अग्रलेख

0
85

संकल्पाकडून सिद्धीकडे…

‘‘सल्तनत गेली, पण कॉंग्रेसमध्ये सुलतान कायम आहेत!’’ असे एक वादग्रस्त विधान करून, कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी खळबळ उडवून दिली आहे. या विधानाकडे तटस्थपणे पाहिले तर त्यांनी काही वावगे म्हटले असे नाही. पण, कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांना ते पटायला हवे ना! कॉंग्रेस पक्षातील नेत्यांनी राजेशाही थाट सोडून रस्त्यावर यावे, जनतेच्या समस्या जाणून घ्याव्या, त्यांच्यात थेट मिसळावे, पक्षाचे विकेंद्रीकरण करावे, राज्यातील नेतृत्वाला बळ द्यावे, पक्षसंघटना मजबूत करावी, पक्षावरील भांडवलदारांची पकड ढिली करावी, परिवारवादाला रामराम ठोकून नव्या नेतृत्वाला संधी द्यावी… अशी कितीतरी वाक्ये जयराम रमेश या एकाच वाक्यात बोलून गेले. पण, त्यांची भाषा कळेल असे नेतृत्वच कॉंग्रेसमध्ये नाही किंवा पक्षाने बुद्धिवादी नेतृत्व विकसितच होऊ दिले नाही. त्यामुळे पक्षात ठिकठिकाणाहून रमेश यांच्या विधानावर टीका झाली. त्यांना पक्षातून काढून टाकण्यापासून त्यांच्यावर कारवाई करण्यापर्यंतची मागणी केली गेली. कुणी त्यांना उपटसुंभही म्हटले आणि कुणी त्यांचे वय झाल्याचा दाखलाही दिला. एकाने त्यांचे हे व्यक्तिगत मत असल्याचे सांगून वस्तुस्थिती साफ फेटाळून टाकली. पण, संदीप दीक्षित या दिल्लीतील नेत्याची प्रतिक्रिया संयमित वाटली. पक्षाची स्थिती ते सांगतात तितकी वाईट नसली, तरी सातत्याने कॉंग्रेसच्या होणार्‍या पिछाडीवर चिंतन व्हायला हवे, असे ते म्हणाले. पण, त्यांचेही कुणी ऐकण्याच्या स्थितीत नाही. सद्य:स्थितीत कॉंग्रेसची सूत्रे सोनिया गांधी यांच्या हातात असली, तरी त्या आजारपणामुळे देशव्यापी दौरा करण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे त्यांचा म्हणावा तसा दरारा पक्षात राहिलेला नाही. राहुल गांधी यांना बरेच काही करण्याची इच्छा आहे, पण ते जनतेसाठीच नव्हे, तर कार्यकत्यार्र्ंसाठीही परिणामकारक सिद्ध होताना दिसत नाहीत. देशात महत्त्वाचे विषय गाजत असताना ते विदेशात निघून जातात. कधी अज्ञातवासात, तर कधी आजीचे प्रेम त्यांना विदेशात ओढून नेते. त्यामुळे त्यांच्यावर शेलक्या शब्दांत सोशल नेटवर्किंग साईटवर टीका होतात, त्यांच्यावर विनोद होतात आणि मग कॉंग्रेसची मंडळी असहिष्णुतेच्या नावाने बोंब टोकायला मोकळी होते! उपाध्यक्ष असले तरी कॉंग्रेसने राहुलना पुढे करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांच्या नेतृत्वात कुठले आंदोलन यशस्वी झाले नाही की त्यांनी पक्षाला कुठल्या निवडणुका जिंकून देऊन आपले नेतृत्व सिद्ध केले नाही. सर्वत्र नन्नाचाच पाढा आहे. नाही म्हणायला मोदींचे वादळ सुसाट निघाले असताना कॉंग्रेसने पंजाबमधील विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळविले. पण या यशात कॉंग्रेस पक्षाचा, पक्षश्रेष्ठींचा वा कुणा राज्याबाहेरील प्रभावी नेत्याचा तिळाचा वाटा नव्हता. कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी एकहाती तेथील सत्ता खेचून आणली आणि आज अमरिंदरसिंग आणि राहुल यांच्यात बिनसल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे या राज्यात पुढे काय होऊ शकते, याचा अंदाज वाचकच बांधू शकतील. कणखर नेतृत्वाच्या अभावी देशभरातील कॉंग्रेसचे निष्ठावंत सैरावैरा धावत सुटले आहेत. त्यांना कुठे जावे सुचेनासे झाले आहे. जन्मभर ज्या पक्षाच्या ध्येयधोरणांना विरोध केला, ज्यांच्याशी दोन हात केले, प्रसंगी हाणामार्‍या केल्या, त्या भारतीय जनता पक्षात जाण्याची इच्छा नसतानाही त्यांच्यापुढे कुठलाही पर्याय नसल्याने नाइलाजास्तव त्यांना राजकीय अपरिहार्यतेमुळे आणि अस्तित्व धोक्यात येण्याच्या भीतीने त्या पक्षात प्रवेश करावा लागत आहे. का म्हणून कॉंग्रेस त्यांच्यापुढे पर्याय उभा करण्यास असमर्थ ठरत आहे, याचे चिंतन केले जायला नको का? की जयराम रमेश यांनी जे चार भिंतिआड बोलायचे ते जाहीरपणे