वेध

0
34

वांधे एअर इंडियाचे…

एअर इंडिया ही विमान वाहतूक कंपनी भारत सरकारच्या नियंत्रणातील आहे. सर्वात मोठी आणि सर्वात जुनी. पूर्वी आपल्याकडे एअर इंडियासोबत इंडियन एअरलाइन्स हीसुद्धा दुसरी सरकारी विमान कंपनी होती. एअर इंडिया आंतरराष्ट्रीय आणि इंडियन एअरलाइन्स देशांतर्गत प्रवासी वाहतूक करत असे. आर्थिक तोटा कमी करणे, व्यवस्थापन खर्च कमी करणे, या उद्देशांनी या दोन्ही कंपन्यांना भारत सरकारने एकत्र आणले. २००७ मध्ये इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियात विलीन केले. आज या विलीनीकरणाला दहा वर्षे झाली, पण नुकसान मात्र कमी झाले नाही. गेल्या दहा वर्षांत विलीनीकरणानंतरही एअर इंडियाला दरवर्षी सरासरी ५ हजार कोटी रुपयांचा तोटा होत असल्याचा एक आर्थिक अहवाल नुकताच समोर आला आहे. दीर्घकाळाचे वर्चस्व किंवा एकछत्री कारभार आणि आजच्या एअर इंडियाजवळ सर्वाधिक विमाने असतानासुद्धा ही देशांतर्गत विमानसेवा देणार्‍या तीन कंपन्यांमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे. आज देशात एअर इंडिया, इंडिगो आणि जेट एअरवेज या तीन प्रमुख विमान वाहतूक कंपन्या आहेत. यात इंडिगो, जेट आणि एअर इंडिया अशी व्यवसायक्रमवारी आहे. अनुभव जास्त, विमाने जास्त, मूलभूत सोयीसुविधा व कर्मचारी संख्या जास्त आणि भारत सरकार पाठीशी, असे असतानाही एअर इंडियाची स्थिती ढांग नंबरचीच आहे. २०१५, २०१७ आणि जून २०१७ पर्यंतच्या आकडेवारीनुसार या पूर्ण अडीच वर्षांत एअर इंडिया देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीत कायम शेवटच्याच स्थानावर आहे. या तीन वर्षांत एअर इंडियाने या व्यवसायात विशेष प्रवासी संख्येत आपली १६.४, १४.६ आणि १३.३ अशी भागीदारी नोंदवली आहे, तर जेट एअरवेजची हीच भागीदारी २२.५, १९ आणि १७.८ टक्के, तर इंडिगोची ३६.८, ३९.५ आणि ४०.५ अशी आहे. म्हणजेच एअर इंडियाच्या तुलनेत अडीच वर्षांत इंडिगो सव्वादोन पट, अडीचपट आणि तिप्पट प्रवाशांना घेऊन हवेत सर्वात उंच उडाली आहे. नेमकी प्रवासी संख्येशी तुलना केल्यास एअर इंडियाने या अडीच वर्षांत ३५४.१८ लाख प्रवासी विमानातून फिरवले आहेत, तर जेट एअरवेजने ४७३.३६ लाख आणि इंडिगोने ९१६ लाख ४३ हजार प्रवाशांना हवाईमार्गे वाहून नेले आहे. या तीन कंपन्यांच्या तुलनेत सर्वाधिक विमाने मात्र एअर इंडियाजवळ आहेत, हे उल्लेखनीय! असे असतानाही एअर इंडियाची प्रवासी वाहतूक मात्र शेवटच्या नंबरची. आंतरराष्ट्रीय प्रवासात मात्र एअर इंडियाने आपले स्थान टिकवले आहे.

उत्पन्न जास्त, पण खर्चही खूप

भारतातील जेट आणि इंडिगो या विमान वाहतूक कंपन्यांच्या तुलनेत तिकीटदर जास्त असल्यामुळे कमी वाहतूक करूनही एअर इंडियाने जास्त पैसे कमावले आहेत. पहिल्या क्रमांकाची प्रवासी वाहतूक करणार्‍या इंडिगोपेक्षा एअर इंडियाचे उत्पन्न जास्त आहे. पण नफा तर दूरच, पण तोटाच तोटा आहे. शेवटी गोळाबेरीज केली असता या कालावधीत या कंपनीला ३ हजार ६४३ कोटी रुपयांचा तोटाच झाला आहे, त्या तुलनेत इंडिगोने फक्त १९ हजार ३७० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून चक्क १६५९ कोटी रुपयांचा नफा खिशात टाकला आहे. जेट एअरवेजने तर उत्पन्न सर्वाधिक मिळवले आहे, पण इंडिगोच्या तुलनेत कमी नफा मिळविला आहे. जेटचे उत्पन्न २३६७० कोटी रुपयांचे असून नफा मात्र ४३८ कोटी रुपयांचाच आहे. एअर इंडियाच्या ३६४३ कोटींच्या तोट्याच्या तुलनेत तर नक्कीच. या अहवालाच्या निमित्ताने या तीनही भारतीय विमान कंपन्यांवर असलेल्या कर्जाचीही आकडेवारी समोर आली आहे. वाईट कर्जबाजारीच म्हणावे लागेल इतकी वाईट स्थिती एअर इंडियाची आहे. या सरकारी कंपनीवर सध्या ४८ हजार ८७७ कोटी रुपये इतके दणदणीत कर्ज आहे. त्या तुलनेत जेट एअरवेजवर फक्त ७२२३ कोटीच रुपये कर्ज आहे. इंडिगो ही भारतातील पहिल्या क्रमांकावरील विमानसेवा असली, तरी त्यांनी आपली कर्जावरील पकडही नियंत्रणात ठेवली आहे. तिच्यावर केवळ २५९६ कोटी रुपयेच कर्ज आहे. सर्वात कमी कर्ज आणि सर्वाधिक प्रवासी असा एक आदर्श वस्तुपाठच जणू इंडिगोने, खासकरून एअर इंडियाच्या सरकारी व्यवस्थापनासमोर ठेवला आहे. वारेमाप खर्च हाच आणि कर्ज एअर इंडियाच्या अंगावर आले आहे. दणदणीत प्रशासकीय खर्च आणि गैरव्यवस्थापन, म्हणजेच ‘मिसमॅनेजमेंट’ एअर इंडियाचे नुकसान सातत्याने वाढवत आहेत. इतर विमान कंपन्या ज्युनिअर केबिन क्रूला ५० हजार रुपये देतात, तर एअर इंडिया चक्क दुप्पट, म्हणजे १ लाख रुपये देते. असेच इतरही खर्चांचे आहे. वेळा पालनाच्या बाबतीतही ही कंपनी मागे आहे. ८५ टक्के वेळपालन हा औद्योगिक क्षेत्राच्या हिशोबाने आदर्श आहे. पण, आमची एअर इंडिया ७८ टक्क्यांवरच आहे. नियमित ११ हजार ९१२ कर्मचारी संख्या हीसुद्धा एअर इंडियासाठी उणेची बाजू आहे. एकूण खर्चाच्या १२ टक्के खर्च एअर इंडिया फक्त पगारावर खर्च करते. ही रक्कम २४०० कोटी रुपये आहे. याशिवाय सरकारी किंवा मंत्रालय स्तरावरील उधळपट्टी किंवा भ्रष्टाचार हा तर एअर इंडियाच्या पाचवीलाच पूजलेला आहे. माजी विमान उड्डयण मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या कारकीर्दीत १११ विमानांची खरेदी केल्यानंतर त्यातील फक्त २३ मिळणे, हा ७० हजार कोटी रुपयांचा गैरप्रकारही एअर इंडियाला मातीत घालणारा ठरल्याचे स्पष्ट आक्षेपही भारताच्या महालेखापाल आणि नियंत्रक (कॅग) यांनी अधिकृतपणे नोंदलेले आहेत. अर्थातच ही सारी उधळपट्टी जनतेच्या पैशांतूनच चालत असते. भारतीय जनतेचे दुर्दैव, दुसरे काय?
अनिरुद्ध पांडे
९८८१७१७८२९