महामार्गावरील लुटारू स्थानबद्ध

0
67

नागपूर, १० ऑगस्ट
महामार्गावर लूटमार करून पोलिसांच्या नाकात दम आणणार्‍या टोळीला अटक करून त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. या टोळीमध्ये एका सराफा व्यावसायिकाचाही समावेश आहेत.
विजय नंदलाल रहांगडाले (३३) संघर्षनगर, वाठोडा, किशोर मधुकर रामटेके (३०) बिडगाव, किसन नरसिंह तांडी (२४) तुलसीनगर, भांडेवाडी, शेख असलम शेख बशीर (२४) डवल्याची वाडी पारडी, बबलू राजू फुलकर (२४) तुलसीनगर, पवन प्रभाकर खापेकर (२५) आणि सराफा युवराज मनोहर कुकडे (४८) स्वागतनगर, पारडी अशी आरोपींची नावे आहेत.
२२ जुलै रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास भरतवाडा येथील टेकचंद छोटेलाल चौधरी (५०) हे त्यांची पत्नी विमलसह दुचाकीने कटंगी येथे जात होते. लिहिगाव, नेरी ओलांडल्यानंतर ते कन्हान नदीच्या पुलाजवळ आले. सकाळी ११ ते ११.३० च्या सुमारास मोटारसायकलने आलेल्या विजय, किशोर आणि किसन यांनी त्यांना अडविले. रहांगडाले व त्यांच्या पत्नीला जिवे मारण्याची धमकी देऊन रोख ६५०० रुपये, सॅमसंग कंपनीचा मोबाईल, पदकासह मंगळसूत्र, दीड ग्रॅम सोन्याचे मनी असा ऐवज आरोपींनी लुटून नेला. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी ३९२, ३९७, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
तपासात गुन्हे शाखा पोलिसांनी विजय, किशोर आणि किसन यांचा शोध घेऊन अटक केली. तपासात या तिघांनीही कळमना हद्दीत जबरी चोरी, वाहन चोरी, हिंगणा हद्दीत जबरी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याजवळून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. शेख असलम, बबलू आणि पवन यांच्यामार्फत लुटीचा माल सराफा युवराज कुकडे यास विकल्याची कबुली त्यांनी दिली. या माहितीवरून सराफासह चौघांनाही अटक करण्यात आली.
या लुटारूंचा पूर्वेतिहास तपासला असता, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे २६ गुन्हे नागपूर शहर व ग्रामीण भागात दाखल असल्याचे कळले. त्यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी लक्षात घेता त्यांच्यावर कलम ३ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ अन्वये कारवाई करून कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.