बोलल्याने त्यांच्यावर शरसंधान करून, त्यांना नामोहरम करून टाळ्या वाजवायच्या? कॉंग्रेसची स्थिती समुद्राच्या वादळात भरकटलेल्या जहाजासारखी झाली आहे. महात्मा गांधी म्हणाले होते त्याप्रमाणे हा पक्ष विसर्जित झाला नाही. पण, आज मात्र तो विसर्जित करण्याची निश्‍चितच वेळ आली आहे. ज्या पक्षाने सर्व विरोधकांना एकत्र आणून भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्याची गरज आहे, तो पक्ष राज्याराज्यातील प्रादेशिक पक्षांच्या पदराआड लपून, त्यांनी भाजपावर हल्ला करण्याची वाट पाहू लागलाय्. १३१ वर्षांचा इतिहास असलेल्या कॉंग्रेससाठी ही अगदीच लांच्छनास्पद बाब म्हणावी लागेल. कॉंग्रेसला त्यांच्या माजी अध्यक्षांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बजावलेल्या कामगिरीची आठवण करून द्यावी लागेल का? बिहारमध्ये कॉंग्रेसला लालूप्रसादांच्या कंदिलाचा प्रकाश हवा आहे, उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाच्या पंक्चर सायकलची साथ सोडायला हा पक्ष तयार नाही, ममता बॅनर्जीसारख्या वाघिणीवर स्वार होण्याची हिंमत कॉंग्रेसमधील एकाही नेत्याची नाही, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. जम्मू-काश्मीरमध्ये पराभूत नॅशनल कॉन्फरन्सच्या मांडीवर कॉंग्रेस पक्ष बसला आहे. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ या राज्यांमध्ये या पक्षाला उतरती कळा लागली आहे. नाही म्हणायला कर्नाटकात या पक्षाची एकहाती सत्ता आहे. पण, तीदेखील पुढच्या निवडणुकीत हातची जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशातील १३ राज्यांमध्ये आज भाजपाची स्वबळावर सत्ता असून, इतर ५ राज्यांमध्ये भाजपा मित्रपक्षांसोबत सत्तेवर आहे. कॉंग्रेस वजाबाकीचे राजकारण करीत असताना भाजपाचे गुणाकाराचे राजकारण करीत आहे. कॉंग्रेस, अहमद पटेल यांच्या विजयाचा ढोल बडवत आहे. पण, हा विजय खरोखरीच देदीप्यमान असा म्हणता येईल का? १४ आमदारांच्या बदल्याने कॉंग्रेसला एक खासदार मिळाला, ही बाब विजय साजरा करायची आहे की पराभवाचे विश्‍लेषण करायची आहे, हे या पक्षाच्या धुरिणांनीच ठरवायचे आहे. गुजरातेत पूरपरिस्थिती असताना, तेथील नागरिकांच्या जखमांवर फुंकर घालायचे सोडून पक्षाने ४४ आमदारांना मौजमजेसाठी बंगळुरूमध्ये नेले. या आमदारांच्या मतदारसंघातील जनता त्यांना हा प्रश्‍न विचारणार नाही का? अशा परिस्थितीत त्यांनी मते मागायला आमच्याकडे नव्हे, तर अहमद पटेलांकडे जावे, असा सल्ला दिला तर मग वाईट वाटून घेऊ नका! पक्षात नवविचार करण्याची जी परंपरा होती तीच खंडित झाली आहे. सत्ताच्युत झाल्यानंतरच्या तीनच वर्षांत कॉंग्रेसची जर ही अवस्था आहे, तर पुढच्या काळात या पक्षाच्या कार्यकर्त्यांनादेखील भिंग घेऊन शोधायची वेळ आल्याशिवाय राहायची नाही! बरे, केंद्रीय पातळीवर नेतृत्वाचा अभाव आहे असे म्हटले तर प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवरतरी नेतृत्व उदयास आले आहे काय? याचे उत्तरही नाहीच द्यावे लागले. साठी-सत्तरीकडे झुकलेले नेते कॉंग्रेसच्या कुठल्याही कार्यक्रमात बघायला मिळतात. कॉंग्रेसच्या हातून आसाम गेले, गोव्यात सत्ता मिळवण्यासाठी तत्परता न दाखवल्याने तोंडचा घास हिरावला गेला, ईशान्येकडील राज्येही भाजपाच्या खात्यात जमा होऊ लागली आणि आता त्रिपुरा या माकपच्या गडातही भाजपाने तृणमूलच्या ६ आमदारांना भगवे दुप्पटे घालून पक्षसदस्यत्व बहाल केले. आपण नेहरू, गांधींचे गुणगान गाण्याखेरीज दुसरे कोणते कार्यक्रम देशातील नागरिकांपुढे ठेवत आहोत, असा प्रश्‍न कॉंग्रेसला पडायला नको? खुशमस्कर्‍यांच्या तावडीतून पक्ष बाहेर काढला, तरच कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून राहण्याची शक्यता आहे. अन्यथा संघटितपणे, शिस्तबद्धपणे नियोजन करून आत्मविश्‍वासाने पावले टाकणारा भारतीय जनता पक्ष, या पक्षाची माती करून हा देश ‘कॉंग्रेसमुक्त’ केल्याचा संकल्प सिद्धीस नेल्याशिवाय राहायचा नाही!