गॅस सिलेंडरच्या सबसिडीमध्ये घट

0
32

नागपूर, १० ऑगस्ट
गॅस सिलेंडरवरील सबसिडी सोडा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, गॅस सिलेंडरवर मिळणारी सबसिडी काढून घेण्याचा प्रयत्न केंद्राकडून सुरूच आहे. सबसिडीयुक्त गॅस सिलेंडरचा दर प्रत्येक महिन्याला चार रुपयांनी वाढवला जात आहे. परिणामी शे-दीडशे रुपये सबसिडीच्या रूपाने ग्राहकांच्या खात्यात जमा होणारी रक्क्म काही रुपयांवर आली आहे. ऑगस्ट महिन्यात सबसिडीपोटी ग्राहकांच्या खात्यात अवघे ४८.५१ रुपये जमा होत आहेत.
समाजातील सर्वसामान्यांना केंद्र शासनाकडून विविध योजनांद्वारे सबसिडी देऊन कमी दरात सेवा-सुविधा दिल्या जातात. गोरगरीब कुटुंबांना उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस देऊन, गॅसधारक कुटुंबांची संख्या वाढवून रॉकेलचा कोटा कमी केला जात आहे. एका कुटुंबाला वर्षाला बारा गॅस सिलेंडरवर सबसिडी दिली जात आहे. त्यापेक्षा जास्त सिलेंडर घेतल्यास बाजारभावाप्रमाणे खरेदी करावे लागते. सध्या एका सर्वसामान्य कुटुंबाला महिन्याला एक गॅस सिलेंडर पुरेसे होते. मात्र, येत्या काही महिन्यांत सर्वसामान्यांनाही गॅस सिलेंडरसाठी बाजारभावाप्रमाणे पैसे मोजावे लागणार आहे. गॅसवरील सबसिडी बंद करण्यासाठी केंद्र शासनाकडून सबसिडी सिलेंडरच्या दरात मे २०१७ पर्यंत दरमहा २ रुपयांची वाढ केली जात होती. जूनपासून ४ रुपयांनी सबसिडीयुक्त सिलेंडरचे दर वाढवले जात आहे. फेब्रुवारी २०१८ पर्यंत सबसिडी शून्यावर येईल. त्यानंतर बाजारभावाप्रमाणे सिलेंडरसाठी पैसे द्यावे लागतील. सबसिडी बंद झाल्यानंतर पेट्रोल डिझेलप्रमाणे गॅस सिलेंडरचे दरही दररोज बदलण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून समजते. यासंदर्भात शहर अन्न व नागरी पुरवठा अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला.