संकल्प

0
38

अखंड भारताचे ध्येय

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. सर्वत्र आनंदीआनंद पसरला, परंतु हा आनंद खराखुरा आनंद होता काय? सच्चा राष्ट्रभक्त या स्वातंत्र्यप्राप्तीच्या जल्लोशात मनापासून सामील झाला होता काय? या आनंदाला कुठेतरी दु:खाची किनार लाभली होती काय? स्वातंत्र्यप्राप्तीच्या या सोहळ्यात आम्ही काय गमावले आहे, हे विचारही विरून गेले होते की काय? असे अनेक प्रश्‍न, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्म घेतलेल्या, स्वतंत्र भारतात वाढणार्‍या पिढ्यांना पडणे साहजिक आहे. स्वातंत्र्याची किंमत आम्ही एका मुस्लिम राष्ट्राची निर्मिती करून चुकवली आहे, हे एक यथार्थ व भीषण वास्तव आहे, हे विसरता कामा नये. सन १९४७ साली देशाची फाळणी झाली, जी अत्यंत दुर्दैवी घटना घडली, ज्याचे दुष्परिणाम आम्ही आजतागायत भोगतो आहोत. देशाच्या बाह्यशत्रू कारवायांशी लढणे सोपे आहे, अवघड आहे ते राष्ट्रांतर्गत विघातक कारवायांना तोंड देणे. पाकिस्तानची निर्मिती झाली व पाकिस्तानची मागणी करणारे पाकिस्तानात निघून गेले व उरलेले मुस्लिम हे सर्व राष्ट्रभक्त आहेत, असे आभासी वातावरण आमच्या देशात पसरले. गुण्यागोविंदाने नांदणार्‍या एखाद्या एकत्र कुटुंबातून एखादा सदस्य आपल्या हिश्श्यासाठी भांडून वेगळा झाला, पण त्याच्या मूलप्रवृत्तीने पुनश्‍च संपूर्ण घराला आपल्या कुटिल प्रवृत्तीने गिळंकृत केले. एवढेच नव्हे, तर त्या कुटुंबाच्या अन्य कमकुवत सदस्यांनाही आपल्या कारस्थानात सामील करून कुटुंब व घराची वाताहत करण्याची इच्छा बाळगू लागल्यास, कुटुंबप्रमुखाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील व आपले सार्वभौमत्व टिकवण्यासाठी प्रयास करावे लागतील, हे निश्‍चित!
राष्ट्रभक्तीने प्रेरित प्रत्येक नागरिक या कुटुंबाचा सदस्य आहे व त्याला स्वप्नरंजनाचा नव्हे, अखंड भारताचा संकल्प घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. १४ ऑगस्ट हा दिवस विश्‍व हिंदू परिषदेद्वारे अखंड भारत संकल्प दिन म्हणून पाळला जातो. अखंड भारताच्या संकल्पपूर्तीसाठी तशी इच्छा प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी म्हणून जनजागृती, प्रबोधनाद्वारे अखंड भारताचे स्वप्न प्रत्येकाच्या हृदयात ज्योतिस्वरूपात तेवत राहावे, ही सदिच्छा!
काही अवघड समस्या कधी सुटूच शकत नाही, असे बर्‍याच लोकांना वाटत असते. त्यामुळे वाळूत चोच, मान खुपसून समस्यांशी डोळेझाक करणार्‍या बर्‍याच शहामृगांची मांदियाळी आपण अनुभवतो. अखंड भारत एक असंभव घटना आहे हे मान्य करून, ‘जैसे है वैसे ही रहेंगे’ या उक्तीप्रमाणे स्वत:ला घडवणारे महाभाग समाजात आपण बघतो. भारताच्या गौरवशाली इतिहासाची नीट माहिती नसणारे अखंड भारताच्या कल्पनेला हास्यास्पद ठरवतात. काही स्थापित सत्य असंभव वाटणारे संभव झालेले आपण बघितले आहे. उदारणार्थ- इस्रायल देशातून यहुदी विस्थापित झाले, परंतु यहुदींच्या प्रबळ इच्छाशक्तीने संघटितपणे कार्य करून या स्थापित सत्याला बदलवले व इस्रायल, आपल्या मातृभूमीत पुनश्‍च त्यांचे आगमन झाले. ही असंभव वाटणारी गोष्ट घडली केवळ जागरूकतेने, संघटित होऊन लढा दिल्याने! शहामृगांनी या गोष्टींना आदर्श मानून अखंड भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार करावा, ही अपेक्षा.
सोन्याचा धूर निघणार्‍या सुजलाम्, सुफलाम् भारत देशाचे असे तुकडे होतील, हे त्या काळी कुणी मान्यही करणे दुरापास्त असूनदेखील असंभव गोष्ट संभव होऊन आज कित्येक वर्षे लोटली आहेत. द्वितीय महायुद्धानंतर जर्मनीचेही विभाजन झाले होते, परंतु आज जर्मनी अखंड आहे! हे स्थापित सत्य बदलले गेले. असंभव घटनेने आपली करवट बदलली, मग आमच्या देशाचे केलेले तुकडे परत आपण का नाही जोडू शकणार? इतिहासात अशा अनेक असंभव वाटणार्‍या घटना बदलल्या गेल्या आहेत. केवळ नागरिकांच्या प्रबळ इच्छाशक्तीने, अथक प्रयत्नाने परिवर्तन घडू शकते, हे निर्विवाद सत्य आहे.
भारताचे विभाजन तुष्टीकरणासारख्या अत्यंत घातक प्रक्रियेने झालेले आहे. संतुष्टी व लांगूलचालनात खूप मोठे अंतर आहे. भुकेल्याला अन्न देणे हे संतुुष्टी करणे होय, परंतु त्याच्या विकृत मागण्यांची पूर्ती करणे हे तुष्टीकरण किंवा लांगूलचालन आहे, जे १९४७ मध्ये केले गेले व घातक रोगाने अखंड भारताचे तुकडे झाले! भारतमातेचे लचके तोडून निर्माण झालेला हा भस्मासुर भारताचा सर्वनाश करायला निघाला आहे. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी सर्वसंग परित्याग केलेले क्रांतिकारक, देशाच्या विभाजनाची घटना सहन करू शकले नाहीत. वीर सावरकरांनी जीवनाच्या अंतिम दिवसापर्यंत अखंड भारताचेच स्वप्न उराशी बाळगले. शेवटच्या दिवसात अन्न, जल परित्याग केलेले सावरकर म्हणतात की, ‘‘मला सिंधू नदीचे पाणी पिण्यास देत असाल तरच मी अन्न-जलग्रहण करेन!’’ इतके त्यांचे भावविश्‍व अखंड भारतासाठी तळमळत होते. परंतु, आजतागायत आम्ही त्यांची इच्छा पूर्ण करू शकलो नाही, याची टोचणी आहे. महर्षी अरविंद डोळे मिटून ध्यानावस्थेत अखंड भारताचे मनोमन चित्र साकर करायचे. परंतु, आजतागायत आम्ही त्यांची इच्छापूर्ती करू शकलो नाही.
श्रीगुरुजी अद्भुत योगी होते. भारताच्या विभाजनानंतर त्यांचे डावे व उजवे खांदे दुखत असत व त्यांच्या शेवटापर्यंत हे दु:ख त्यांना होते. परंतु, आम्ही आजतागायत त्यांच्या या अद्भुत दु:खावर फुंकर घालू शकलो नाही.
१४ ऑगस्ट- अखंड भारत संकल्प दिनाच्या दिवशी आम्ही संकल्प करतो की, ज्या स्वतंत्रतेच्या प्राप्तीसाठी लाखो बलिदान झाले, त्या बलिदानांना व्यर्थ जाऊ देणार नाही, सुसंघटितपणे जनजागरणाने भारताची अखंडता पुनश्‍च प्रस्थापित करू. अखंड भारत हे केवळ स्वप्नरंजन न ठरता सत्यात उतरविण्याचे अखंड प्रयास करू…
प्रा. ममता चिंचवडकर
नागपूर