वसंत शेवडे त्रिवर्ग कवी होते

0
51

– आचार्य उमा वैद्य यांचे प्रतिपादन
नागपूर, १० ऑगस्ट
संस्कृत साहित्यात कवी त्रयीची चर्चा होते. ललितकाव्याची निर्मिती करणारे काव्यकवी, आपल्या काव्यातून शास्त्रीय संहिता मांडणारे शास्त्रकवी आणि शास्त्र व ललित दोन्ही मांडणारे उभयकवी. प्रतिभावान कवी तीनही वर्गात मोडतो. असेच शेवडे हे त्रिवर्ग कवी होते, असे प्रतिपादन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू आचार्य उमा वैद्य यांनी केले.
विदर्भ साहित्य संघ आणि सी. पी. ऍण्ड बेरार महाविद्यालयाच्या वतीने प्रज्ञाभारती आचार्य श्रीधर भास्कर वर्णेकर जन्मशताब्दी स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाकवी वसंत शेवडे यांच्या साहित्यकृतीवर व्याख्यान देताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून डॉ. चंद्रगुप्त श्रीधर वर्णेकर, डॉ. मिलिंद बाराहाते आणि ग्रंथसहवासच्या संचालिका डॉ. अरुंधती वैद्य मंचावर उपस्थित होत्या.
आचार्य वैद्य म्हणाल्या, शेवडे हे विदर्भातील होते. मात्र, त्यांचा मोजकाच काळ विदर्भात गेला असून, बहुतांश वेळ ते वाराणसीतच राहिले. त्यांनी अनेक रचना वाराणसी येथेच केल्या. विंध्यवासिनी विजयम्, शुंभवध महाकाव्यम् आणि श्री देवदेवेश्‍वरम् हे त्यांचे तीन महाकाव्य ललित गटात मोडते. शेवडे यांनी रघुनाथतार्किकशिरोमणी चरित्रम्, श्रीमोतीबाबाजामदार चरित्रम् ही चरित्र लिहिली. वृत्तमंजिरी आणि स्फोटतत्त्वनिरुपण- तत्त्वप्रकाशिका या टीका लिहिल्या. विदर्भाने संस्कृत साहित्याला दमयंती, इंदूमती आणि रुक्मिणी या नायिका, पार्श्‍वभूमी आणि नीती दिली. याचा उल्लेख शेवड्यांच्या श्रीकृष्ण शतकम् या चरित्रात आहे. त्यांना प्रतिकालिदास असे बिरूद मिळाले आहे. त्यांनी कालिदासांच्या महाकाव्याच्या सांगाड्यात आपले साहित्य ओतल्याची टीका केली जात होती. मात्र, सांगाड्यात चैतन्य ओतणे हे सोपी काम नाही. हीच तीन काव्याची मध्यवर्ती कल्पना आहे, असे मतही आचार्य वैद्य यांनी यावेळी व्यक्त केले.
श्रीधर वर्णेकरांच्या आठवणी सांगताना आचार्य चंद्रगुप्त वर्णेकर म्हणाले, नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला पंडित नेहरू येणार होते. त्यामुळे बाबांना त्यांच्यावर काही संस्कृत कविता लिहिण्याचे सांगण्यात आले. त्यांनी कविता लिहिल्या. मात्र, पंडित नेहरू आलेच नाही. या रागावर त्यांनी शतक लिहिले आणि नेहरूंना पाठविले. त्यावर नेहरूंनी बाबांना स्वहस्ताक्षरातील पत्रही पाठविले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश एदलाबादकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. विभा क्षीरसागर तर आभारप्रदर्शन डॉ. अरुंधती वैद्य यांनी केले. यावेळी सी. पी. ऍण्ड बेरार महाविद्यालयाचे प्राध्यापक, संस्कृत विद्यापीठाचे अधिष्ठाता, प्राध्यापक आणि विदर्भ साहित्य संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.