख स्तोत्र आहे. या स्तोत्रात एकूण ४३ श्‍लोक असून, ३१ पर्यंतच्या रचना शिवस्तुतीच्या आहेत. नंतर स्तोत्राचे माहात्म्य आणि फलश्रुती आहे. आठव्या श्‍लोकात कवी म्हणतो, हे महेशा, तुझा परिवार वृद्ध नंदिकेश्‍वर, खट्‌वांग (शंकराचे एक शस्त्र), परशु, गजचर्म, चिताभस्म, सर्प आणि रुंडमाला असा दरिद्री आहे. परंतु, तुझ्या सेवेने व कृपेने देवादिक पाहिजे तितकी संपत्ती मिळवू शकतात. तू स्वत: मात्र भणंग भिकार्‍यासारखा दरिद्री राहतो. याचे कारण जो परमात्मस्वरूपात नेहमी रमतो त्याला शब्द, स्पर्श, रूप, रस, गंधादी विषयांचे मृगजल कधीच मोहित करू शकत नाही.
हे त्रिनयना, समुद्रमंथनाचे वेळी उत्पन्न झालेले कालकूट जेव्हा त्रैलोक्याला जाळून भस्म करू लागले, तेव्हा तुम्हीच कृपावंत होऊन त्या विषाचे प्राशन केेले आणि संपूर्ण विश्‍वाला अभय दिले. विषामुळे तुमच्या कंठाला जो नीलवर्णाचा डाग पडला तो कंठाला शोभा देत नाही काय? खरेच आहे, ही जगाची भीती नष्ट करण्यासाठी झटणार्‍याचा दोषही प्रशंसनीय होते असतो.
हे महादेवा, त्रिपुरासुराला जाळून भस्म करण्याकरिता तुम्ही केवढा खटाटोप केलात? धरणीचा रथ केला, ब्रह्मदेवाला सारथ्य दिले, मेरूपर्वत धनुष्य म्हणून वापरला, सूर्य-चंद्राची चाकं आणि श्रीविष्णूंचा शर केला आणि अचूक शरसंधान साधून एकाच बाणात त्रिपुरांसहित त्या असुराला नष्ट केले. पण, हे सर्व तुमच्या केवळ इच्छामात्रे सहजगत्या पार पडले असते. मग एवढा जामानिमा कशाला? तर ही तुमचीच लीला होती.(१८)
एकदा श्रीविष्णू तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी, तुमच्या चरणकमलांवर वाहण्यासाठी, सहस्रकमलांचे ताट घेऊन बसले. वाहता वाहता त्यातील एक कमल अदृश्य झाले. (त्यांची भक्ती पाहण्यासाठी तूच ते अदृश्य केले होते.) तेव्हा सहस्रसंख्या पूर्ण होण्यासाठी भगवंताने आपले नेत्रकमल स्वहस्ते उपटून तुम्हाला समर्पण केले. इतकी पराकोटीची भक्ती पाहून तिचे फलित म्हणून तूच स्वत: सुदर्शनचक्राचे रूप धारण करून त्या रूपात विष्णूंच्या हाती राहून तिन्ही जगांच्या रक्षणार्थ सदैव जागरूक आहेस.
हे महेश्‍वरा, समुद्राचे पात्रात काळ्या पर्वताएवढे काजळ कालवून शाई बनवली. कल्पवृक्षाच्या फांदीची लेखणी केली. लिहिण्यासाठी कागद म्हणून पृथ्वी कल्पिली आणि प्रत्यक्ष वाग्देवी सरस्वती जरी सर्वकाळ लिहीत बसली तरीही तुझ्या गुणांचा पार लागणार नाही. (३२)
देव, दानव, ऋषी-मुनी यांनी पूजिलेला आणि ज्याच्या गुणांचे माहात्म्य सर्वत्र वर्णिलेले आहे अशा निर्गुण निराकार ईश्‍वराचे हे नितांत सुंदर स्तोत्र त्या स्वयंभू शंकराच्या गणांतील प्रमुख पुष्पदंत नावाचा गंधर्व याने विशाल वृत्तांनी वर्णिले आहे. (३३)
हे शिवाचे परमपवित्र स्तोत्र भक्तिपूर्वक व शुद्ध अंत:करणाने जो पठण करतो तो शिवलोकात शिवमय होतो आणि इहलोकी धनवान, आयुष्यमान, पुत्रवान व कीर्तिमान होतो (३४)
भक्तगणहो, महेशासारखा दुसरा श्रेष्ठ देव नाही. महिन्मस्तोत्राहून दुसरी श्रेष्ठ स्तुती नाही. प्रणवाहून दुसरा श्रेष्ठ मंत्र नाही आणि गुरूहून श्रेष्ठ असे दुसरे तत्त्व नाही. (३५)
देवाधिदेव महादेवाचा सेवक पुष्पदंत (कुसुमदशन) नावाचा एक गंधर्वराज होता. तो शंकराच्या रोषामुळे आपल्या अधिकारापासून भ्रष्ट झाला होता. त्याने हे शंकराच्या महिम्याचे दिव्य स्तोत्र रचले. (३७)
देव व मुनी यांना मान्य झालेले व स्वर्ग आणि मोक्ष यांचे मुख्य साधन असलेले हे पुष्पदंतविरचित अमोघ स्तोत्र जो मनुष्य एकाग्रचित्ताने पठण करेल तो शिवाचे समीप जाईल (त्याला समीपता ही मुक्ती मिळेल) (३८)
पुष्पदंताच्या मुखारविंदातून निघालेले, सर्व पापे नाहीसे करणारे व शंकराला प्रिय असणारे हे स्तोत्र कंठस्थ करून एकाग्र चित्ताने जो पठण करेल त्याचेवर तो भूतादिनाथ महादेव संतुष्ट होतो. (३९)
श्रीपुष्पदंताच्या मुखकमलातून निघालेल्या, पापाचा नाश करणार्‍या शिवाला प्रिय असणार्‍या या स्तोत्राचा पाठ करून एकाग्रतेने म्हटल्या जाणार्‍या या स्तोत्राने सर्व प्राण्यांचा प्राणेश्‍वर महेश्‍वर अत्यंत प्रसन्न होतो.
सकृद्दर्शनी हे काव्य क्लिष्ट, नीरस वाटते. पण, त्याचे अंतरंगात शिरल्यावर हा समज नाहीसा होतो. अभ्यासू रसिक व्यक्तीला ते अतिशय मधुर, रसाळ असल्याचा प्रत्यय येतो. उपमाच द्यायची तर महिम्नाला महाकवी भारवीच्या किरातार्जुनीयम्‌ची द्यावी लागेल. भारवीच्या काव्याबद्दल सुभाषितकार म्हणतो, ‘नारिकेलफलसंमितं वचो भारते:’ (बाहेरून कठीण पण अंतरंगात नारळातील जलाप्रमाणे रसपूर्ण, मधुर आहे.)
रा. ना. कुळकर्णी
०७१२-२२९०७२७