देशी कट्टे विकणार्‍या तिघांना अटक

0
24

नागपूर, १० ऑगस्ट
देशी कट्टे विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका परप्रांतीय विद्यार्थ्यासह तिघांना गिट्टीखदान पोलिसांनी अटक करून २ कट्टे आणि २४ जिवंत काडतुसे जप्त केल्याची माहिती परिमंडळ २ चे पोलिस उपायुक्त राकेश ओला यांनी पत्रपरिषदेत दिली. अब्दुल मन्नान मो. रहमान (१९) बिसनूर, जि. मुंगेर (बिहार), हेमराज गोपीचंद शेंडे (२५) आणि दीपक दारूवाला ऊर्फ दीपक प्रेमलाल मन्सुरे (२४) दोन्ही रा. जगदीशनगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अब्दुल मन्नान हा बीएससी प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. बुधवारी रात्री तो गिट्टीखदान येथील निर्मलगंगा अपार्टमेंटमध्ये देशी कट्टा विकण्याच्या प्रयत्नात होता. ही माहिती एका खबर्‍याने गिट्टीखदान पोलिसांना दिली. माहिती मिळताच पो. नि. राजकमल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साजिद अहमद, हे. कॉ. युवराज ढोले, शिपाई संतोष उपाध्याय, शेख आफताब, शेख इम्रान, आशिष हे निर्मलगंगा अपार्टमेंट येथे गेले. तिथे अब्दुल मन्नान उभा होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन देशी कट्टा, २ मॅग्जीन आणि १४ काडतुसे जप्त केली. पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात आणून विचारपूस केली असता, ५ दिवसांपूर्वी दीपक दारूवाला यास देशी कट्टा विकल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी गुरुवारी सकाळी दीपकला ताब्यात घेतले. हेमराजकडे देशी कट्टा ठेवल्याचे दीपकने सांगितले. पोलिसांनी हेमराजकडून देशी कट्टा, २ मॅग्जीन आणि १० जिवंत काडतुसे जप्त केल्याची माहिती ओला यांनी पत्रकारांना दिली.
अब्दुल मन्नान हा बिहार येथून १५ हजारांत देशी कट्टा खरेदी करून नागपुरात २० हजारांना विकायचा. त्याचप्रमाणे २८० रुपयांप्रमाणे काडतुसे खरेदी करून तो त्याची ३५० रुपयांना विक्री करायचा. रेल्वेने तो नागपूरला यायचा आणि बाबू चिनी या मध्यस्थामार्फत देशी कट्ट्यांची विक्री करायचा. यापूर्वीही त्याने नागपुरात अनेकांना देशी कट्टे विकल्याचा पोलिसांचा संशय असल्याचे ओला यांनी सांगितले. तीनही आरोपींना न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्यांची १६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी घेतली आहे.