जातवैधता प्रमाणपत्रासाठी माना विद्यार्थ्यांचे मुंडण

0
83

– २० हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
नागपूर, १० ऑगस्ट
विदर्भाच्या कानाकोपर्‍यातून हजारोंच्या संख्येने आदिवासी माना जमातीचे विद्यार्थी गुरुवारी शहरातील संविधान चौकात जमले होते. या विद्यार्थ्यांचे जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रलंबित असल्याने जवळपास २० हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे माना जमातीचे प्रलंबित जातवैधता प्रमाणपत्र त्वरित देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेच्या वतीने एकदिवसीय मुंडण व धरणे आंदोलन करण्यात आले. संविधान चौकात झालेल्या या आंदोलनाची सुरुवात आदिवासी गोवारी स्मारकावर पुष्प अर्पण करून झाली. यात विदर्भातील जवळपास ४ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
भारतीय संविधान कलम ३४२ अन्वये माना ही आदिवासी जमात असल्याने त्यांना संविधानात अंतर्भूत सर्व सवलती देण्यात याव्या, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. मात्र, शासनातर्फे माना जमातीच्या विद्यार्थ्यांची प्रकरणे जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रलंबित असल्याने हजारो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे प्रलंबित जातवैधता प्रमाणपत्र त्वरित देण्यात यावे. तसेच आदिवासी जातीसाठी संविधानात अंतर्भूत सर्व तरतुदी लागू करण्यात याव्या, माना विद्यार्थ्यांची देय असलेली शिष्यवृत्ती तत्काळ अदा करावी आणि आदिवासी माना जमातीला जातवैधता प्रमाणपत्र देण्यास कुचराई करणार्‍या अधिकार्‍यांना बडतर्फ करण्यात यावे तसेच राज्यातील शेतकर्‍यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
याप्रसंगी दोनशे विद्यार्थ्यांनी मुंडण करून शासनाच्या धोरणाचा निषेध केला. त्यानंतर संस्थेच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या माध्यमातून राज्यपालांना पाठविले. शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष कुलदीप श्रीरामे, विलास चौधरी, सुहानंद ढोके, देवीदास जांभुळे, स्वप्नील जांभुळे, जया गरमळे, हरिदास श्रीरामे, राहुल दडमल, अमोल जीवनाडे, शुभांगी दोडके, अनुल श्रीरामे, पितांबर गरमळे, विकास दडमल, नामदेव घोडमाटे आदींचा समावेेश होता.