युवकांनी सामाजिक मुद्यांकडे आकर्षित व्हावे

0
21

नागपूर, ११ ऑगस्ट 
कोणत्याही देशाचा युवक हा त्या देशाच्या विकासाचा सशक्त आधार असतो. मात्र, हाच युवक जेव्हा आपले सामाजिक कर्तव्य विसरतो, चैनीच्या गोष्टीत वेळ घालवतो, त्यावेळी देशाचा विकास हा ‘भकास’ होण्याची दाट शक्यता असते. हीच बाब हेरत जगातील समस्त युवकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्यावतीने आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्याचे ठरविण्यात आले. युवकांना सामाजिक मुद्यांकडे आकर्षित करणे आणि त्यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधणे हा यामागील मुख्य हेतू. संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्णयानुसार१९८५ पासून १२ ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिवस घोषित करण्यात आला.
दुर्दैवाने आजची युवापिढी चैनीच्या अधीन गेली आहे, असा आरोप करण्यात येत आहे. ज्याठिकाणी देशात सर्वात श्रमिक वर्ग हा तरुण आहे, असे अभिमानाने म्हटले जाते, त्यावेळी एका अनामिक भीतीची जाणीवही झाल्याशिवाय राहत नाही. हा वर्ग सशक्त, कामसू, श्रमिक असला तरी त्याच्या वाट्याला बेरोजगारी आली आहे आणि त्याच वेळी या युवावर्गातील बोटावर मोजण्याइतपत मंडळी ऐशोआराम व चैनीचे आयुष्य जगत असल्याचे दिसून येते.
दुचाकी वा चारचाकी वाहने, महाग महाग कपडे, तेवढेच आधुनिक आणि यांत्रिक आयुष्य त्यांना हवे आहे. आणि त्यातून गरीब आणि श्रीमंतीच्या भेगा निर्माण झाल्या आहेत. एकीकडे गावातून दररोज शिकण्यासाठी येणारा तरुण चहासोबत बिस्किट खाऊन आपली भूक भागवतो, तर दुसरीकडे भरपेट जेवणावर उतारा म्हणून आपल्या मित्रमैत्रिणीसोबत पिझ्झा, बर्गर खातो. ही विसंगत सामाजिक स्थिती आज पदोपदी अनुभवास येत आहे. या दुसर्‍या गटातील तरुणांपुढे कोणतेही ध्येय नाही. ही मंडळी केवळ घरातील श्रीमंतीचे प्रदर्शन करणारी असते. ज्यादिवशी ते ध्येयाने पछाडले जातील, संकटांना सामोरे जाण्यासाठी निधडी छाती निर्माण होईल, आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य अंगी येईल, त्यावेळेस उज्जवल भारतवर्षाची निर्मिती होऊ शकेल. ही जबाबदारी पेलणे हे जबरदस्त आव्हान आजच्या नियतीने तरुणांसमोर ठेवले आहे. या आव्हानाला सामोरे जाताना दुसरे पुढे ठाकणारे आव्हान म्हणजे राजकारणात युवा शक्तीचा वावर होय. युवकांचा विकास हाच उद्याच्या समाजाचा विकास आहे.
महात्मा गांधींनी त्यांच्या ‘युवक हे आव्हान स्वीकारतील काय’ या निबंधात लिहिले आहे की, देशातील युवक जेव्हा त्यागाच्या जीवनास तयार होतील, ग्रामप्रधान संस्कृतीतील दोषांचे निवारण करण्याचे उपाय कार्यान्वित करतील, तरच त्यांच्या आणि सर्वांच्या जीवनक्रमात आमूलाग्र बदल घडून येईल. शहरी भागातील तरुणांनी ग्रामीण भागातील युवकांना शिशित व संघटित करणे, तेथील जनतेशी निरोगी संबंध निर्माण केले तरच आधुनिक जीवनातील आव्हाने पेलण्याची क्षमता येऊ शकेल, यात शंका नाही. (तभा वृत्तसेवा)