चीनच्या धमकीचा ‘फुसका बार’

0
115

– ड्रॅगनला सामान्य नागरिकच लोळविणार
– स्वदेशी सुरक्षेचे रामबाण अस्त्र
नागपूर, १० ऑगस्ट
स्वदेशी वस्तूंचा वापर हा देशासमोरील सर्व समस्यांचा एकमात्र उपाय आहे, असा विचार शतकभरापूर्वी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी मांडला होता. विस्तारवादी धोरणाने चालणार्‍या आणि भारताला नेहमी धमकावणार्‍या चीनने आज पुन्हा आपल्याला याच ‘रामबाण’ उपायाची आठवण करून दिली आहे. स्वदेशी वापराने रोजगारनिर्मिती आणि राष्ट्रसुरक्षेचे उद्दिष्ट साध्य करता येईल. स्वस्त मिळणार्‍या चिनी वस्तूंची खरेदी न करणे या एकाच निर्णयातून व्यापारी आणि नागरिक दोन्ही उद्दिष्टे साध्य करू शकतात. जगातील एक बलाढ्य लष्करी आणि आर्थिक शक्ती असणार्‍या ‘ड्रॅगनला’ नि:शस्त्र सामान्य नागरिक केवळ या एका निर्णयाने लोळवू शकतात, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानाच्या चमूने मांडले.
अभियानाच्या नागपूर महानगर समितीच्या उपाध्यक्ष फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे, समितीच्या सदस्य आणि उद्योजिका शची मलिक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर सहकार्यवाह रवींद्र बोकारे या चमूने तरुण भारतच्या रामदासपेठ कार्यालयाला भेट देऊन ‘भारत आणि चीनमधील तणावपूर्ण संबंध व त्यात भारतीय ग्राहकांची भूमिका’ या विषयावर अभ्यासपूर्ण चर्चा केली.
भारत जगात वेगाने वाढत चाललेली आर्थिक शक्ती आहे, याची जाणीव चीनला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांत भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात सातत्याने वाढ होत आहे. शिवाय जगातील इतर राष्ट्रांसमोर भारताची प्रतिमा स्वच्छ आणि मैत्रीपूर्ण आहे. या पार्श्‍वभूमीवर आपले श्रेष्ठत्व गमावण्याची भीती चीनला असल्याने डोकलाममधील घटनांसारखा खोडसाळपणा त्यांनी चालवला आहे, असे शिवाली देशपांडे यांनी सांगितले.
चर्चात्मक कार्यक्रमातून अभियानातील त्रयींनी भारत-चीन भौगोलिक स्थिती, चीन-पाकिस्तान संबंध, डोकलामप्रकरणी भूतानची भूमिका या विषयांची माहिती दिली. नागपुरातील मेट्रो उपक्रमात चीनचा सहभाग आक्षेपार्हच असून, त्याविषयी सरकार योग्य भूमिका घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी तभाचे शहर विभागप्रमुख पराग जोशी यांनी उपक्रमाचा परिचय करून दिला. समितीच्या सदस्यांनी पत्रकारांचे शंकानिरसन केले.
चीन कोलमडला : शिवाली देशपांडे
वास्तविक आर्थिकदृष्ट्या कोलमडलेला चीन युद्ध करण्याच्या परिस्थितीत नाही. अन्यथा केवळ धमक्या न देता त्यांनी सरळ आक्रमण केले असते. भारतातून चीनमध्ये जाणारा पैसा बहुतांश शस्त्रास्त्रांच्या निर्मितीत गुंतविला जात असून, ही शस्त्रास्त्रे पाकिस्तानला पर्यायाने दहशतवाद्यांना विकली जातात, असे देशपांडे यांनी सांगितले. चिनी मालास अगदी पर्यायच शोधायचा असेल तर इतरही बनावटीच्या वस्तू सध्या वापरता येतील. अर्थात संपूर्ण भारतीय बनावटीच्या वस्तू उपलब्ध झाल्यास त्यादेखील घेण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले. आपल्या रक्षणासाठी शहीद झालेल्या जवानांप्रती आदर म्हणून प्रत्येकाने स्वदेशी वापराचा संकल्प करायलाच हवा, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.
आपण बनवू, आपणच वापरू : शची मलिक
स्वदेशीचा अंगीकार करून देशाची सुरक्षितता साधता येईल आणि त्यासाठी जवानांचे प्राण खर्ची न पडता क्रांती घडेल, असे मत उद्योजिका शची मलिक यांनी मांडले. आपल्या देशात मागणी वाढली, की पर्यायाने उत्पादन आणि त्यातून रोजगार वाढतील. आयुर्वेद आणि नैसर्गिक वस्तूंची मागणी देशभरात वाढली आहेतच. यादृष्टीने व्यापारी तसेच शेतकर्‍यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. ही मोहीम व्यापक आणि राष्ट्रीय पातळीवर राबविण्यात येत असून, अनेक लोक आणि संस्था या अभियानाशी जोडल्या गेल्या आहेत. सामान्य नागरिकांनी काळाची पावले ओळखून भक्कम भूमिका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२० ऑगस्टला संकल्पदिन : रवींद्र बोकारे
लोकांमध्ये हळूहळू का होईना, बदल निश्‍चितच होतो आहे. स्वस्त वस्तूंच्या मोहापेक्षा आपली आणि आपल्या देशाची सुरक्षा जास्त महत्त्वाची आहे, ही भावना नागरिकांमध्ये आणि विशेषत: तरुणाईमध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती बोकारे यांनी दिली. युवकांना पटणार्‍या आणि आवड असणार्‍या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणणारी व्याख्याने तसेच पथनाट्यांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. दीड लाखापेक्षा जास्त घरांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन चीनचा कावेबाजपणा उघड करून स्वदेशीचे महत्त्व पटवून देण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच येत्या २० ऑगस्टला संकल्पदिन म्हणून शहरातील १२ ठिकाणी विविध कार्यक्रमांचे अयाोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.