नरखेड येथील दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश

0
39

नागपूर, १० ऑगस्ट
नरखेड येथे दोन समुदायात तेढ निर्माण झाल्यानंतर उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे येथील दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिले आहेत. गावकर्‍यांनी एका विशिष्ट समुदायावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्याने आणखीनच तेढ निर्माण झाली आहे.
नरखेड येथील दोन समुदायातील लोकांनी ‘नरखेड घडामोडी’ नावाचा एक व्हॉट्‌स ऍप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपचे ऍडमिन मंगेश शेंडे होते. ३ ऑगस्ट रोजी या ग्रुपवर एका विशिष्ट समुदायाविरोधात विवादास्पद मजकूर टाकण्यात आला. त्यामुळे संबंधित समुदायातील लोकांच्या भावना भडकल्या. मेसेज प्रसारित झाल्याने या समुदायातील लोकांनी डॉ. सुभाष ज्ञानेश्‍वर वाघे यांच्या दवाखान्यात घुसून मारहाण केली. शिवाय दवाखान्याची तोडफोडही केली होती. या मारहाणीत डॉ. वाघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी नरखेड पोलिसांनी संबंधित समुदायातील लोकांवर दोन गुन्हे दाखल केले. त्याचप्रमाणे व्हॉट्‌स ऍपवर विवादास्पद मजकूर टाकल्याप्रकरणी डॉ. वाघे आणि प्रमोद शेंडे यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता. या घटनेमुळे नरखेड येेथे दोन समुदायात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
त्यातच नरखेड येथील दुसर्‍या समुदायाच्या लोकांनी विशिष्ट धर्मातील लोकांच्या दुकानातून कोणत्याच वस्तू खरेदी करू नये, त्याचप्रमाणे त्यांना आपल्या उत्सवात देखील सहभागी करू नये आणि त्यांच्याही उत्सवात भाग घेऊ नये, असे आवाहन केले. या आशयाची पत्रके गावोगावी वाटण्यात आल्याने दुसर्‍या समुदायाच्या भावना आणखी भडकल्या असून, गावात तणावसदृश वातावरण आहे. या सर्व घडामोडी लक्षात घेता दोन समुदायात तेढ निर्माण झाल्याने त्याचा भडका कधीही होण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेता, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नरखेड येथील मद्याची दुकाने बंद ठेवण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना पाठविला होता. त्यानंतर कुर्वे यांनी नरखेड येथील ३ देशी दारूची दुकाने आणि एक बीअर बार १४ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिलेत.